Monday, 30 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीला एकजुटीनं सामोरं जाण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      देशात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही ७० टक्क्यापर्यंत- पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण

·      २०११ पूर्वीचं सरकारी जागेवरचं दीड हजार चौरस फुटांपर्यंतचं अतिक्रमण नियमबद्ध होणार, महसूलमंत्र्यांची माहिती

आणि

·      राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, मराठवाड्यातही पावसाचा अलर्ट

****

पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून, आपल्याला एकजुटीनं या आह्वानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा १३२वा भाग काल प्रसारित झाला. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेलं सहकार्य, आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य, यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये, सरकारकडून आपल्याला सातत्याने जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवावा, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

युवाशक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरणनिर्मितीशी जोडण्यासाठी ‘माय भारत’ संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या १२ लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या निबंधांमधून युवा वर्गानं राष्ट्रहिताचे अनेक मुद्दे मांडल्याचं त्यांनी सांगितलं.

टी –ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला शंभर पेक्षा कमी दिवस उरले असल्याचं सांगून, त्यांनी श्रोत्यांना आरोग्यवर्धनाबाबत माहिती दिली.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागला आहे. त्यामुळेच आता शहरात मोठ्या प्रमाणात घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवलेले दिसतात असं त्यांनी सांगितलं.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून, जलसंवर्धनाचं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं.

****

देशात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून, रोज ५५ लाख सिलिंडरचं वितरण केलं जातं आहे, तसंच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठाही सामान्य परिस्थितीत होता त्याच्या ७० टक्क्यापर्यंत पोहोचल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं. देशभरातल्या सर्व पेट्रोल पांपांवर पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून, ९४ हजार मेट्रिक टनाचा माल वाहून नेणारी दोन एलपीजी वाहक जहाजं भारताच्या दिशेनं निघाल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

****

६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचं उद्घाटन काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पोलीस ड्युटी मीट हा विविध राज्यांनी विकसित केलेल्या क्षमतांचं आदान प्रदान करण्यासाठी महत्त्वाचा मंच आहे, यामुळे सामूहिकरित्या आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते असं ते यावेळी म्हणाले. या ड्युटी मीट मध्ये देशभरातले २९ पथकं, ९३५ पोलिस कर्मचारी आणि १५२ डॉग स्क्वॉड सहभागी झाले आहेत.

****

२०११ पूर्वी सरकारी जागेवर दीड हजार चौरस फुटांपर्यंत असलेलं अतिक्रमण नियमबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळत होते, मात्र आता सर्वसामान्य नागरिकांसाठी पट्टे वाटपाचा निर्णय घेतला असून, पट्टा मिळाल्यानंतर केवळ एक हजार रुपयांत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात, याची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं तीन दिवसांनी वाढवली आहे. खरात याच्या विरोधात आणखी दोन महिलांनी तक्रार केली असून, तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे, त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

****

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नेहमीच शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य देणारे निर्णय घेतले असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवली जाईल, असं सांगून शिंदे यांनी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी या योजनांचाही उल्लेख केला.

****

केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या कौठा भागासाठी मंजूर असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेला आजपासून सुरुवात होत आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुमंत पाटील यांनी दिली.

****

धाराशिव तालुक्यातल्या पळसप इथं ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांच्यासह साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्याला मोठी परंपरा असल्याचं नमूद करत पाटील यांनी, संत साहित्याचा वारसा जपण्याचं कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी होतं असल्याचं नमूद केलं. तत्पूर्वी काल सकाळी गावातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान विभागांतर्गत सांडपाणी आणि घनकचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा काल घेण्यात आली. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कारांचं वितरण यावेळी करण्यात आलं. मानवत तालुक्यातल्या कोल्हावाडी ग्रामपंचायतीला प्रथम, जिंतूर तालुक्यातल्या कुंभारीला द्वितीय, तर पूर्णा तालुक्यातल्या पिपळा लोखंडे ग्रामपंचायतला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

****

५२ लाख रुपयांच्या महसूल थकबाकीमुळे जालना जिल्ह्यातल्या एका मल्टि मॉडेल ड्राय पोर्ट प्रकल्पाच्या ४९५ एकर जागेवर प्रशासनानं जप्ती आणली आहे. वसुलीसाठी अनेकदा नोटीस बजावूनही प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.

****

राज्यात येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा, तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...