Monday, 16 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, शेतीच्या उत्पादन खर्चात २५ टक्के कपात होऊन उत्पादनात वाढ-मुख्यमंत्र्यांची माहिती

·      चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहिर; बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी

·      उन्हामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत आजपासून बदल

·      छत्रपती संभाजीनगरमध्ये `हेरिटेज वॉक’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना संगीतमय अभिवादन उत्साहात

आणि

·      बीसीसीआयकडून रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राजचा सन्मान

****

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून, या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च हा २५ टक्के कमी झाला आहे, तर उत्पन्न मात्र वाढल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीदान समारंभात ते काल बोलत होते. राज्यात केलेली कर्जमाफी ही तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना आहे, मात्र शाश्वत शेतीचं दीर्घकालीन प्रारूप तयार करण्यात राज्य सरकारसह इतर संस्था आणि कृषी स्नातकांनी वाटा उचलावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखांतल्या एकूण चार हजार ६०२ स्नातकांना या सोहळ्यात पदवी, पदव्युत्तर पदवी, आणि आचार्य पदवीनं गौरवण्यात आलं.

**

दरम्यान, राज्यातल्या इंधन प्रश्नासंदर्भात योग्य उपाय योजना करण्यात आली असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने, राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार, शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी १२ अशी ठेवण्यात आली आहे.

****

उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असं आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेड इथं काल जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सव तसंच प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासन शेतकऱ्यांसाठी विविध भरीव योजना राबवत असून, नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या महोत्सवात एकूण १२५ स्टॉल लावण्यात आले आहेत.

****

परभणी इथं आज आणि उद्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, परिसंवाद आणि चर्चासत्र, तसंच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासारख्या विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

एलपीजी गॅस वितरकांकडे गॅसचा अखंडित पुरवठा सुरू असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. मागच्या दोन दिवसांत गॅस नोंदणीत घट झाल्याचं मंत्रालयाने सांगितलं. १३ मार्चला ८८ लाख नोंदणी झाली होती, तर काल ७७ लाख नोंदणी झाली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी भिती बाळगू नये असं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.

****

निवडणूक आयोगानं चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका काल जाहिर केल्या. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं नऊ एप्रिल रोजी, तामिळनाडूमध्ये २३ एप्रिलला, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

दरम्यान, राज्यातल्या बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार असल्याचंही आयोगानं जाहिर केलं. या सर्व निवडणुकांची मतमोजणी चार मे रोजी होणार आहे.

****

धाराशिव - छत्रपती संभाजनीगर लोहमार्गाने, बीड जिल्हा हा उत्तर भारत आणि दक्षिण भारताशी जोडला जाऊन, जिल्ह्याचं ठिकाण लोहमार्गाचं जंक्शन होईल अशा दृष्टीने बीड जिल्ह्याचा विकास होणार असल्याची माहिती खासदार भागवत कराड यांनी दिली. बीड इथं स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने कराड यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा विविध लोहमार्गाने जोडला जाणार असल्याने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड हे लोहमार्गासाठी स्वतंत्र डिव्हीजन राहिले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचंही कराड यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला, यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्यातर्फे काल ‘हेरिटेज वॉक’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना संगीतमय अभिवादन हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांना शहराच्या इतिहासाशी निगडित विविध स्थळांचं महत्त्वं, त्यांची वैशिष्ट्यं आणि शिवकालीन संदर्भ यांची सविस्तर माहीती इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी दिली. महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर बिल्डर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यावेळी उपस्थित होते. शहराच्या ऐतिहासिक वारशाची माहिती सांगणारे असे ११ हेरिटेज वॉक या वर्षात होणार असल्याचं महापौर राजुरकर यांनी यावेळी सांगितलं. शहराच्या ऐतिहासिक वैभवाची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक, इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

****

छत्रपती संभाजीनगर इथंल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २० मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली.

****

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील, आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यात विशेषतः परभणी जिल्ह्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन बोर्डीकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

****

हिंगोली इथल्या न्यायालयात काल राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यावेळी प्रलंबित १२८ आणि दाखलपूर्व तीन प्रकरणं निकाली काढण्यात आली.

नांदेडमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६ हजार १९९ प्रकरणं निकाली निघाली, या प्रकरणांमध्ये ३८ कोटींची तडजोड करण्यात आली.

****

जालना पोलिस दलातल्या १५६ पोलिस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत काल लेखी परीक्षा पार पडली. मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एक हजार ९४४ उमेदवारांनी परीक्षा दिली.

****

जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त नेत्रतज्ञ संघटनेतर्फे परभणी इथं काल जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातले नेत्रतज्ञ आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. काचबिंदूला रोखण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणं हाच एकमेव उपाय असल्याचं, संघटनेचे सचिव डॉ. विजयसाई शेळके यांनी यावेळी सांगितलं.

****

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जनसहयोग या सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘संपूर्ण वन’ जैवविविधता उद्यानाला भेट देऊन तिथल्या विविध वृक्षसंपदेची पाहणी आणि वृक्ष संवर्धनाची माहिती घेतली. पडेगावच्या अहिल्यादेवी होळकर शेळी आणि मेंढी पालन केंद्र परिसरात तब्बल २५ एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या या वृक्षराईत सुमारे चारशे प्रकारच्या देशी, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींच्या प्रजातींचं संवर्धन करण्यात येत आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयचा नमन पुरस्कार सोहळा काल नवी दिल्लीत पार पडला. दिग्गज खेळाडू रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना, कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने, तर महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला महिला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०२४-२५ या क्रिकेट हंगामात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना, तर सर्वोत्कृष्ट देशांतर्गत खेळाडू म्हणून आयुष म्हात्रे आणि इरा जाधव यांना गौरवण्यात आलं. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठीचा पुरस्कार मुंबई क्रिकेट संघटनेला देण्यात आला.

****

लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...