Tuesday, 17 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिली. जर विमा कंपन्यांनी कृषी-संबंधित दाव्यांचा निपटारा २१ दिवसांच्या आत केला नाही, तर त्यांना १२ टक्के व्याजासह दाव्यांची रक्कम अदा करावी लागेल, जर राज्य सरकारांकडूनही दाव्यांच्या प्रक्रियेत विलंब झाला, तर त्यांनाही शेतकऱ्यांना १२ टक्के व्याज द्यावं लागेल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. दाव्यांच्या निपटार्याशी संबंधित आपल्या तक्रारी किंवा गाऱ्हाण्यांबाबत शेतकरी कृषी रक्षक पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. आतापर्यंत या पोर्टलवर दोन लाख ७१ हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, सरकार यासंदर्भात चौकशी करुन कठोर पावलं उचलत असल्याचं चौहान यांनी सांगितलं.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग – एनसीबीच्या स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एनसीबी आपलं कर्तव्य अनुकरणीय उत्साहाने पार पाडत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या संकल्पनेला उल्लेखनीय गतीने पुढे नेत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी समर्पित असलेली एनसीबी ही एक प्रमुख संस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

कतारहून ४६ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन येणारं नंदादेवी हे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करुन आज गुजरातमध्ये वाडीनार बंदर इथं सुरक्षितपणे दाखल झालं. कालही शिवालिक जहाजातून ४६ हजार मेट्रिक टन एलपीजी आणण्यात आला होता.

****

राज्यात वीजेची कमतरता नसून, २०३० पर्यंत ५२ टक्के वीज अपारंपारिक स्त्रोतातली असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांनंतर, वीजेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण कधीपर्यंय बनेल, अशी विचारणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती, त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. डेटा सेंटरसाठी साडे चार हजार मेगा वॅट वीज लागेल, ती आज उपलब्ध आहे. सगळ्यात मोठी डेटा सेंटरची कॅपेसिटी महाराष्ट्रात तयार होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. हरित ऊर्जा वाढवण्यासाठी बॅटरी स्टोरेज कॅपेसिटी वाढवणार असून, पंप स्टोरेजची मर्यादा एक लाख मेगावॅट पर्यंत नेण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या दहा वर्षात आजच्या उपलब्धतेपेक्षा दुपटीपेक्षा जास्त वीज राज्याकडे असेल, आपण देशाला वीज पुरवू शकतो, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी, भविष्याचा विचार करुन ऊर्जा निर्मितीचा रोडमॅप तयार केला असल्याचं सांगितलं.

****

राज्यात गॅस तुटवडा आणि वितरणासंबंधी सरकारने निवेदन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

****

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ते काल बोलत होते. या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा आणि पॅनिक बटन या सारख्या सुविधा अनिवार्य कराव्या, असे निर्देश स्वामी यांनी दिले. याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यास संबंधित वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातली मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि औपचारिक शिक्षण प्रणालीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका असून, या सहकार्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या भागीदारी अंतर्गत महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळाला सहाय्य करण्यासाठी ‘टेक्निकल असिस्टन्स यूनिट’ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवणं, वंचित समुदायांपर्यंत पोहोचणं, तसंच दहावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणात सामावून घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास मदत केली जाणार आहे.

****

एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्हा दक्षता पथकाने धुळे शहर आणि शिंदखेडा परिसरात हॉटेल आणि खानावळींची तपासणी केली. या तपासणी दरम्यान २७ घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे वापरले जात असल्याचं समोर आलं. पुरवठा विभागाने हे सर्व सिलिंडर तात्काळ जप्त केले. सर्व हॉटेल चालकांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर करावा, सिलिंडर खरेदी केल्याच्या मूळ पावत्या तपासणीसाठी उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश पुरवठा विभागाने दिले आहेत.

****

फ्रान्समध्ये आजपासून ऑर्लीन्स मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. अनुभवी किदाम्बी श्रीकांतसह आयुष शेट्टी आणि तन्वी शर्मा भारताचं आव्हान राखतील. एचएस प्रणॉयने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...