Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या
गॅसच्या नोंदणी नियमांमध्ये बदल झाल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सरकारने स्पष्ट
केलं आहे. शहरी भागात २५ दिवसांच्या अंतराने आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराने
गॅस सिलिंडरची नोंदणी करता येणार आहे. नोंदणीचा हा कालावधी वाढवला असल्याच्या बातम्या
प्रसारित झाल्यानंतर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं. देशात एलपीजीचा पुरेसा साठा
असून, पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, आणि अनावश्यक
पॅनिक बुकिंग टाळावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि
डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा देखील पूर्णपणे निराधार असल्याचं भारतीय तेल महामंडळानं
स्पष्ट केलं आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा असून, पुरवठा साखळी सामान्यपणे सुरू
आहे. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोल पंपांवर गर्दी करू
नये आणि पुढील माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवरच अवलंबून रहावं, असं आवाहन
महामंडळाने केलं आहे.
****
पश्चिम आशियात सुरु असलेल्या
संघर्षावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विरोधी पक्षांना माहिती देण्यासाठी
ही बैठक आयोजित केल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
****
भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र
सुधारणा विधेयक २०२६ आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेचं
नाव उघड करू नये, तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग
समजला जाईल, अशा तरतुदी या विधेयकात आहेत. यानुसार दूरध्वनी, ईमेल, समाजमाध्यमं
आदी व्यासपीठांवर महिलेविषयी मजकूर, चित्रफीत, चित्र प्रसारित करणं हा गुन्हा
ठरेल.
महाराष्ट्र सरकारने याआधी
शक्ती कायदा राज्यात लागू केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल
करून भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आणला. यात शक्ती कायद्यातल्या सर्व तरतुदी
समाविष्ट आहेत. केवळ दोन तरतुदी नसल्यामुळे या सुधारणेद्वारे त्या कायद्यात समाविष्ट
करण्यात येत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडताना
सांगितलं.
या प्रकारचे कायदे लिंगभाव
निरपेक्ष असायला हवेत असं मत आदित्य ठाकरे यांनी विधेयकावरील चर्चेत व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन
२०२५ या धोरणांतर्गत वर्ष २०३५पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक
करायची योजना असल्याचा पुनरुच्चार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केला.
राज्यातल्या पर्यटनाबाबत कलम २६० अन्वये सरकारनं मांडलेल्या प्रस्तावाच्या वेळी ते
बोलत होते. महामंडळाकडच्या ८ वर्षं जुन्या बसचं रूपांतर हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक
बसमध्ये करण्याचं धोरण हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शहरांमधल्या उड्डाणपुलांच्या
खालची जागा परिवहन महामंडळाला देऊन तिथं चार्जिंग स्टेशन्स उभारता येतील का, याबाबतचं पत्र
सरकारला दिलं असून, ही मागणी मान्य झाली, तर इलेक्ट्रिक वाहन खरेदीला
मोठी चालना मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
**
दस्त ऐवज नोंदणी आणि त्यासाठीचं
शुल्क यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक असणारे बदल केंद्र सरकार लवकरच करत
आहे, त्यामुळे त्यातील गैरव्यवहार रोखणं शक्य होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. याबाबत रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचना
उपस्थित केली होती.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल
पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. पुढील टप्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यातही
सदर कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या राष्ट्रीय कामासाठी मतदार केंद्रनिहाय नियुक्त
केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना आवश्यक ते सहकार्य नागरीकांनी करावं, असं अवाहन
मतदार यादी निरिक्षक तथा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी
केलं आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी
इथल्या श्री साईबाबा संस्थानात श्री रामनवमी उत्सवानिमित्त आज श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणा
यांची मिरवणूक काढण्यात आली. शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित
होते.
****
अहिल्यानगर गुन्हे शाखेनं
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कामरगाव परिसरात तीन गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग
करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. जवळपास दोन कोटी एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला असून, पुढील तपास सुरु आहे.
****
छत्तीसगडमध्ये खेलो इंडिया
आदिवासी खेळांना आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख
मांडविय यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होईल. तीन एप्रिलपर्यंत चालणार्या या
स्पर्धेत सुमारे ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले तीन हजाराहून अधिक आदिवासी
खेळाडू आणि अधिकारी सहभागी होतील.
****
No comments:
Post a Comment