Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ११ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातल्या संघर्षावर भारत लक्ष ठेऊन असून, परराष्ट्र
मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात इराण, जर्मनी आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी
संवाद साधला. प्रादेशिक परिस्थिती आणि ऊर्जा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी चर्चा
केली. शांतता आणि स्थिरतेसाठी भारत जागतिक नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मध्यपूर्वेतल्या युद्धस्थितीमुळे मुंबईच्या जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या
फळे आणि भाजीपाला निर्यातदारांचं हित लक्षात घेत, सरकारनं या कंटेनरवरील साठवण किंवा थांबा कालावधी
शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला
आहे. राज्याचे पणन जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. यासोबतच शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्याचा तसंच नवीन
जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यानं केलेल्या विनंतीवरून केंद्र सरकारनं याबाबत कार्यवाही केल्याचं
त्यांनी सांगितलं. सध्या सुमारे २५० कंटेनर जवाहरलाल नेहरू बंदरावर तर आणखी सुमारे
१५० कंटेनर गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर थांबलेले आहेत.
****
भारतीय संरक्षण संशोधन संस्था – डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे
गोव्याच्या किनाऱ्यावर पी 8 आय या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विमानातून हवेतून जहाजावर
टाकण्यात येणार्या कंटेनर एडीसी १५० च्या चार यशस्वी इन – फ्लाइट चाचण्या घेतल्या.
या चाचणीमुळे आता समुद्रात १५०
किलोपर्यंतची रसद आणि वैद्यकीय मदत जहाजांपर्यंत तत्काळ पोहोचवणं अधिक सोपं होणार
आहे. सर्व विकासात्मक उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या
पूर्ण झाल्यामुळे, ही प्रणाली लवकरच भारतीय नौदलात समाविष्ट होण्याची अपेक्षा असल्याचं,
संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना सर्वत्र
अभिवादन करण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून
संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. छत्रपती
शिवाजी महाराजांकडून मिळालेला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा वारसा जपण्यासाठी छत्रपती
संभाजी महाराज आयुष्यभर कटिबद्ध राहिले, असं
त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचं स्मरण करत त्यांना अभिवादन
केलं.
****
कोणत्याही पुराव्याशिवाय समाज माध्यमावर बदनामी करण्याच्या घटनांमध्ये
मोठी वाढ होत असून, सर्व स्तरातील नागरिकांना विशेषतः महिलांना अशा प्रकारच्या
बदनामीचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या संदर्भातील कायद्यात बदल किंवा नवीन
तरतुदी करण्याची आवश्यकता आहे का, याची पडताळणी करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या
अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या शिफारसींनुसार कायद्यात
बदल तसंच तरतुदीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल विधानसभेत दिली.
****
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार काल
नाशिकमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आले. नाट्य क्षेत्रासाठी
प्रशांत दामले, विज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी डॉ. अनिरुद्ध पंडित, वृक्षारोपणाच्या
चळवळीसाठी अभिनेते सयाजी शिंदे, चित्रकलेसाठी चंद्रमोहन कुलकर्णी, शास्त्रीय संगीतातील
साधनेसाठी सरोदवादक उस्मान खान आणि साहसी मोहिमांच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा
देणारे गिर्यारोहक आशिष माने यांना गोदावरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं.
****
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आणि
स्वातंत्र्य सैनिक रामराव आवरगावकर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल विशेष कार्यक्रम
घेण्यात आला. जिल्हा न्यायाधीश एस.आर.शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, महिलांनी
आर्थिक सक्षम होण्याच्या गरजेवर भर दिला.
****
जालना शहरात विनापरवाना लावण्यात आलेली सगळी
होर्डिंग्स आणि बॅनर्स तात्काळ हटवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आशिमा मित्तल
यांनी दिले आहेत. सर्व संबंधितांनी स्वत:हून २४ तासांच्या आत अनधिकृत होर्डिंग आणि
बॅनर काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
भारतीय अन्न महामंडळाच्या नावाखाली रँडीको कंपनीची
१० कोटी ११ लाख ३२ हजार ५६२ रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे
शाखेनं काल छत्रपती संभाजीनगर इथं अटक केली. या आरोपीला न्यायालयाने १४ मार्च पर्यंत
पोलीस कोठडी
सुनावली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जमिनींसंदर्भात
विविध प्रकारच्या तक्रारींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष
तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
यांच्या
अध्यक्षतेखाली हे पथक कार्य करणार आहे. यासंदर्भात नागरिकांनी आपल्या तक्रारी विभागीय
आयुक्तांच्या
नावे
येत्या
दहा एप्रिल
पर्यंत सादर करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment