Monday, 9 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा टप्पा, लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता

·      विकसित राष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांची पूर्ण क्षमता उपयोगात आणणं आवश्यक, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      विविध उपक्रमांनी देशभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

·      गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

आणि

·      भारतीय क्रिकेट संघाची विक्रमी कामगिरी, तिसऱ्यांदा पटकावलं टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेतेपद

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. लोकसभेत आज सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव मांडला जाईल. काँग्रेसचे मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हे तीन सदस्य हा प्रस्ताव मांडतील. लोकसभेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पश्चिम आशियातल्या परिस्थितीसंदर्भात निवेदन देणार आहेत.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसनं त्यांच्या लोकसभा खासदारांना व्हीप जारी करून, उद्या मंगळवारपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

****

भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांची पूर्ण क्षमता उपयोगात आणणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. नवी दिल्लीतल्या माणेकशॉ केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. बेटी बचाओ बेटी पढाओ, पीएम मुद्रा योजना आणि मिशन शक्ती यांसारख्या योजनांमुळे आज महिला सक्षमीकरणाला चालना मिळत असून, महिला नोकरी मागणाऱ्या नाही, तर नोकरी देणाऱ्या उद्योजिकाही बनत आहेत, असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात ड्रोनद्वारे शेती फवारणी करणाऱ्या महिलांचा उल्लेख करत राष्ट्रपतींनी महिलांच्या बदलत्या सामर्थ्याचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या,

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

**

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महिला दिनाची यावर्षीची संकल्पना, “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशा आशयाची आहे.

**

राज्यभरात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरच्या विभागिय क्रीडा संकुलावर खेलो इंडीया अभियानांतर्गत ‘अस्मिता लिग’ क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. महिलांमध्ये क्रीडाविषयक जागरुकता, खेळांमध्ये संधी उपलब्ध करुन देणं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रक्षा खडसे यांनी याठिकाणी महिलांच्या सायकल तसंच वॉकेथॉन स्पर्धांना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. विकसित भारत घडवतांना तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनीही तंदुरुस्त होण्याची गरज असल्याचं खडसे यांनी बोलतांना नमूद केलं. त्या म्हणाल्या...

बाईट - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणा-या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातल्या क्रांती चौकातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात आली.

**

परभणी इथंही प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनात ‘अस्मिता लिग’चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या.

**

जालन्यात रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या वतीने आयोजित 'साडी वॉकेथॉन'मध्ये महाविद्यालयीन तरुणींपासून ते ६५ वर्षांच्या आजींपर्यंत तब्बल ८०० महिलांनी पारंपरिक सहावारी आणि नऊवारी साड्या परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचं उद्घाटन केलं.

**

धाराशिव इथं नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता विभागातल्या महिला कर्मचारी तसंच अंगणवाडी मदतनीसांचा सन्मान करण्यात आला. तर तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं.

**

बीड इथं तुलसी शैक्षणिक समुहाच्या वतीने ‘महिला मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी बोलताना, बालविवाह आणि मुलींच्या शिक्षणातील गळतीच्या प्रश्नावरही प्रकाश टाकत, समाजाने याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं.

****

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत झाला. बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचं प्रमाण वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. “माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित” या मोहिमेत सुमारे तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे १० हजार महिलांमध्ये कर्करोगाचं प्रारंभिक निदान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

गर्भाशय मुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी १४ वर्ष पूर्ण झालेल्या पण १५ वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. तीन महिन्यांत राज्यातल्या नऊ लाख ८४ हजार मुलींना लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून, सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या मुलींचं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं.

**

नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मुगट आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातल्या एकूण २७ हजार मुलींना ही लस देण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे.

**

परभणी इथं स्त्री रुग्णालयात मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबीर आणि 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी  सुमारे १२४ महिलांची तपासणी करण्यात आली.

****

जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं, केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातल्या कर्ली गावात काल जल महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येत्या सहा महिन्यांत राज्यातल्या प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पेयजल पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्तरावर राज्याच्या मॉडेलचं अनुसरण केलं जात असल्याचं सोमन्ना यांनी नमूद केलं.

****

न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने टी–ट्वेंटी विश्वचषक विक्रमी तिसऱ्या वेळेस पटकावला. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करत, भारताचे सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या पाठोपाठ ईशान किशननेही झंझावाती अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांची मधली फळी काहीशी अडखळली, मात्र शिवम दुबेच्या तडाखेबंद खेळीमुळं भारतीय संघानं निर्धारित षटकात पाच बाद २५५ धावसंख्या उभारली. हा दबाव झेलण्यात अपयशी ठरलेला न्यूझीलंडचा संघ १९व्या षटकात १५९ धावांवर सर्व बाद झाला.

अक्षर पटेलने तीन आणि जसप्रीत बुमराहने चार बळी घेतले. तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. चार षटकांत १५ धावा देत चार बळी घेणारा बुमराह सामनावीर ठरला, तर फलंदाजीत सातत्य राखलेला संजू सॅमसन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला आज शासकीय महापुजेने सुरुवात होत आहे. राज्यातल्या कानाकोपर्यातून सुमारे ७०० दिंड्यांसह पाच लाखाहून अधिक वारकरी पैठण इथं दाखल झाले आहेत. आज नाथषष्ठी निमित्त वारकरी सोहळ्याचं कीर्तन, वारकरी वैष्णव पूजन, हरिपाठ बिंद्रावळी, भजन, अनुग्रह दीक्षा आणि गुरुपूजन सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

लातूरमध्ये परंपरेनुसार 'रंगपंचमी' काल उत्साहात साजरी झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी मातोश्री वृद्धाश्रमात उपस्थित राहून आजी-आजोबांसोबत संवाद साधत रंगपंचमी साजरी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना आता शाळेमध्येच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. जिल्ह्यात दोन हजार ९० शाळांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असून, यात विविध मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण दिलं जाईल.

****

लातूरमध्ये बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या वतीने काल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक प्रकाश बुक्ते यांनी यावेळी, बांधकाम क्षेत्रातल्या तांत्रिक अडचणी आणि नवीन नियमावली अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितली.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 03 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 03 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...