Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 March 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३० मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
सध्याच्या
भू–राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना जारी करुन २१ राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसिन वितरणाला परवानगी दिली आहे.
ज्या भागांमध्ये केरोसिनचा वापर बंद करण्यात आला होता, त्या भागात केवळ घरगुती
वापरासाठी केरोसिन वितरणाची परवानगी देण्यात आली असल्याचं, पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायू मंत्रालयाने सांगितलं. ही सूचना तत्काळ अमलात आणण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या स्वत:च्या मालकीच्या विक्री केंद्रांवर पाच
हजार लिटर केरोसिन साठवता येऊ शकेल. वितरण प्रक्रिया वेगवान करण्यासाठी विक्रेते आणि
वहातूकदारांना परवानाविषयक काही विशिष्ठ नियमांमधून सवलत देण्यात आली आहे.
****
पश्चिम
बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
झाली. तामिळनाडुमधल्या सर्व २३४ जागांसाठी आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यातल्या
१५२ जागांचा यामध्ये समावेश आहे.
****
शेतकऱ्यांच्या
शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वाढवण बंदर परिसरात तब्बल १२०० एकर
जागेवर जगातली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्यात येणार असल्याची माहिती, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचं
भूमिपूजन आणि विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. भौगोलिक मानांकन प्राप्त
शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी परदेशांसोबत व्यापार करार केले
जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
धुळे
इथं ग्राहकांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विहीत कालमर्यादेत न करणं आणि
ग्राहकांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी
शहरातल्या ओम गॅस एजन्सीच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित गॅस
एजन्सीला भेट दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
केंद्र
सरकार पुरस्कृत, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत वर्ष २०२५–२६ साठी
असाक्षरांची चाचणी काल घेण्यात आली. लातूर जिल्ह्यात एकूण १७ हजार २३६ असाक्षरांना
साक्षर करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. काल चार हजार ७०२ जणांनी ही परिक्षा
दिली.
****
रामसर
दर्जा असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात
'ग्रेट व्हाईट पेलिकन' किंवा 'रोजी पेलिकन' या पक्ष्यांचं पहिल्यांदाच दर्शन झालं. या राजबिंड्या
पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याने निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांनी या रामसर स्थळाची निवड करणं, हे या परिसंस्थेच्या आरोग्याचे शुभसंकेत मानले जात आहेत. आता मार्च महिन्याच्या
शेवटी, उन्हाची चाहूल लागताच ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी म्हणजेच युरोप
आणि मध्य आशिया परतत असल्याची माहिती, वन्यजीव उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी
दिली.
****
लातूरमध्ये
उन्हाचा पारा वाढला असून, पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
व्हावी या उद्देशाने पक्षीमित्र महेबुब चाचा यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. त्यांनी
लातूर शहरातल्या नाना-नानी पार्क येथे नागरिकांना मोफत मातीच्या कुंड्यांचं वाटप केलं.
या कुंड्यांना झाडावर, घरावर, अंगणात बांधून पक्ष्यांना एक तांब्याभर
पाणी भरून ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
चैत्र
एकादशीचा सोहळा काल पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. जवळ जवळ तीन लाख भविकांनी
पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलं.
****
शेकडो
वर्षाची परंपरा असलेला नाशिकचा श्रीराम रथोत्सव काल उत्साहात साजरा झाला. श्री काळाराम
मंदिर देवस्थानच्या वतीने दरवर्षी राम नवमीला राम जन्मोत्सवानंतर कामदा एकादशीला श्रीराम
रथोत्सव आयोजित केला जातो. अहिल्याराम व्यायामशाळा आणि रास्ते आखाडा तसंच परंपरेनं
स्वीकार मंदिराच्या पूर्व दरवाजा इथून आधी गरुड रथ आणि त्यानंतर श्रीराम रथ भाविकांनी
ओढत नेला.
****
पहिल्या
खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा छत्तीसगडच्या रायपूरमध्ये सुरू आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून
यवतमाळच्या साक्षी बुरकुलेने भारोत्तोलनात ८६ किलो गटात १५० किलो वजन पेलून सुवर्ण
पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत या आधीच नागपूरच्या तन्वी धूर्वे हिने जलतरणात सुवर्णपदक
पटकावलं आहे.
या
स्पर्धेत १५ सुवर्ण पदकांसह कर्नाटक पहिल्या, नऊ सुवर्ण पदकांसह ओडिशा
दुसऱ्या, तर पाच सुवर्ण पदकांसह अरुणाचल प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.
****
महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर संघानं सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी
कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने विजेतेपद पटकावलं. अंतिम किताबी लढतीत अमृताने कोल्हापूरच्याच वेदिका सासणे
हिचा सात-शून्य अशा फरकाने पराभव केला. महिला कुस्ती स्पर्धेला शासनाचा भक्कम पाठिंबा
असल्याचं, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमात
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment