Saturday, 28 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं वेगानं पूर्ण करावीत, मुदतीत न होणाऱ्या कामाच्या संदर्भात संबंधित ठेकेदारांना दंड करण्यात येईल, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. मंत्री भोसले यांनी आज नाशिक इथं कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने त्रयस्थ यंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासली जाणार असून कामांच्या दर्जाबाबतही तडजोड केली जाणार नाही, संही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते.

****

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातवर काल रात्री आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर दाखल एकूण गुन्ह्यांची संख्या आता १० इतकी झाली आहे. काल रात्री दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये एका पीडितेने फिर्याद दिली आहे, तर दुसऱ्या घटनेत एका व्यापाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ‘नमो ॲप’च्या माध्यमातून ‘मेरा बूथ सबसे मजबूत संवाद’ या उपक्रमांतर्गत आसाम आणि पुद्दुचेरी इथल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गेल्या एका दशकात आसामची प्रगती सर्वांसमोर आली असून राज्य सर्व क्षेत्रांतील विकासासाठी ओळखलं जात आहे, असं मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. विकासकामांच्या जोरावर दुहेरी इंजिन असलेलं ‘एनडीए’ सरकार पुढील पाच वर्षांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुहेरी इंजिन असलेल्या ‘एनडीए’ सरकारनं गेल्या पाच वर्षांत पुद्दुचेरीतील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, असं आणखी एका संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

****

आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशातील दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि देशानं हे संकट प्रभावीपणे हाताळलं आहे, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल एका खासगी माध्यम समूहानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेत ते बोलत होते.

****

लातूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषद समिती सभापती पदाच्या निवडीसाठी ३० मार्च, रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष सभेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना सदर विशेष सभेची नोटीस देण्यात आली आहे, असं पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नेऱ्हे – विरोळे यांनी कळवलं आहे.

****

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १३२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण वाहिन्यांसह, 'एआयआर न्यूज' संकेतस्थळ आणि 'न्यूज ऑन एआयआर' मोबाईल ॲपवर केलं जाईल. तसंच, आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथले तालवादक शरद दांडगे यांच्या ओम पंचनाद या कार्यक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. दांडगे यांनी नऊ तबले आणि एका ढोलच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीतातल्या २४ वाद्यांचा आभास निर्माण केल्याबद्दल ही नोंद करण्यात आली.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या ‘मधाचे गाव’ या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत राज्य शासनाने राज्यातल्या १० गावांना मान्यता दिली असून, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर या गावाची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. या योजने अंतर्गत बोरझर, उकळापाणी आणि प्रतापपूर या तीन गावांतील ३० मधपाळांची निवड करण्यात आली आहे.

****

अहिल्यानगर इथं आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद धाम इथं विविध धार्मिक अणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या जन्म गाव चिचोंडी ते आनंदधाम अहिल्यानगरपर्यंत शांतीयात्रा काढण्यात आली. या यात्रेत असंख्य भाविक सहभागी झाले होते.

****

प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी सध्या पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या टाटा आयपीएल स्पर्धेत पहिले दोन आठवडे तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता ‘चेन्नई सुपर किंग्स’ कडून व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...