Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची व्यक्तीच अनुसूचित
जाती-जमाती दर्जासाठी पात्र-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
·
रेल्वेचं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल
·
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांना विधानपरिषदेत
निरोप
·
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसचं लोकार्पण
आणि
·
जागतिक क्षयरोग दिनी विविध उपक्रमांतून जनजागृती
****
हिंदू, शीख किंवा
बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमाती दर्जासाठी दावा करू
शकेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आंध्रप्रदेश
उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या
सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. या तीन धर्मांव्यतिरिक्त
इतर धर्मांत धर्मांतर केलेली कोणतीही व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक
कायद्याचं संरक्षण मिळवू शकत नाही, असं स्पष्ट करत, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
****
पश्चिम
आशिया भागात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी संवाद आणि कूटनीतीच उपयोगी पडेल,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत बोलत
होते. या प्रदेशातला तणाव कमी करण्यासंदर्भात संबंधित राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून
चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
भारतीय
रेल्वेनं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, प्रवासाला
आठ तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकिट रद्द केलं, तर कुठलाही परतावा
मिळणार नाही. प्रवास सुरू व्हायच्या अर्धा तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण
बदलण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी
नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
****
राज्य विधान
परिषदेतल्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने काल सभागृहात त्यांना निरोप देण्यात
आला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो” असा
मोठा संदेश देत, सर्व सदस्यांच्या कार्याचा गौरव केला.
निवृत्त
झालेल्या सदस्यांमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, तसंच संजय केणेकर यांचा समावेश आहे.
****
जादा परताव्याचं
आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत दिला जावा, तसंच याप्रकरणी
आरोपींना दोन पेक्षा जास्त वेळा स्थगिती घेता येऊ नये, असा बदल
संबंधित कायद्यात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. या बदलामुळे सरकारला आरोपींच्या मालमत्तेची विक्री
करता येईल आणि ठेवीदारांचे पैसे लवकर देता येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नाशिकमधल्या
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन केलं. या प्रकरणात
आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून, महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात विशेष
तपास पथकामार्फत तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. खरातला ज्यांनी मदत केली असेल
त्यांची चौकशीही केली जाईल असंही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र
कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक २०२६ काल विधानसभेत मंजूर झालं.
****
राज्य परिवहन
महामंडळ-एसटीच्या ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं काल मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य
मान्यवर उपस्थित होते. सुमारे तीन हजार बसेस टप्प्याटप्प्यानं राज्यभर धावणार असल्याचं,
सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
****
बारामती
विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा राष्ट्रवादी
काँग्रेसचा प्रयत्न असून, त्याकरता विरोधी पक्षांशी चर्चा करु,
असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या सहा एप्रिलला उमेदवारी अर्ज
भरणार आहे.
****
जागतिक
क्षयरोग दिन काल पाळण्यात आला. नागरिकांमध्ये क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचार याबाबत
जागरुकता वाढावी, यासाठी ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबवण्यात आले.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात चौका इथं मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अभय धानोरकर यांनी जागतिक क्षयरोग दिनाच्या घोषवाक्याचं महत्त्व विशद करत, क्षयरोग उच्चाटनासाठी
सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं.
बीड इथं
काल क्षयरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
जितिन रहेमान यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन झालं. यावेळी क्षयरुग्णांना पोषण आहाराच्या
किटस् चं वाटप करण्यात आलं.
लातूर जिल्हा
क्षयरोग केंद्राच्या वतीने काल जनजागृती फेरी आणि इतर उपक्रम पार पडले. ‘क्षयमुक्ती’चा
निर्धार करत, जिल्ह्यात १०० दिवसीय विशेष क्षयरोग शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात
आला.
हिंगोली
इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एक्स-रे
व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शंभर दिवसांच्या क्षयरुग्ण शोध मोहीमेची सुरूवात करण्यात
आली. या व्हॅनच्या माध्यमातून १७८ जोखीमयुक्त गावांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात
येणार आहे.
धाराशिव
इथंही १०० दिवसीय मोहिमेचं उद्घाटन काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या
प्रमुख उपस्थितीत झालं. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या १८५ जोखीमग्रस्त गावांची निवड
करण्यात आली आहे. यावेळी निक्षय मित्रांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसंच
क्षयरुग्णांना फूड बास्केटचं वाटप करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
पुंगळा इथल्या अर्जुन जगताप या तेरा वर्षांच्या थॅलेसिमियाग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
करण्यात आली. शहरातल्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं ही अवघड
शस्त्रक्रिया केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेली या शस्त्रक्रियेनं या बालकाला
नवजीवन मिळालं.
****
नांदेड
महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे वीरेंद्रसिंह गाडीवाले यांची, तर महिला
शिक्षण आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या सदिच्छा सोनी यांची बिनविरोध निवड
करण्यात आली. उपसभापतीपदी निरंजना लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
**
लातूर महानगरपालिकेच्या
स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे सचिन बंड्डापल्ले यांची, तर परिवहन
समिती सभापतीपदासाठी फैसल खान कायमखानी यांची निवड करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यातल्या
चौदा अत्याचार पीडित व्यक्तींच्या वारसदारांना सामाजिक न्याय विभागात, बुलडाणा,
अकोला, बीड, अमरावती,
अहिल्यानगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शिपाई आणि
सफाईकामगार या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या
हस्ते काल या नियुक्तींचे आदेश संबंधितांना वितरीत करण्यात आले.
****
बीड जिल्ह्यात
चौसाळा इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर काल पार पडलं. शेतकरी, ग्रामस्थ,
महिला बचत गट, आणि विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक
घटकांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा थेट लाभ
घेतला.
****
केंद्र
शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या अमृत मित्र उपक्रमात
परभणी महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे.
दिल्लीत भारत मंडपम इथं झालेल्या विशेष सोहळयात परभणी शहरातल्या २९ महिला बचतगटांच्या
प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या महिलांना विविध राज्यांमधल्या महिला बचत गटांशी संवाद
साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात
झालेल्या सत्कारामुळे या महिलांचा आत्मविश्वास वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
जालना इथं
महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा काल उत्साहात पार पडल्या. जिल्हाधिकारी
आशिमा मत्तिल यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख
उपस्थितीत स्पर्धांचं उद्घाटन झालं. कर्मचाऱ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
****
हिंगोली
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा काल सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ग्रामसेवकांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र
देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. गॅस वितरणात पारदर्शकता राखत अवैध विक्री तसंच
जादा दर आकारण्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
No comments:
Post a Comment