Friday, 6 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज 

·      राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सात अर्ज दाखल-बिनविरोध निवडीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

·      महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांची नियुक्ती

·      तुकाराम बीज सोहळा भक्तिभावाने साजरा-पैठण इथं नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्प्यात

आणि

·      टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक विजेतेपदासाठी रविवारी भारत-न्यूझीलंड लढत, इंग्लंडचा पराभव करत भारत अंतिम फेरीत

****

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होणार आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करतील.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५-२६ चा आर्थिक पाहणी अहवाल काल मांडण्यात आला. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला असून, सात पूर्णांक नऊ दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात तीन पूर्णांक चार, उद्योग क्षेत्रात पाच पूर्णांक सात आणि सेवा क्षेत्रात नऊ टक्के वाढीचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा पाच लाख ६० हजार ९६४ कोटी, तर महसुली खर्च सहा लाख सहा हजार ८५५ कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

****

महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयक काल विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शुल्क नियमन करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.

****

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता १० राज्यांमधल्या ३७ जागांसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून, नऊ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येतील.

महाराष्ट्रातल्या सात जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होत असून, आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, आणि रामराव वडकुते यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना, तर शिवसेनेनं ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. सातव्या जागेसाठी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

****

पुढच्या वर्षी नियोजित जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत, चार डिजिटल साधनांचं औपचारिक उद्घाटन झाल. यात हाऊसलिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब अॅप्लिकेशन, एच एल ओ मोबाईल अॅप्लिकेशन, स्व-गणना पोर्टल, जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली पोर्टलचा समावेश आहे. याचवेळी गृहमंत्र्यांनी जनगणना २०२७ साठी महिलांसाठीच्या ‘प्रगती’ आणि पुरुषांसाठीच्या ‘विकास’ या शुभंकरचं औपचारिक अनावरण केलं.

****

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल तसंच उपराज्यपालांची नियुक्ती केली. तेलंगणाचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची, नागालँडच्या राज्यपालपदी नंदकिशोर यादव यांची, तर सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

ई-चलान पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यातल्या सर्व वाहतूकदारांनी पुकारलेला संप, मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती असलेल्या, ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी काल संवाद साधला. वाहतुकदारांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतीने विचार करत असून, संप मागे घेण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.

****

दरम्यान, ई-चलनच्या वाढत्या दंडामुळे संतप्त झालेल्या खासगी वाहन मालकांनी काल लातूर परिवहन कार्यालयात आंदोलन केलं. मोठ्या संख्येने वाहन मालक यात सहभागी झाले होते.

****

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमनाचा दिवस तुकाराम बीज सोहळा काल भक्तिभावाने साजरा झाला. पुण्याजवळ देहू इथं संत तुकाराम यांच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काल सकाळी मंदिरात महापूजा झाल्यानंतर तुकोबांच्या पालखीने वैकुंठस्थानाकडे प्रस्थान केलं.

परभणी जिल्ह्यातल्या नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रम झाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव नऊ ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने या उत्सवाकरता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पैठणकडे जाणाऱ्या आणि पैठण कडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.

****

टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या उपान्त्य फेरीच्या रोमहर्षक सामन्यात भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने, संजू सॅमसनच्या ८९, शिवम दुबेच्या ४३ आणि ईशान किशनच्या ३९ धावांच्या बळावर निर्धारित षटकात सात बाद २५३ धावा केल्या. इंग्लंड संघाने जेकब बेथलच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडला २४७ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन सामनावीर ठरला. परवा रविवारी अहमदाबाद इथं अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंड सोबत होणार आहे

****

पश्चिम आशियात गेलेले जालना शहरातले पाचजण भारतीय दुतावासाच्या मदतीने सुखरूप परतले असून, उर्वरित दोघे आज परतणार आहेत. नांदेड जिल्ह्यातले ५९ नागरिक दुबई, शारजा, कतार, बहरीन तसंच सौदी अरेबिया या मध्यपूर्व देशांमध्ये असून, ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राकडून मिळाली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात मार्च ते मे २०२६ या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळ, नगरपरिषद तसंच नगरपंचायतस्तरावर उद्यापासून शिबिरांचं आयोजित करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातही सात मार्च ते आठ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा एक चं मंडळनिहाय आयोजन करण्यात येणार आहे.

****

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा बीड जिल्ह्यात आठ मार्चपासून शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र मुलींना मोफत लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दरम्यान, बीड जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीची अंमलबजावणी आणि नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात जन्म-मृत्यू घटनांची १०० टक्के नोंदणी व्हावी आणि नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया काल पार पडली. १६ सदस्यांच्या या समितीवर भाजपचे आठ, शिवसेनेचे दोन, एमआयएमचे चार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

****

लातूर इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबीराचा काल समारोप झाला. या उपक्रमांतर्गत ७४ महिलांनी तीन महिन्यांचं शिलाई प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं.

****

धाराशिव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात काल पद्मश्री चैत्राम पवार यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामस्थांनी पवार यांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन केलं.

****

जालना जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ६९१ कामांपैकी ४३० कामं पूर्ण झाली असून, २६१ कामं अपूर्ण आहेत. या कामांवर ३५८ कोटी रुपये खर्च झाला असून, आणखी २६४ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ ते २२ मार्च दरम्यान जल महोत्सव राबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि बळकट करणं तसच ग्रामस्थांचा या योजनेत सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जल महोत्सव देशभर राबवण्यात येणार आहे. दरडोई दररोज किमान ५५ लीटर पाणी पुरवठा हे जल जीवन मिशनचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...