Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १२ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
घरगुती वापराच्या सिलिंडरची
नोंदणी केल्यानंतर सरासरी अडीच दिवसांत पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून
जाऊ नये,
असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त
सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीबद्दल
त्या संबोधित करत होत्या. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे एलपीजीच्या उत्पादनात २५
टक्के वाढ झाली आहे, असं त्या म्हणाल्या. तसंच, या काळात सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल
असा इशाराही शर्मा यांनी दिला.
दरम्यान, सरकार स्वयंपाकाच्या गॅसची आयात सुरळीत आणि मुक्तपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करत आहे, असं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने म्हटलं
आहे.
****
नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या
आर्थिक वर्ष २०२३-२४च्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र ४५ गुणांसह देशात
पाचव्या स्थानी आहे. ओडिशा पहिल्या, गोवा दुसऱ्या, झारखंड तिसऱ्या, तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. देशातल्या
विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन आणि तुलनात्मक विश्लेषण या अहवालात केलं
जातं. त्यानुसार, आर्थिक व्यवस्थेत किरकोळ बदल करून महाराष्ट्रासह
इतर काही राज्यांनी परिस्थिती स्थिर राखल्याचं अहवालात म्हटलं आहे. कर्जाची पातळी कमी
ठेवून व्याजाचा बोजा नियंत्रणात ठेवल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था स्थिर राहिली, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
यांच्या ११३ वी जयंती आज साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कराड
इथल्या प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण
यांच्या विचारांवर काम करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या शाळांमध्ये भौतिक
सुविधा वाढवणं, शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने
करणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणं, यावर
राज्य शासन भर देत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत
दिली. मराठी माध्यमाच्या शाळांमधली पटसंख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत असली, तरी सरकारच्या प्रयत्नांमुळे २०२६–२७ पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या
वाढताना दिसेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या
शेळका धानोरा इथं शबरी आवास योजनेमधून मंजूर झालेल्या ५४ घरकुल लाभधारकास पंडीत दिनदयाळ
उपाध्याय अर्थसहाय योजनेअंतर्गत अनुदान वितरीत करण्यात आलं आहे. शबरीआवास योजनेअंतर्गत
अनुसूचित जमाती समाज बांधवासाठी हे घरकूल उपलब्ध झाले आहेत.
****
नांदेड इथं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएम - उषा योजनेच्या माध्यमातून आठ
दिवसीय नेट,
सेट आणि गेट मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते काल या कार्यशाळेचं उद्घाटन झालं.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत
तालुक्यातल्या चापडगाव इथं पोलिसांमौ शेतातून अफूची झाडं जप्त करून, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत
४७ लाख ६४ हजार रुपयांची २३८ किलो वजनाची ही झाडं जप्त करण्यात आली.
****
लातूर इथं झालेल्या राज्यस्तरीय
‘महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा मल्ल रोहन पवार यानं विजेतेपद
पटकावलं. पुण्याच्या रामा कांबळे याच्यावर ११ गुणांनी विजय मिळवत त्यानं हा मानाचा
किताब पटकावला.
****
नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती
करताना वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करावे असे निर्देश
ग्रामीण विभाग गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. मंत्रालयात भोयर यांच्या
अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार आणि
वाढता वापर,
त्या माध्यमातून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे यांचा नवीन
पोलीस ठाणे निर्मितीबाबतच्या प्रस्तावात विचार केला जावा असं त्यांनी सांगितलं.
****
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या
शिक्षणाचा अधिकार -आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पालकांना १८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता
येतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार हजार ७८१ जागांवर या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना
प्रवेश दिले जाणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या
स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्या संयुक्त
विद्यमाने येत्या १५ मार्च रोजी जयसिंगपुरा परिसरात विशेष ‘हेरिटेज वॉक’चं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानानं ४० अंश सेल्सिअसची पातळी
गाठली आहे. उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून
राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment