Wednesday, 25 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      आगामी आर्थिक वर्षासाठीचं वित्त विधेयक लोकसभेत आवाजी मताने संमत

·      देशात इंधनाची कमतरता नसल्याचा पेट्रोलियम कंपन्यांकडून निर्वाळा

·      सुधारित उडान योजनेला पुढच्या दहा वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      आकाशवाणीच्या दैनंदिन प्रसारणाला आता संपूर्ण वंदे मातरम गीताने प्रारंभ

आणि

·      अशोक खरात प्रकरणी पाळंमुळं खोदून कठोर कारवाई-अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचा इशारा

****

वित्त विधेयक आज लोकसभेत संमत झालं. अनेक सुधारणा आणि नव्या तरतुदींसह केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सदनासमोर मांडलेल्या या विधेयकावर दोन दिवस झालेल्या चर्चेला सीतारामन यांनी उत्तर दिलं. सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांसह शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या -

बाईट - केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन यांच्या या उत्तरानंतर वित्त विधेयक आवाजी मतदानानं संमत झालं. त्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं, या विधेयकावरच्या चर्चेत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, भाजपचे अनुरागसिंह ठाकूर, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, भाजपचे अनूप धोत्रे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

****

देशात इंधनाची कमतरता नसल्याचा निर्वाळा भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमनं आज दिला. एलपीजी, कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत आहे, असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इंधनाचा तुटवड्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचं या संस्थांनी म्हटलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किंमतीही स्थिर असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या -

बाईट - सुजाता शर्मा

दरम्यान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गंत तसंच इतर योजनांर्तंगत सिलिंडरच्या नोंदणीचा कालावधी वाढवल्याच्या बातम्याही निराधार असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलं आहे. सिलिंडर नोंदणीसाठी शहरी भागात २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचा कालावधी कायम असून त्यात कोणताही बदल केलेला नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, पाइप गॅस सुविधा उपलब्ध असलेल्या विभागांमध्ये एलपीजी पुरवठा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही एलपीजीवर अवलंबून राहणाऱ्या ग्राहकांना ३ महिन्यात पीएनजीची जोडणी घ्यावी लागेल. पाइप गॅस जोडणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर पुरवठादाराकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर एलपीजी जोडणी कायम ठेवता येईल, असं या निर्देशात स्पष्ट केलं आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रादेशिक दळणवळणासाठीच्या सुधारित उडान योजनेला पुढच्या दहा वर्षांसाठी मंजुरी दिली. या योजनेसाठी २८ हजार ८४० कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेत, अद्याप धावपट्टीही नसलेल्या ठिकाणी शंभर विमानतळं उभारली जाणार असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुगम होणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळाने इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग-आयव्हीएफआरटी योजनेला पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली, यासाठी एक हजार आठशे कोटी रुपये खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

घरगुती गॅस सिलिंडरच्या कथित टंचाईविरोधात विरोधी पक्षांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह इतर विरोधी पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले.

****

छत्तीसगड राज्यात नक्षलवादी संघटनेचा म्होरक्या पापा राव याच्यासह एकूण १८ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. यामध्ये सात महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पापा राव याच्यावर २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केलेलं होतं. नक्षलवाद्यांनी आठ एके 46 रायफलसह अनेक हत्यारंही सरकारकडे जमा केली

****

आकाशवाणीच्या दैनंदिन प्रसारणाची सुरुवात आता वंदे मातरमया राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण प्रसारणाने होणार आहे. आतापर्यंत या गाण्याची पहिली दोन कडवीच दररोज सकाळी वाजवली जात, उद्या सकाळपासून सर्व सहा कडवी असलेलं वंदे मातरम प्रसारित केलं जाणार आहे.

****

नाशिक इथला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची पाळंमुळं खोदून कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देत होते. या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे, या संदर्भात असलेली माहिती संबंधितांनी सरकारपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात, त्यांचा मृत्यू आणि संबंधित अपघाताची चौकशी, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सदनाला सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालासह सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली जात असल्याबाबत, मुख्यमंत्र्यांनी सदनाला आश्वस्त केलं.

राज्यात सुरक्षा व्यवस्थेसाठी राबवल्या जात असलेल्या महानेत्रया सीसीटीव्ही यंत्रणेबाबतही मुख्यमंत्र्यांनी सदनाला अवगत केलं.

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरापूर्वी, अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी एफ आय आर दाखल व्हावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, नदी शुद्धीकरण मोहिमेचं अपयश, कंत्राटदारांच्या बिलाची थकबाकी आदी मुद्देही जयंत पाटील यांनी मांडले.

****

लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातचा कोठडीत मृत्यू होण्याची भीती जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. खरात याला चोवीस तास कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात यावं अशी मागणी आव्हाड यांनी केली.

****

नितीन राऊत यांनी सरकारी शाळांचा मुद्दा मांडला. संकटाचा सामना करत असलेल्या या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासह अन्य सोयीसुविधा पुरवण्याची मागणी राऊत यांनी केली.

****

भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६ आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधानसभेत एकमताने मंजूर झालं. ॲसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल अशा तरतुदी या विधेयकात आहेत.

महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक २०२६ आज विधानपरिषदेतही मंजूर झालं. कुळाला मालकीहक्क दिल्यानंतर दहा वर्षांनी विक्री परवानगी देताना आकारायची चाळीसपट रक्कम रद्द करणं, वर्ग २ ची जमीन वर्ग १ ची करूनच खरेदी करणं आदी तरतुदी या विधेयकात आहेत.

विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नाना पटोले, किशोर जोरगेवर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ मार्फत ३० मार्चपर्यंत मतदारांच्या घरी भेटी देऊन मतदार यादी मॅपिंग आणि पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निरीक्षकांना दिले आहेत. जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये मतदान केंद्रस्तरीय निरीक्षक यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी स्वामी बोलत होते.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...