Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
विरोधकांनी विविध मुद्यांवरुन केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही बाधित झालं.
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अकरा वाजता कामकाज सुरु झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांच्या गोंधळात तो होऊ शकला नाही. काही सदस्य सभागृहाच्या कामकाजात
व्यत्यय आणत असून हे संसदीय शिष्टाचाराला अनुसरुन नसल्याचं सांगत बिर्ला यांनी कामकाज
दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर परत कामकाज सुरु झाल्यावरही विरोधकांनी
विविध मुद्यांवरुन गदारोळ करण्यास सुरुवात केली, त्यामुळे
सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधल्या
गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेअंतर्गत
आतापर्यंत चार लाख नऊ हजार कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.
आज पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ
हस्तांतरणाद्वारे, १८ हजार ६४० कोटी रुपये जारी करण्यात येतील.
त्यासोबतच आसाममध्ये ४७ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी देखील
पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
काल इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. या चर्चेदरम्यान
पश्चिम आशियातली गंभीर परिस्थिती, या भागातला वाढता तणाव, जीवित आणि मालमत्तेचं झालेलं नुकसान याबाबत चिंता व्यक्त केल्याचं पंतप्रधान मोदी
यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय नागरीकांची सुरक्षितता त्याचबरोबर
इंधन आणि आवश्यक वस्तुंची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्याला भारताचं सर्वोच्च प्राधान्य
राहील,
असंही त्यांनी नमूद केलं. शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध
असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.
****
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज
योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३२ हजार ७६५ कोटी रुपयांचं अनुदान दिलं असून, वीजमाफीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी
सांगितलं. विधानसभेत नियम २९३ अन्वये सत्ताधारी सदस्यांच्या प्रस्तावावरील चर्चेला
ते उत्तर देत होते. सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
जाहीर केली,
तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सवलत
दिली जाणार आहे,
याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल असं ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेसाठी १२० कोटींची तरतूद केली, यात शेतमजूरांचा समावेश केला असं सांगत भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत असलेल्या
विविध योजनांची माहिती दिली.
****
राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी
नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली
आहे. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे
रितसर नोंदणी करुन परवाना घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील.
प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणं आणि अनियमितता टाळणं हा यामागील उद्देश
असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून “एक खिडकी योजना” सुरू करण्याची
तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणं, कागदपत्रांची
पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पाडली जाणार असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं उद्या १४ मार्चला
‘हिंद-दी-चादर’ हा नाट्य आणि गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड अशा आठ शहरात हा कार्यक्रम होणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम
संपूर्णपणे विनामूल्य असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक
कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलं आहे.
****
येत्या १७ ते २० मार्च दरम्यान
राज्यातल्या काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह
पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार
ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसंच मध्य महाराष्ट्रातल्या भागांमध्ये दिसून येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी
पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेऊन, त्यानुसार शेतीची कामं करावीत, काढणी केलेली पिकं सुरक्षित
ठिकाणी साठवून ठेवावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य बियाणे-महाबीजच्या
उत्तरदायित्व निधीतून अकोला जिल्ह्यातल्या दहा शाळांमधल्या ग्रंथालयांना जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं. दर्जेदार पुस्तकं आणि कपाटं या
ग्रंथालयांना देण्यात आली. डिजिटल युगात ग्रंथालयांमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना
दर्जेदार साहित्य उपलब्ध होईल आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा विश्वास मीना यांनी यावेळी व्यक्त केला.
****
पुण्यातलं जनसेवा प्रतिष्ठान
आणि अकोला जिल्हा निवृत्तिवेतनधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला शहरातल्या
ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार-पोषण आणि विविध चिकित्सा पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी
एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
****
No comments:
Post a Comment