Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
देशभरातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उद्योजकांना
अधिक लाभ मिळवून देण्यासाठी, सरकार ‘स्टँड-अप इंडिया’ योजनेचं नुतनीकरण करुन
नवीन आवृत्ती आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत
दिली. एप्रिल २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली ‘स्टँड-अप इंडिया’ योजना, गेल्या वर्षी मार्चमध्ये संपुष्टात आली होती. नीती आयोग आणि
इतर विभागांनी या योजनेचा अभ्यास केला असून, लाभार्थ्यांना अधिक फायदे देण्यासाठी या योजनेची पुनर्रचना केली
जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ओडिशातल्या कटक इथल्या एससीबी रुग्णालयात अतिदक्षता विभागात
आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचवताना जवळपास ११ कर्मचारी जखमी झाले.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक
अंदाज आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि आरोग्य मंत्री मुकेश महालिंग यांनी
घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख
रुपये मदत घोषित केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन
यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक
व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित आधुनिक उपाययोजनांचा
प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय, या ना-नफा-ना-तोटा तत्वावर कार्यरत संस्थेमध्ये सामंजस्य करार
करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज
मुंबईत हे करार करण्यात आले. या कराराअंतर्गत क्षयरोग, मातृ - नवजात तसंच बाल आरोग्य, प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य
सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी एआयचा वापर हा ‘फोर्स
मल्टिप्लायर’ ठरणार असून, वाधवानी एआयच्या सहकार्याने एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार
असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. तर, ही भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम
बनवणार असल्याचं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितलं.
****
दरम्यान, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या पहिल्या टप्प्यातल्या ८६४
पुनर्वसन सदनिकांचं वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. विधानपरिषदेचे
सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यावेळी उपस्थित होते.
****
मुंबईसह संपूर्ण राज्यातली सर्व खासगी रुग्णालयं आणि नर्सिंग
होम्सचा आढावा घेण्यासाठी आणि नोंदणी नसलेली खासगी रुग्णालयं आणि नर्सिंग होम्सवर कारवाई
करण्यासाठी नगरविकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती
स्थापना करण्याची घोषणा, नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत
केली. याशिवाय, आवश्यकता असलेल्या अधिकाऱ्यांना
समितीत घेण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
****
विधानसभेत आज जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात बदनापुरचे
आमदार नारायण कुचे यांनी प्रश्न उपस्थित केला. जालना जिल्ह्यात या योजनेअंतर्गत झालेल्या
कामांची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री
गुलाबराव पाटील यांनी, येत्या १५ दिवसात चौकशी
करण्यात येईल, असं सांगितलं.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही पालम मधल्या ६५
गावाची पाणी पुरवठा योजना दोन वर्षापासून बंद असून, त्याचं फिडर चोरीला गेल्याची माहिती दिली. यासह पूर्णा आणि गंगाखेड
मधल्या या योजना पूर्ण होऊन नागरीकांना नळाद्वारे पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर बोलताना मंत्री पाटील
यांनी, माहिती घेऊन उत्तर देणार असल्याचं
सांगितलं.
****
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्हा आयुष कक्षाच्या वतीने
आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी आयुष आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि योग उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. ही
शिबिरं करमाड ग्रामीण रुग्णालय आणि शिवना इथल्या युनानी दवाखान्यात होत आहेत. आयुष
उपचार पद्धतींचा प्रचार–प्रसार व्हावा, तसंच जनतेला आयुष सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने आयुष मंत्रालयाच्या सूचनेवरून या शिबिरांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज
उपलब्ध करून देणं आणि तांत्रिक अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात
अकोला परिमंडळाच्या महावितरणने स्मार्ट ग्रीड अंतर्गत विकसित केलेली 'सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम' देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या आंतरराष्ट्रीय
स्मार्ट एनर्जी आणि इनोव्हेशन परिषदेमध्ये
या तंत्रज्ञानासाठी महावितरणचा 'आयएसजीफ इनोव्हेशन अवॉर्ड २०२६' या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
****
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत
आहे. १० राज्यांपैकी अनेक राज्यांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे. उर्वरित
बिहार, ओडिशा आणि हरियाणातल्या ११ जागांसाठी
आज मतदान होत आहे.
****
No comments:
Post a Comment