Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
जागतिक अनिश्चितता असूनही
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, रुपयाचं मूल्य बाजारावर आधारित असल्याचं अर्थमंत्री निर्मला
सीमारामन यांनी सांगितलं. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात रुपयाच्या अवमूल्यनावर
उपस्थित प्रश्नाला उत्तर देत होत्या. गेल्या पाच वर्षात देशात वित्तीय तूट स्थिर राहिली
असून, याची संपूर्ण जगात प्रशंसा होत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
बाईट – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
जागतिक अनिश्चिततेमुळे जगभरातल्या
चलनांमध्ये अस्थिरता दिसून येत असल्याचं सांगून, सीतारामन यांनी, देशाच्या आर्थिक
प्रगतीला कमी लेखण्यासाठी विरोधी पक्ष एकच मुद्दा सतत उपस्थित करत असल्याचा आरोप केला.
सरकार आणि चलनविषयक प्राधिकरणांचं दोन्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, सामान्य जनतेच्या
हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
**
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह
बँकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकांच्या माहितीची गोपनीयता
राखणं बँकांवर बंधनकारक असल्याचं सीतारामन यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
आवश्यकतेनुसारच ग्राहकांची माहिती संकलित केली जाते, आणि जेव्हा गरज असते, तेव्हाच ती
संबंधित प्राधिकरणांशी सामायिक केली जाते, असं त्या म्हणाल्या.
****
सध्याच्या भू–राजकीय परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना जारी करुन २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसिन वितरणाला परवानगी दिली आहे. ज्या भागांमध्ये
केरोसिनचा वापर बंद करण्यात आला होता, त्या भागात केवळ घरगुती वापरासाठी
वितरकांना केरोसिन वितरणाची परवानगी देण्यात आली असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायू मंत्रालयाने सांगितलं. ही सूचना तत्काळ आमलात आणण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार
सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना स्वत:च्या मालकीच्या विक्री केंद्रांवर पाच
हजार लिटर केरोसिन साठवता येईल. वितरण प्रक्रिया वेगवान करण्यासाठी विक्रेते आणि वहातूकदारांना
परवानाविषयक काही विशिष्ठ नियमांमधून सवलत देण्यात आली आहे.
****
देशातल्या आगामी जनगणनेची
तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जनगणनेचा पहिला टप्पा एक एप्रिलपासून सुरु होणार असल्याचं, जनगणना आयुक्त
मृत्युंजय कुमार नारायण यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
पहिल्या टप्प्यात गृहगणना यासह इतर क्षेत्रीय कामं अनेक राज्यांमध्ये सुरु होणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. दोन टप्प्यांमध्ये होणार्या या जनगणनेत माहिती संकलनाचं काम यावेळी
डिजिटल पद्धतीने होणार असल्याचंही नारायण यांनी सांगितलं.
****
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू
विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तामिळनाडुमधल्या
सर्व २३४ जागांचा आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यातल्या १५२ जागांचा यामध्ये
समावेश आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसनं राज्यातल्या २८४
जागांसाठी उमेदवार जाहिर केले आहेत. बहरामपूर इथून अधीर रंजन चौधरी यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
****
स्वातंत्र्यसैनिक श्यामजी
कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली
आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये
नवी जागृती निर्माण केली, श्यामजी यांचं जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढीला
राष्ट्रसेवेसाठी सतत प्रेरित करत राहतील, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
२१ वं आंबेडकरवादी साहित्य
संमेलन येत्या नऊ मे रोजी नांदेड इथं होणार आहे. सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड-वाघाळा
महानगरपालिका कर्मचारी युनियन यांनी संयुक्तरीत्या या संमेलनाचं आयोजन केलं आहे. संमेलनाच्या
अध्यक्षपदी पत्रकार संजय आवटे असतील तर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे
उद्घाटक असतील. या संमेलनात कवी संमेलन, मुलाखती, पुरस्कारांचं
वितरण, चर्चासत्र आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार
आहे. गुवाहाटी इथं बरसापारा क्रिकेट मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला
सुरूवात होईल.
****
पहिल्या खेलो इंडिया आदिवासी
स्पर्धा छत्तीसगडच्या रायपूरमध्ये सुरू आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून यवतमाळच्या
साक्षी बुरकुलेने भारोत्तोलनात ८६ किलो गटात, १५० किलो वजन पेलून सुवर्ण
पदकाला गवसणी घातली.
****
No comments:
Post a Comment