Saturday, 7 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

गृहमंत्री अमित शहा आज उत्तराखंड सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या जन जन की सरकार चार साल बेमिसालया कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. यावेळी गृहमंत्री राज्याच्या विकासाशी निगडीत अनेक योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

****

भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० विमान अपघातात प्राण गमवावे लागलेले स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या निधनाबद्दल भारतीय वायुसेनेनं शोक व्यक्त केला आहे. भारतीय वायुसेनेचे सर्व कर्मचारी त्यांच्या निधनाबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत असून या कठीण काळात शोकाकूल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं हवाई दलानं एक्सवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआयया विमानाचा आसाममधील जोरहाटपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलाँग परिसरात काल अपघात झाला. हे विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. हे विमान जोरहाट इथून उड्डाणानंतर सायंकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी संपर्काबाहेर गेलं होतं, त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. 

****

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर सोमवारी सभागृहात मध्ये चर्चा होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चपासून सुरू होत असून त्याच दिवशी या ठरावावर चर्चा अपेक्षित आहे. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षांनी लोकसभा सचिवालयाकडे हा अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के. सुरेश  आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावतीने ही सूचना मांडली जाणार आहे.

दरम्यान काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं नऊ आणि दहा मार्च रोजी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

****

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यासाठी तरतुदी केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युनेस्को यादीत समाविष्ट असलेल्या १२ किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी विशेष तरतुद केली आहे. जिल्ह्यातील शिवरायांच्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे प्रकल्प तसंच सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली इथल्या महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धारासाठी २६८ कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली आहे.

महात्मा फुले यांची जयंती तसंच जन्मगाव कटगुण इथं त्यांचं भव्य स्मारक उभारणी तसंच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी  स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे.

****

दोन लाख रुपयांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा काल अर्थसंकल्पात करण्यात आली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ होणार असून, २१ हजार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराची प्रोत्साहन राशी मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली.

****

युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेले राज्यातील ५२ शेतकरी देशात सुखरुप परतले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळं हे शेतकरी आखाती देशात अडकले होते. यामध्ये अकोल्यातील तीन शेतकरी होते, या तिघांसह ५२ शेतकरी आणि दोन अधिकारी दिल्ली विमानतळावर सुरक्षित पोहचल्याचं आमच्या अकोल्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कृषि विभाग आणि आत्मा’, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड इथं येत्या १५ मार्चपासून तीन दिवसीय जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात विविध १०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसंच विविध विषयांवर शेतकरी-शास्त्रज्ज्ञ परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी महोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि शेतमालाची खरेदी करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

****

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिकच्या मखमलाबाद-हनुमान वाडी इथल्या ७५३ एकरात हरितक्षेत्र विकास प्रकल्पातील नगररचना योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने रद्द झाली आहे. या योजनेची मुदत संपुष्टात आल्यानं ही योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार देवयानी फरांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर ही योजना रद्द करण्याबाबत न्यायालयाला कळवण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागानं संबंधित नगररचना सहाय्यक संचालकांना पत्र दिलं होतं. या पत्राच्या अनुषंगानं याबाबतची उच्च न्यायालयात सुरू असलेली शेतकऱ्यांच्या कृती समितीची याचिका निकाली काढण्यात आलेली आहे. २०१९ मध्ये या जागेत नाशिक स्मार्ट सिटी विकास महामंडळामार्फत हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती. या योजनेस प्रस्तावित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला मात्र, यानंतरही स्मार्ट सिटीकंपनीनं हरितक्षेत्र राबविण्यासाठी प्रयत्न केले होते.

****

गोंदिया इथल्या बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश वाजपेयी यांनी एका अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीनंतर नवजात बाळ भंडाऱ्यातल्या पांढराबोडी इथं अडीच लाखात विकलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टरांसह सहा संशयितांना अटक केली. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया इथं आली होती असं पोलिसांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...