Friday, 6 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याचा २०२६–२७ या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होणार आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडतील. 

****

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट सह्या आणि आदेश जारी करून सरकारी जमिनींचे व्यवहार करण्याच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी याच आठवड्यात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तक्रारदारांनी या प्रकरणी पंधरा दिवसांत या पथकाकडे तक्रार दाखल करावी, असंही त्यांनी सांगितलं. शहरातल्या ब्रिजवाडी भागातल्या २०० कोटी रुपये किंमतीच्या शासकीय जमिनीचा बेकायदा व्यवहार करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीनं जारी झाल्याप्रकरणी संपूर्ण अहवाल मागवून घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. या जमिनीचा ताबा सध्या सरकारकडेच असल्यामुळे या बनावट आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.

****

अग्नीविरांच्या सैन्य दलातील निवृत्तीनंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. २०२२ ते २४ या कालावधीत सैन्य दलात भरती झालेल्या अकरा हजार अग्निवीरांपैकी आठ हजार २५० अग्निवीर निवृत्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

भारताच्या दीर्घकालीन विकास प्रवासात शेती हा एक धोरणात्मक आधारस्तंभ असून, सरकारने कृषी क्षेत्राला सातत्याने बळकटी दिली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण परिवर्तनाला चालना देणारा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. निर्यातीवर लक्ष केंद्रित करून रसायनमुक्त शेती आणि नैसर्गिक शेती मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांना चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक बाजारपेठा उघडत असताना आणि मागणीचं स्वरूप बदलत असताना, आपल्या शेतीला अधिक निर्यात-केंद्रित करण्यावर देखील लक्ष केंद्रीत करणं महत्वाचे असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

यंदा एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या उत्तराखंडच्या चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणीला आजपासून सुरूवात झाली आहे. पर्यटन विभागाचं अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप, टुरिस्ट केअर उत्तराखंड च्या माध्यमातून भाविकांना नोंदणी करता येणार आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे १९ एप्रिलला, केदारनाथ मंदिराचे दरवाजे २२ एप्रिलला आणि बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे २३ एप्रिल रोजी उघडतील अशी माहिती पर्यटन विभागाचे सचिव धीरज गरब्याल यांनी दिली.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी पालखी सोहळा, पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव आणि पाळणा सोहळा साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

****

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या श्रीकला संस्कार न्यास या संस्थेच्या ‘दगडी भिंत’ या नाटकाने सहा लाख रूपयांचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज या स्पर्धेचे अंतिम फेरीचे निकाल घोषित केले. बारामतीच्या नटराज कला मंडळाच्या ‘कर्ण’ या नाटकाला चार लाख रूपयांचं द्वितीय आणि मुंबईच्या नवहिंद बाल मित्र मंडळाच्या ‘द हिंदू लेडी’ या नाटकाला दोन लाख रूपयांचं तृतीय पारितोषिक मिळालं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहराच्या खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी इतिहास आणि वारसाप्रेमींना मिळणार आहे. रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थांच्या दुकाने आणि ठेल्यांनी सजलेल्या शहरातील बुढीलेन परिसरात इंटॅकच्या वतीने उद्या शनिवारी सायंकाळी सात वाजता हा हेरिटेज फूड वॉक आयोजित केला जाणार आहे. या वॉकमध्ये इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी बुढीलेनचा इतिहास आणि खाद्यसंस्कृतीची परंपरा सांगणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...