Thursday, 19 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

·      नाशिक इथल्या अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकाऱ्याकडे

·      गडचिरोली इथं अकरा नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

आणि

·   गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

****

आपला देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज अयोध्या इथं श्री राम जन्मभूमी मंदिरात एका कार्यक्रमात बोलत होत्या. अयोध्येतलं हे श्रीराम जन्मभूमी मंदिर हे याच पुनर्जागरणाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. विकसित देशाची संकल्पना राम राज्याच्या वर्णनातून स्पष्ट होते, विकसित राष्ट्राचं उद्दीष्ट २०४७ साली किंवा त्यापूर्वीच साध्य होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या…

बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, राम जन्मभूमी मंदिरात दुसऱ्या मजल्यावरच्या गर्भगृहात श्रीराम यंत्र’ आज राष्ट्रपतींच्या हस्ते स्थापन करण्यात आलं. दीडशे किलो वजनाच्या या श्रीराम यंत्रावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी यावेळी केलेल्या भाषणात, गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातल्या विविध मंदिरांना अंदाजे दीडब्जाहून अधिक भाविकांनी भेट दिल्याचं सांगितलं.

****

आगामी काही वर्षांत देशाने स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करणं आवश्यक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं होत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेला ते आज संबोधित करत होते. सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं, संरक्षण सज्जता वाढवणं आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ड्रोन उत्पादन परिसंस्था उभारण्याची तातडीची गरज सिंह यांनी अधोरेखित केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातला एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत आहे, असं देखील सिंह म्हणाले.

****

राज्यातल्या प्रत्येक ग्राम पंचायतीचं डिसेंबर २०२८ पर्यंत हर घर जलप्रमाणीकरण साध्य करणं तसच पाणी पुरवठा योजनांचं सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे ठेऊन केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात आज दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनकार्यक्रमाला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली असून या नवीन टप्प्याला जल जीवन मिशन-२.० असे संबोधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यांनी संरचनात्मक सुधारणा, कालमर्यादेचं पालन, योजनांची शाश्वतता आणि नागरीक-केंद्रित सेवांचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.

****

आयुष ‌अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद, युनानी, सिद्ध उपचार पद्धती आणि होमिओपॅथी उपचारांना आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभागी करावं, अशी मागणी महाराष्ट्र राज्य डॉक्टर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. सचिन वारे यांनी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्याकडे केली आहे. आयुष पद्धती केवळ आजार बरा करत नाही, तर तो मुळापासून उपटून टाकते यामुळे आजारांवरचा खर्च आपोआप कमी होतो, अस वारे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

****

नाशिक इथला तथाकथित ज्योतिषी अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे देण्यात आला आहे. सातपुते यांनी आज स्वतः नाशिक इथे या प्रकरणाचा आढावा घेतला. अशोक रात याने एका २८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात याचं कार्यालय आणि घरातील झडतीत पेन ड्राइव्ह मध्ये ५८ व्हिडीओ सापडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गडचिरोली इथं आज ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांचावर एकूण ६८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते

****

गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. शालिवाहन शक १९४८ ला आजपासून प्रारंभ झाला. नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. सकाळी घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडूलिंबाचे डहाळे बांधून तसंच इष्टदेवतांच्या दर्शनाने हा दिवस साजरा झाला. आजचा दिवस साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने घर, वाहन तसंच सोन्याचांदीच्या आभुषणांसह इतर महत्त्वाच्या खरेदीसाठी बाजारपेठात ग्राहकांची गर्दी दिसून आली.

देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादि, उगादी, चेती चंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा, हे सण देखील आज साजरे होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतिक असून, नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त काढलेल्या 'भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठण' कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी नववर्षाच्या संकल्पाविषयी माहिती दिली. ते म्हणाले..

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुढी पाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. २२ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

**

छत्रपती संभाजीनगरासह जिल्ह्यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. पैठण इथं शालिवाहनाच्या तीर्थस्तंभ परिसरात या निमित्तानं विशेष कार्यक्रम तसंच शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं.

**

नाशिक जिल्ह्यात आज सकाळी गुढीपाडवा आणि नव वर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आल्या. पारंपारिक वेशातील महिला आणि पुरुष यात सहभागी झाले. ढोल ताशाच्या गजरावर चाललेल्या या नववर्ष स्वागत यात्रांमध्ये मर्दानी खेळ दाखवण्यात आले, शहरातील विविध संस्थांनी भगवी गुढी उभारून स्वागत केलं.

**

अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले होते. अकोल्याचं आराध्य दैवत श्री राज राजेश्वर महाराज मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झाली.

**

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मिशन ओ टू च्या वतीने महिलांनी वृक्षारोपणाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली.

**

मुंबईत गिरगाव इथं पारंपरिक वेश भूषेत तरुणांनी बाईक रॅली काढली. ढोल आणि लेझीम पथकांच्या कवायती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांचा सहभाग हे स्वागतयात्रेचं वैशिष्ट्य होतं.

****

पाणलोटक्षेत्र विकासामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वा हिवरे बाजार गावाची यशोगाथा अंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस अमेरिकीतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांच्या पथकाने आज हिवरे बाजार गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावातल्या माथा ते पायथा फिरून विविध उपक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर या पथकाने ही भावना व्यक्त केली.

****

वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांवर बीड इथं आज शेतकरी हक्क मोर्च्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली. देशातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला ४० वर्ष उलटून गेले, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, उलट दिवसेंदिवस आत्महत्यांची संख्या वाढत आहे, असं शेतकरी नेते राजेंद्र आमटे यांनी सांगितलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...