Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून
सुरु झाला. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत आजी–माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात
आली. त्यानंतर १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी घोषणाबाजी सूर केली. त्यातच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पश्चिम
आशियातल्या देशांमधल्या परिस्थितीवर निवेदन दिलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्याचं
लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेतही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातल्या
देशांमधल्या परिस्थितीवर निवेदन केलं. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी
विशेष उड्डाणांची तसंच सीमापार मदतीची व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
कोची इथं सध्या थांबलेल्या इराणी जहाजाबाबतही त्यांनी सभागृहाला माहिती दिली. अमेरीका, इराण आणि इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या
पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यासाठी भारतीय
दूतावास पूर्णपणे कार्यरत आणि सतर्क असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं. इराणमधल्या
भारतीय नागरिकांना परतण्यासाठी आर्मेनियाला जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, आतापर्यंत ६७ हजार नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्यात आल्याची
माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी, राज्यसभेत टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट
संघाचं अभिनंदन करण्यात आलं.
****
भारत प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या दृष्टीकोनातून
पुढे जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात
जाहीर करण्यात आलेल्या, सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता या विषयावर आयोजित
अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. गेल्या काही वर्षांत भारताची आरोग्य
पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाली असून, शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असल्याचं
त्यांनी सांगितलं. आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे आणि आरोग्य केंद्रांच्या विस्तारामुळे
देशातल्या गावागावांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचत आहे, तसंच योग आणि आयुर्वेदालाही जगभरात वाढती लोकप्रियता मिळत असल्याचं
पंतप्रधान म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
भारतीय जनता पक्षाने बिहार, ओडिशा आणि हरियाणामधल्या राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षकांची
नियुक्ती केली आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय मंत्री हर्ष
मल्होत्रा हे बिहार इथले, तर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी हरियाणामधल्या निवडणुकांवर
देखरेख करतील. राज्यातले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ओडिशा इथंले
केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी
आज या नियुक्त्यांची घोषणा केली.
****
टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल
भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर झाला. तीन वेळा विश्वचषक
जिंकणारा भारतीय संघ एकमेव आहे, असं नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. कर्णधार सूर्यकुमार
यादव आणि शिवम दुबे हे मुंबईचे असून, मुंबई आणि महाराष्ट्रातले खेळाडू नेहमीच क्रिकेटमध्ये चांगली
कामगिरी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्र सरकार तेल आणि गॅससह सर्व आवश्यक गोष्टींची काळजी
घेत असल्याचं सांगितलं. म्हणून कोणीही अफवा पसरवू नये आणि अशा अफवांवर विश्वासही ठेवू
नये, असं ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
No comments:
Post a Comment