Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १० मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
इंधन पुरवठ्यातील सध्याच्या भू-राजकीय अडथळ्यांना आणि
एलपीजी पुरवठ्यावरील अडचणींना पाहता, सरकारने तेल
शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या अतिरिक्त
उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
सरकारने घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं असल्याचं, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं आहे. साठवणूक आणि काळाबाजार
टाळण्यासाठी दोन सिलिंडरमधल्या नोंदणीचा कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे.
दरम्यान, देशात अंदाजे १९० कोटी
मेट्रिक टनापेक्षा जास्त वापरायोग्य तेलइंधन साठा, तसंच
नैसर्गिक वायूइंधनाचा एक हजार ८०० अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा उपलब्ध असल्याची
माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत
दिली.
****
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं वित्तीय आणि
व्यापार धोरणासह अनेक प्रशासकीय उपाययोजना केल्या असल्याची माहिती, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. जर कच्च्या तेलाच्या किमती
मूळ अंदाजापेक्षा १० टक्क्यांनी जास्त राहिल्या आणि त्याचा देशांतर्गत किमतींवर
पूर्ण प्रभाव पडला, तर महागाई तीन दशांश टक्क्यानं वाढू
शकते असं त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालाचा संदर्भ देऊन म्हटलं आहे.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी सावित्रीबाईंना आदरांजली वाहिली. सावित्रीबाई फुले यांनी अशा काळात
महिलांना शिक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली, जेव्हा
अनेक सामाजिक दुष्प्रवृत्ती प्रचलित होत्या. त्यांनी देशातली पहिली मुलींची शाळा
स्थापन केली आणि समानतेचा विचार जनतेपर्यंत पोहोचवला, असं
शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
विधानसभेत काल अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली. राज्य प्रगती
करत आहे असं सरकार सांगतं, मात्र राज्यावर कर्जाचा
डोंगर उभा असून,
राज्य दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याची टीका सुनील
प्रभू यांनी,
चर्चेला सुरुवात करताना केली. एका बाजूला शेतकऱ्यांची वीज
तोडली जाते,
दुसरीकडे भांडवलदारांचं कर्ज माफ केलं जातं, असा आरोप त्यांनी केला. राज्य महिला आयोगाला पुरेसा निधी मिळत नसून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असा मुद्दा विधानसभेत सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील,
विजय वडेट्टीवार यांनी मांडला. यावर आयोगाकडून जेवढ्या
निधीची मागणी होते तेवढा निधी दिला जातो असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी
सांगितलं.
****
हळद क्षेत्रातल्या व्यापार संधी वाढवण्यासाठी आणि बाजार
पेठेतील दुवे मजबूत करण्यासाठी नांदेडमध्ये काल विक्रेता - खरेदीदार मेळाव्याचं
आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय हळद बोर्डच्या सचिव एन. भवानी श्री यांनी
जागतिक हळद व्यापारात भारताचं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादनाच्या
क्षमतेचं महत्त्व अधोरेखित केलं. यावेळी हळद लागवडीत उत्पादकता आणि गुणवत्ता वावणं, सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसह विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रं
घेण्यात आली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या परिसरातल्या
उडदावणे हे गाव खादी ग्रामोद्योग महामंडळाने मधाचं गाव म्हणून निवडलं आहे.
गावातल्या नागरिकांना मधमाशांच्या संगोपनातून मध संकलनाचं प्रशिक्षण देण्यात आलं; तसंच मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते नागरिकांना मधुमक्षिका पेट्या
वितरित करण्यात आल्या.
****
आगामी कुंभमेळ्याच्या कामांसाठी नाशिक महापालिकेचे हरित
रोखे,
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक
एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक
महानगरक्षेत्रात सुमारे २५ हजार कोटींची विकास कामं सुरू करण्यात आली आहेत. या
विकास कामांचा लाभ केवळ कुंभमेळ्यापुरताच नव्हे तर नाशिक शहर विकासाच्या दृष्टीने
होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पहिल्या टप्प्यात २०० कोटी
रुपयांपर्यंतचे बॉण्ड्स काढण्याकरता केंद्राने मान्यता दिली होती. याचं यश बघता
केंद्रीय अर्थसंकल्पात या बॉण्डची मर्यादा एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात
आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम रुक्मिणी सभागृहात काल
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेसिंग, इस्रोच्या
शास्त्रज्ञ डॉ. वंदिता श्रीवास्तव तसंच पॅराऑलिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव यांना
सक्षमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात गेवराई बाजार समितीकडून काल कांदा मार्केटचा
शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांची फसवणूक न होता, कांद्यांचा
योग्य पद्धतीने लिलाव व्हावा, यासाठी तालुक्यातल्या
शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आणावा, असं आवाहन,
जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित
यांनी यावेळी केलं.
****
परभणी इथं पाच वर्षांपूर्वी झालेल्या परिचारिका आत्महत्या
प्रकरणातल्या दोषीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा
सुनावण्यात आली आहे. काल झालेल्या अंतिम सुनावणीत जिल्हा न्यायाधीश एन. आर.
नाईकवाडे यांनी हा निर्णय दिला.
****
No comments:
Post a Comment