Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 21
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
आज ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ साजरा होत आहे. यानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नागरिकांना वनं आणि वन्यजीवांच्या संरक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन केलं आहे. वन ही केवळ उपभोग घेण्याची वस्तू नसून ती स्वतःच एक जीवनप्रणाली आहे, असे त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केले.
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये २१ मार्च हा दिवस सर्व
प्रकारच्या वनांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी घोषित
केला होता. ‘वनं आणि अर्थव्यवस्था’ ही यावर्षीच्या
वन दिनाची मुख्य संकल्पना आहे, आर्थिक समृद्धीमध्ये वनांची असलेली
भूमिका यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. या दिनानिमित्त स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर
वृक्षारोपण मोहिमांसह विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
नवी दिल्ली इथं आयोजित ‘भारत इलेक्ट्रिसिटी’ परिषदेत महाराष्ट्र
राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषणच्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञान
केंद्रित दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल
खट्टर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसंच ऊर्जा राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दालनाला भेट देत महापारेषणच्या कार्याची प्रशंसा केली.
या स्टॉलमध्ये महापारेषणची प्रगती, ध्येय-उद्दिष्टे, तसंच २०३० पर्यंतचं नियोजन याबाबत डिजिटल माध्यमातून माहिती सादर करण्यात आली.
****
देशातल्या शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी
सरकार लवकरच एक देशव्यापी मोहीम सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने
दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शिशुवर्गापासून माध्यमिक शालेय शिक्षणात
२०३० सालापर्यंत १०० टक्के शाळाभरतीच्या उद्दिष्टांची या मोहिमेमुळे पूर्तता होऊ शकेल.
ज्या मुलांना आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक समस्यांमुळे नियमित
शाळेत शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांसाठी राष्ट्रीय मुक्त शालेय
संस्था अर्थात ‘एनआयओएस’ची १० हजार अभ्यासकेंद्र देशभरात सुरु करण्याची सरकारची योजना
आहे.
****
बेकायदेशीर ‘ऑनलाईन गेमिंग’ला आळा घालण्यासाठी सरकारने ३०० बेकायदेशीर
जुगारी खेळांच्या संकेतस्थळांना तसंच ऍप्सना ब्लॉक केलं आहे. सट्टा आणि मटक्याचे जुगार
तसंच ‘कॅसिनो गेमिंग’ उपलब्ध असलेल्या इतर अनेक संकेतस्थळांवरही कारवाई करण्यात आल्याचं
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातल्या सूत्रांनी म्हटलं आहे. आतापर्यंत
अशा ८ हजार ४०० संकेतस्थळांना ब्लॉक करण्यात आलं असून ऑनलाईन गेमिंग विरोधातला कायदा
आल्यानंतर त्यातील बहुसंख्य संकेतस्थळांवर कारवाई करण्यात आली आहे.
****
ईदनिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक मोमिनपुरा भागातील गरीब नवाज
मशीद परिसरात आज नमाज अदा करण्यात आली. यावेळी नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
स्वतः उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक
असलेल्या या भागात दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येत ईदचा आनंद साजरा केला.
****
अकोला इथं शहरातील हरिहर पेठ मधल्या ऐतिहासिक ईदगाहवर मुक्ती
आजम मौलाना गुलाम मुस्तफा साहब यांच्या नेतृत्वात विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी
मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
वाशीम शहरासह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यातही रमजान ईद शांततेत आणि उत्साहात
साजरी होत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
सांगली आणि मिरज शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
आज सकाळी सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील ‘दि मुस्लिम जमियात ईदगाह’ मैदानावर दहा हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज
पठण केलं.
मिरज शहरातही निमजगा माळ इथल्या शाही ईदगाह मैदानावर मुख्य नमाज
पठण पार पडलं. दोन्ही शहरांत शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात हा सण साजरा होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही
रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज अदा करण्यात आली.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा पंचायत समितीमधल्या गृहनिर्माण
कंत्रांटी अभियंत्याला एक हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक
केली आहे. नरेश बोरसे असं या कंत्राटी अभियंत्याचं नाव असून जामली गावतल्या एका घरकूल
लाभार्थ्याचा पहिला हप्ता मंजूर झाल्यानंतर त्याला दुसरा
हप्ता मिळण्यासाठी, त्याच्या घराच्या कामाची छायाचित्रं
संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी बोरसेने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
****
पुढील २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही
तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यादरम्यान, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment