Wednesday, 25 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

लोकसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्त विधेयक २०२६ वरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक, २०२५ वर देखील आज लोकसभेत चर्चा होईल. या विधेयकाच्या माध्यमातून दिवाळखोरी संहिता, २०१६ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तर राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय सशस्त्र पोलिस बल सामान्य प्रशासन विधेयक २०२६ सादर करणार आहेत.

दरम्यान, लोकसभेत काल ट्रान्सजेंडर अर्थात पारलिंगी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानुसार, एखादी पारलिंगी व्यक्ती स्वतःची ओळख पटवणारं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकते. वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीची तपासणी केल्यानंतरच जिल्हाधिकारी हे प्रमाणपत्र जारी करतील. पारलिंगी व्यक्तींना जन्मदाखल्यात किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमधलं स्वतःचं नाव बदलण्याचा अधिकार या विधेयकातून मिळेल.

****

पश्चिम आशियातल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. या भागातील तणाव कमी करून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा भर आहे; होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणं जगासाठी अत्यावश्यक असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं, असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या साखर उद्योगासंदर्भात स्थापन समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. साखर उद्योगाला आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने ही राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

****

महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेल्या अशोक खरातला काल नाशिक जिल्हा न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातच्या घरातून घातक शस्त्रे आणि मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

****

शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची विविध प्रलंबित प्रकरणं दोन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि इतर मालमत्तांच्या मोबदल्याबाबत डी. एम. आय.सी.कडे निधीची मागणी करण्यात आली असून, निधी प्राप्त होताच प्रलंबित खातेदारांना मोबदला वितरित केला जाईल, असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल उद्योकज मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्योजकांनी उद्योग उभारणीतील अनुभव, भांडवल गुंतवणूक, आर्थिक नियोजन तसंच अडचणींवर मात करण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केलं. परभणीसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

****

बीड जिल्हा पोलिस दलाकडून अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या, अपघातासंबंधीच्या विविध मदत आणि विमा योजनांचा लाभ त्यांना जलद गतीनं मिळावा, यासाठी राज्य शासनाकडून काल बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी दोन अत्याधुनिक टॅब्सचं वितरण करण्यात आलं. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते हे टॅब्स संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले.

****

मराठवाड्यातली मानाची समजली जाणारी शिवशंभो कावड यात्रा काल लातूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. रेणापूर तालुक्यातल्या माकेगाव इथून निघालेल्या या कावडीचं सिटी हिल्स कॉलनी परिसरातल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन होताच ‘हर हर महादेव’ च्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. ही कावड यात्रा पाच दिवसांचा प्रवास पूर्ण करत शिखर शिंगणापूर इथे पोहोचणार असून, लातूरहून तुळजापूर मार्गे सोलापूरच्या दिशेननं पुढे रवाना झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसंच दिवंगत सफाई कामगारांच्या वारसांना शासन निर्णय तसंच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क पद्धतीने काल शासकीय सेवेत घेण्यात आलं. महापौर समीर राजूरकर यांच्याहस्ते ३१ वारसांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे मन लावून काम करण्याचं आवाहन महापौरांनी यावेळी केलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानात श्री रामनवमी उत्सवानिमित्त आज श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणा यांची मिरवणूक काढण्यात आली. शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

****

छत्तीसगडमध्ये खेलो इंडिया आदिवासी खेळांना आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होईल. तीण एप्रिलपर्यंत चालणार्या या स्पर्धेत सुमारे ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले तीन हजाराहून अधिक आदिवासी खेळाडू आणि अधिकारी सहभागी होतील.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...