Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 March
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· औद्योगिक
क्षेत्र विकासासाठी भव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
· व्यावसायिक
ग्राहकांना आणखी १० टक्के एलपीजी पुरवठ्याला सरकारची मंजुरी
· शुद्धलेखन
दुरुस्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, महसूल विभागातील सर्वात मोठा
घोटाळा उघड
· छत्रपती
संभाजीनगर आणि परभणी जिल्हापरिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे
आणि
· मराठवाड्यात
आजही अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
****
देशात शंभर औद्योगिक क्षेत्र
विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने काल भव्या- अर्थात भारत औद्योगिक विकास योजनेला मान्यता
दिली. या योजनेसाठी ३३ हजार ६६० कोटी रुपये तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
२०२३-२४ च्या कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला एक हजार ७१८ कोटी रुपये अनुदानासही
मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेवरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढची पाच वर्ष ही योजना कार्यरत राहील. देशभरात
पंधराशे मेगावॅट निर्मिती क्षमतेच्या सुमारे दोनशे प्रकल्पांसाठी ही योजना काम करेल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत या निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट- केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
****
राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण
होत आलेल्या ५९ सदस्यांना काल निरोप देण्यात आला. निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये
उपसभापती हरिवंश, एच डी देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे, तसंच शरद
पवार यांचा समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राजकारणात
कधीच 'पूर्णविराम' नसतो, भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात, आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये
प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि योगदान हे सदैव मोलाचं ठरेल, असं नमूद केलं. ते म्हणाले,
बाईट- पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
व्यावसायिक ग्राहकांना आणखी
१० टक्के एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. त्यामुळे या ग्राहकांना
आता मासिक सरासरीच्या ३० टक्के एलपीजी मिळेल. अधिकाधिक व्यावसायिक ग्राहकांनी एलपीजी
ऐवजी पाइप गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पेट्रोलियम सचिवांनी सर्व
राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केलं आहे.
****
शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली
महसुली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राज्यात एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार
उघड झाला आहे. महसूल खात्यातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची माहिती, महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत दिली. महसूल विभागाच्या कलम १५५चा गैरवापर
करून सातबारा उताऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले. काही ठिकाणी बेकायदेशीररित्या
जमीन हस्तांतरणही करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. अनिल परब यांनी ही लक्षवेधी
मांडली होती. पुणे जिल्ह्यात २०२५ मध्ये जुलै-ऑगस्ट दरम्यान हा प्रकार उघडकीला आला.
याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती
महसूल मंत्र्यांनी दिली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, तसंच राज्यभरातल्या
सर्व संशयित नोंदी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पुढच्या
सात दिवसात कारवाई सुरू होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित
शाळा स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयकाला विधान परिषदेनं काल मंजुरी दिली. तर महाराष्ट्र
मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक तसंच वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल
विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं.
****
राज्यातल्या सैनिकी शाळांमध्ये
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता १५ हजार वरून ५० हजार रुपयांपर्यंत
वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं.
ते काल विधानरिषदेत शिवाजीराव गर्जे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते.
****
संगमनेर तालुक्यात १२ वर्षांच्या
मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला
देण्यात आलेल्या आहेत, असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल विधान
परिषदेत दिलं. ॲसिड सहज उपलब्ध होऊ नये, यासाठी समिती स्थापन करून
उपाययोजना करण्यात येतील, असं भोयर यांनी सांगितलं.
****
गुढीपाडवा आज साजरा होत आहे.
हिंदू कालगणनेनुसार शक संवत १९४८ या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. घरोघरी गुढ्या
उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडूलिंबाचे डहाळे बांधून तसंच इष्टदेवतांच्या
दर्शनाने हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने
घर, वाहन तसंच सोन्याचांदीच्या आभुषणांसह इतर महत्त्वाच्या खरेदीचा प्रघात आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णूदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशात जबाबदार, पारदर्शक
आणि विश्वासार्ह जाहिरात व्यवस्थेची गरज असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे
सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट स्टॅण्डर्ड कौन्सील ऑफ इंडियाच्या
वतीनं काल मुंबईत घेण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. कृत्रीम बुद्धिमत्तेच्या प्रभावी
वापराचं आवाहन करताना ते म्हणाले,….
बाईट- माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची
बिनविरोध निवड करण्यात आली. काल अत्यंत नाट्यमय वातावरणात झालेल्या या निवड प्रक्रियेत, जिल्ह्यात
महायुतीतली फाटाफूट उघडपणे दिसून आली. शिवसेनेच्या २१ सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार
टाकला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ सदस्य यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे
या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आलेले भाजपचे गलांडे आणि जयस्वाल यांची अनुक्रमे
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष
आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया काल पार पडली. यात अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातल्या
सावंगी म्हाळसा गटातील भाजपच्या लता विजय यांची अध्यक्षपदी तर सोनपेठ तालुक्यात विटा
गटातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध
निवड झाली.
****
मराठवाड्यातल्या पहिल्या ए
आय अंगणवाडीला काल जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ झाला. परभणीत झालेल्या आदर्श
पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण
यांच्या हस्ते या अंगणवाडीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं.
****
गर्भाशय मुख कर्करोगाच्या
एचपीव्ही लसीकरण मोहीमेला काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ झाला. सिडको एन-8 इथल्या
रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. आयएमएचे छत्रपती
संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुलींना ही
लस देण्यात आली
****
गावांचा सर्वांगीण विकास आणि
शाश्वत स्वच्छता ही फक्त सरकारी योजनांमधून नाही, तर लोकसहभागातूनच शक्य असल्याचं, नांदेड
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी म्हटलं आहे.
नांदेड इथं स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा-दोन अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या
जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. कर्मचाऱ्यांनी
पुढाकार घेऊन स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करावी, असं आवाहन कावली यांनी केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या
आवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांचं तसंच वित्तीय नुकसानीचे ग्रामस्तरीय
समितीमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागांची
पाहणी करून विहित नमुन्यात पंचनामे पूर्ण करावेत,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल
रात्रीच्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित
झाला होता. जिल्ह्यात कन्नड, खुल्ताबाद आणि पैठण तालुक्यात काल तुरळक ठिकाणी हलक्या
स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामातील, मक्का, गहु, हरभरा, कांदा आदी
पिकांची नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान
विभागाने आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment