Thursday, 5 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सात अर्ज दाखल-बिनविरोध निवडीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

·      आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर चार डिजीटल साधनांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन

·      आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर;चालू आर्थिक वर्षात ७ पूर्णांक ९ दशांश टक्के वाढ अपेक्षित

·      तुकाराम बीज सोहळा भक्तिभावाने साजरा-पैठण इथं नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्प्यात

·      ऑल इंग्लंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची आगेकूच सुरू

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत-इंग्लंड उपांत्य लढत

****

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता १० राज्यांमधल्या ३७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून ९ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येतील. येत्या १६ मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.

महाराष्ट्रातल्या ७ जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होत असून, आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. विद्यमान खासदार रामदास आठवले यांच्यासह ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माया इवनाते, आणि रामराव वडकुते यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यावर रामदास आठवले म्हणाले -

बाईट – खासदार रामदास आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेतर्फे ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळाली आहे. सातव्या जागेसाठी विद्यमान खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नवीन यांच्यासह सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

पुढच्या वर्षी नियोजित जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत चार डिजीटल साधनांचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यात हाऊसलिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब अॅप्लिकेशन, एचएलओ मोबाईल अॅप्लिकेशन, स्व-गणना पोर्टल, जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली पोर्टलचा समावेश आहे. याचवेळी गृहमंत्र्यांनी जनगणना २०२७ साठी महिलांसाठीच्या ‘प्रगती’ आणि पुरुषांसाठीच्या ‘विकास’ या शुभंकरचं औपचारिक अनावरण केलं.

****

आर्थिक वर्ष २०२५-२६ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज असून चालू आर्थिक वर्षात ७ पूर्णांक ९ दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात ३ पूर्णांक ४, उद्योग क्षेत्रात ५ पूर्णांक ७ आणि सेवा क्षेत्रात ९ टक्के वाढीचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा ५ लाख ६० हजार ९६४ कोटी तर महसुली खर्च ६ लाख ६ हजार ८५५ कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

राजकोषीय तूट २ पूर्णांक ७ दशांश टक्के तसेच महसुली तूट ९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या ऋणभारात ११ पूर्णांक १ दशांश टक्के वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात राज्यावर ९ लाख ३२ हजार २४२ कोटींचा ऋणभार आहे. राज्याचं दरडोई उत्पन्न ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये असल्याचं अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सभागृहात सादर करणार आहेत.

****

नागपुरातल्या कारखाना स्फोट प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि सदर कारखाना बंद करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय मेश्राम यांनी आज विधानसभेत केली. कारखान्याचं ऑडिट होऊनही इथं स्फोट होत असेल तर निरीक्षकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.

२२ कामगारांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल असं राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितलं.

सरकारच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. यावर या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत, याचा अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला जाईल असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं. मात्र सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याग केला.

****

महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शुल्क नियमन करणं हे याचं उद्दिष्ट आहे.

****

बारामती विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाची आज पुणे इथं सीआयडी कार्यालयात चौकशी झाली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष घातलं असून अपघाताच्या सखोल चौकशीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

****

ई-चलान पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यातल्या सर्व वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. ही पद्धत महसूल वाढवण्यासाठी नव्हे तर वाहतूकविषयक नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी सुरू केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी समन्वय साधण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व वाहतूकदारांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

****

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमनाचा दिवस तुकाराम बीज आज भक्तिभावाने साजरा झाला. पुण्याजवळ देहू इथं संत तुकाराम यांच्या मंदिरात हजारो भाविकांनी आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी मंदिरात महापूजा झाल्यानंतर तुकोबांच्या पालखीने वैकुंठस्थानाकडे प्रस्थान केलं. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर तुळशीदल आणि फुलांचा वर्षाव केला.

 

परभणी जिल्ह्यातल्या नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर राम महाराज नांदगावकर यांचा कीर्तन सोहळा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर फुलांची उधळण करण्यात आली. जय जय रामकृष्ण हरी भजनाने परिसर दुमदुमून गेला होता.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव ९ ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने या उत्सवाकरता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पैठणकडे जाणाऱ्या आणि पैठण कडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.

****

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची आगेकूच सुरू आहे. लक्ष्यने आज झालेल्या सामन्यात हाँगकॉगचा बॅडमिंटनपटू अँगस एन जी का लाँग याचा २१-१९, २१-२३, २१-१० असा पराभव केला. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रॅस्टो या जोडीची लढत हाँगकाँगच्या जोडीशी होणार आहे. इतर भारतीय बॅडमिंटनपटूंचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरु होणार आहे. न्यूझीलंडनं काल कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. १६ सदस्यांच्या या समितीवर भाजपचे आठ, शिवसेनेचे दोन, एमआयएमचे चार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे.

****

लातूर इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा आज समारोप झाला. या उपक्रमांतर्गत ७४ महिलांनी तीन महिन्यांचं शिलाई प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं. त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ६९१ कामांपैकी ४३० कामे पूर्ण झाली असून २६१ कामं अपूर्ण आहेत. या कामांवर ३५८ कोटी रुपये खर्च झाला असून आणखी २६४ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २२ मार्च दरम्यान जल महोत्सवराबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि बळकट करणं तसच ग्रामस्थांचा या योजनेत सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जल महोत्सव देशभर राबवण्यात येणार आहे. दरडोई किमान ५५ लीटर पाणी पुरवठा हे जल जीवन मिशनचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहराच्या खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी इतिहास आणि वारसाप्रेमींना मिळणार आहे. रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थांच्या दुकाने आणि ठेल्यांनी सजलेल्या शहरातील बुढीलेन परिसरात इंटॅकच्या वतीने शनिवारी ७ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता हा हेरिटेज फूड वॉक आयोजित केला जाणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...