Tuesday, 17 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर

·      राज्यसभेसाठी महाराष्ट्रासह १० राज्यांमधल्या २६ जागांवरची निवडणूक बिनविरोध 

·      छत्रपती संभाजीनगर इथं गॅस उपलब्धतेबाबत सीएमआयएची पेट्रोलियम कंपनीसोबत बैठक

·      ज्येष्ठ चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार 

आणि

·      नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

****

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ काल विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. या विधेयकात जबरदस्ती, धोक्याने, प्रलोभने दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून केलं जाणारं धर्मांतर थाबंवण्यासाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सादर करताना, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी असल्याचं सांगितलं. अनेक वेळा धर्मांतराच्या मुद्द्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. प्रचलित कायद्यात याबाबत सुस्पष्ट तरतुदी नाहीत, त्यामुळे नव्या कायद्याची गरज असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, पण सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माचा अवलंब करायचा अधिकार असला तरी काही मर्यादा आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

धर्मस्वातंत्र्य विधेयकानुसार ज्याच्यावर धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप आहे त्यालाच निर्दोषत्व सिद्ध करावं लागणार असल्याने, ही अन्याय्य बाब असून यामुळे गैरवापर होईल, अशी भीती सदस्य भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

धर्मस्वातंत्र्य विधेयक हे संविधानाच्या विरोधात आहे, अशी टीका अस्लम शेख यांनी केली. यामुळे दोन सज्ञान व्यक्तींना एकमेकांशी विवाह करायचा असेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी भीती शेख यांनी व्यक्त केली.

हे विधेयक एकतर्फी असून, केवळ एका धर्माला लक्ष्य करण्यासाठी आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे सदस्य रईस शेख यांनी यावेळी केला.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलतांना, या विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

**

विनियोजन विधेयक २०२६ काल विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. त्याआधी अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली.

**

जलजीवन अभियानात महाराष्ट्रात आतापर्यंत २६ हजार ४९९ कामं पूर्ण झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या अभियानांतर्गत राज्यभरात ५१ हजार ५६० योजना सुरू असून यापैकी २५ हजार ६१ योजना प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

**

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार देणं रुग्णालयांना बंधनकारक असून, अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जात असल्याचं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. अशा ३३७ प्रकरणात ६० लाख ४७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, १२ रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.

****

बोगस प्रमाणपत्र प्रकरणी हिंगोलीतल्या शाळेविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेनं मराठी माध्यमाची शाळा, इंग्रजी माध्यमाची असल्याचं दाखवत कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून प्रमाणपत्र सादर केलं होतं. या प्रकरणी १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेवरुन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राहुरीच्या संदर्भात महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

****

राज्यसभेच्या बिहार, हरियाणा आणि ओडिशा मधल्या ११ जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत नऊ जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.

दरम्यान, राज्यसभेच्या १० राज्यांमधल्या २६ जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे रामदास आठवले, माया ईवनाते, रामराव   डकुते, विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीचे शरद पवार यांची निवड झाली. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं एलएनजी तसंच एलपीजीच्या उपलब्धतेबाबत, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर- सीएमआयए आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – बीपीसीएल च्या अधिकाऱ्यांची काल बैठक झाली. एलएनजी पुरवठा अधिक वेगाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलं.

****

एलपीजी आणि सीएनजी संदर्भात राज्यात प्रत्येक जिल्ह्यात नेमलेल्या समित्यांनी आत्तापर्यंत एक हजार २०८ सिलिंडर जप्त केले असून, २३ गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली, ते काल विधान परिषदेत बोलत होते. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ३३ लाख ६६ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

साहित्य अकादमीचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला, २०२५ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. बाविस्कर हे जळगाव जिल्ह्याच्या पिंपराळा इथल्या पीएम मुंदडे माध्यमिक विद्यालयातले सेवानिवृत्त कलाशिक्षक आहेत. या पुरस्काराबाबत आकाशवाणीशी बोलताना बाविस्कर यांनी, आनंद व्यक्त करतांनाच, आपण निरपेक्ष भावनेनं काम करत राहण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले..

बाईट- ज्येष्ठ चित्रकार राजू बाविस्कर

****

जलजागृती सप्ताह निमित्त धाराशिव इथं तेरणा, मांजरा, सिना, बोरी आणि बेनितुरा या पाच नद्यांच्या जलपूजनाचा कार्यक्रम काल पार पडला. अधीक्षक अभियंता विजय थोरात यांचे हस्ते जलपूजन करण्यात आलं. आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित असलेल्या या सप्ताहात आज कालवा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

****

परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन काल जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात परिसंवाद, चर्चासत्र, तसंच कृषी उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिक माहिती दिली, ते म्हणाले…

बाईट-जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

****

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा नांदेडमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

दरम्यान, महापालिकेच्या या सभेत स्थायी समितीच्या १६, महिला आणि बालविकास समिती आणि ८ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली.

****

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या काल झालेल्या निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदी भाजपच्या उषा पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद सुरवसे यांची निवड झाली.

****

धाराशिव जिल्ह्यातली दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातले विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसह नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल ६२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात रस्ते विकासाला मोठी गती मिळणार असून, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

****

पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आज आणि उद्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...