Sunday, 22 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर सुनिश्चित करण्यास आपण सर्व वचनबध्द असल्याबाबत पुनरुच्चार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  आजचा दिवस आंतरराष्ट्रीय जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात मोदी यांनी आपले या विषयावर विचार मांडले. पाणी जिवनाचा अधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं ‘जिथे पाणी वाहते तिथं समानता वाढते’ या आशयानं स्त्रीया आणि मुलिंची जल व्यवस्थापनातील महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळं त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग या दिनाच्या निमित्तानं अधोरेखीत करण्यात येत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चैत्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल आपले विचार मांडले आणि मातृदेवीच्या भक्तीतून मिळणारी गाढ ऊर्जा आणि शक्ती यावर भर दिला.

मातृभक्तीत अपार शक्ती असल्याचं पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवलं. देवी मातेला केलेली वंदना भक्तांच्या मनाला सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करते, असं त्यांनी या निमित्त नमूद केलं. मोदी यांनी देवीला समर्पित एक भक्तिगीतही सादर केलं. पंतप्रधानांनी या संदर्भात सामाजिक संपर्क माध्यम एक्स वर लिहिलं की, मातेच्या भक्तीत अपार शक्ती आहे. देवी मातेची वंदना केल्यानं श्रद्धाळूंचं मन सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन कालपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पुण्याजवळ उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना-दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. थोड्याच वेळात दुपारी बारा वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला प्रारंभ होईल.

****

आखाती देशांतील युध्दजन्य परिस्थीत जागतिक ऊर्जा संकट भेडसावत असतांना, अमेरिकेहून एल.पी.जी. गॅसचा साठा घेऊन आलेलं 'पायक्सिस पायोनिअर' मालवाहू जहाज कर्नाटकात मंगळुरू बंदरात आज सकाळी दाखल झालं आहे.

****

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विभागात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च - एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या सात एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे ऑनलाइन पाठवण्याची आणि व्यवस्थापन करण्याच्या प्रणालीसाठी क्यूपीडीएस माहिती ३० मार्चपर्यंत भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. येत्या एक एप्रिलला या प्रणालीची रंगीत तालीम असल्याचंही प्रशासनानं कळवलं आहे.

****

पुण्यात वाघोलीमध्ये सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज समारोपाचा अंतिम दिवस असून महाराष्ट्र केसरी या किताबाची मुख्य लढत होणार आहे. हिंगोलीचा सिकंदर शेख विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड अशी माती विभागात तर सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सद्गिर यांच्यामध्ये गादी विभागात अंतिम लढत होणार आहे.

****

मुंबईत सुरू असलेल्या 'इंडियन ओपन' स्क्वॉश स्पर्धेत गतविजेती अनाहत सिंग आज जेतेपदासाठी खेळणार आहे. सायंकाळी सात वाजता तिची लढत इजिप्तची खेळाडू हाना मोआताजशी होणार आहे.

****

इचलकरंजीच्या श्री शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे, पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी तसंच छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक विवेक देशपांडे यांना, श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उद्योजक देशपांडे यांच्या सामाजिक, राजकीय तसंच औद्योगिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या पार्थिव देहाचा दफनविधी काल बीड इथं करण्यात आला. त्यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते.

****

राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानूसार अकोला जिल्हयात दिवाणी आणि फौजदारी न्यायालयं तसंच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगिक न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तकार आयोग यांच्यातर्फे राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतच्या माध्यमातून जिल्ह्यातली ८ हजार ३३७ प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...