Saturday, 21 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      खरीप नियोजनासाठी देशात पाच प्रादेशिक विभागानुसार आखणी-केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती

·      उपराष्ट्रपती आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

·      रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

·      १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची एकमताने निवड

·      आज रमजान ईद-तीस दिवसांच्या उपवासाची सांगता

आणि

·      चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ

****

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी देशात पाच प्रादेशिक विभागानुसार आखणी केली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. खरीपाच्या आखणीसंदर्भात प्रादेशिक परिषदा होतील, त्यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक संघ आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश असेल, असंही चौहान यांनी सांगितलं. यंदाच्या रबी हंगामात गहू तसंच धानाचं उत्पादन समाधानकारक झालं आहे. या सोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कडधान्याचीही पूर्ण खरेदी केली जाईल, अशी ग्वाही चौहान यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात गारपिटीसह पावसाने कापणीला आलेल्या तसंच कापणी झालेल्या पिकांचं तसंच फळबागांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचा तत्काळ अंदाज घेण्याचे निर्देश पीक विमा विभाग पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्याचं, चौहान यांनी सांगितल. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन स्थिर असून, पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती, पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. त्या काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. गेल्या आठवडाभरात व्यावसायिक एलपीजीचा ११ हजार ३०० टन साठा उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती ग्राहकांना एलपीजीवरून पीएनजी अर्थात पाईप गॅस जोडणीकडे वळण्याचं शर्मा यांनी पुन्हा आवाहन केलं. त्या म्हणाल्या…

बाईट-सुजाता शर्मा

****

दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत प्रतिलीटर २ ते सव्वा २ रुपयांनी वाढ झाली आहे. औद्योगिक वापराच्या डिझेलच्या किमतीत २२ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही

****

रोखीच्या व्यवहारांवर कायम खाते क्रमांक अर्थात पॅन देण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता बँक खात्यातून वार्षिक १० लाख रुपये रोख जमा केले किंवा काढले तर पॅन नमूद करणं बंधनकारक असेल. सध्या ही मर्यादा दिवसाला ५० हजार रुपये इतकी आहे. १ एप्रिलपासून हे नियम लागू होणार आहेत.

कुठल्याही प्रकारचं ५ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं वाहन खरेदी करताना, हॉटेल तसंच रेस्टॉरंटचे बिल, किंवा सभागृहाचं भाडे जर १ लाख रुपयांपेक्षा अधिक अदा केलं, तसंच घर-जमिनीच्या व्यवहारात संबंधित मालमत्तेचं मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॅन बंधनकारक असेल.

मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईतल्या करदात्यांना नव्या आर्थिक वर्षात घरभाडे भत्त्यासाठी आयकरातून ५० टक्के तर इतर शहरातल्या नागरिकांना ४० टक्के सवलत मिळणार आहे.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात आज आयोजित 'भारतीय युवा संसदे'च्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला, तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर मुंबईत लोक भवन इथे जैन दीक्षा समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. उद्या २२ मार्चला पुण्यात उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं, चाकणकर यांनी म्हटलं आहे.

****

ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातल्या तीस दिवसांच्या उपवासाची सांगता झाली. आज सकाळी ठिकठिकाणी ईदची विशेष नमाज अदा केली जाणार आहे. दरम्यान, ईद निमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख मार्गामध्ये सकाळी ५ ते ११ या वेळेत बदल करण्यात आले असल्याचं शहर पोलिस आयुक्तालयानं कळवलं आहे. 

****

१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सभेत हा निर्णय झाल्याची माहिती परिषदेचे कार्यवाहक अजित भुरे यांनी दिली. १०० व्या नाट्यमहोत्सवाची सांगता येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान रत्नागिरी इथं होणार असल्याचंही भुरे यांनी सांगितलं.

**

नवी दिल्ली इथं आयोजित शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातली सरहद संस्था आणि दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ तसंच १२ एप्रिलला हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. 

****

रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाला ९९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त काल महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. चवदार तळे जल शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. चवदार तळ्याचा हा सत्याग्रह भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणाले.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून, मुंबईत इंदू मिल इथलं बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. गोरगरीबांना न्याय देणं, हा बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे सुरु ठेवणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

****

राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात गुरुवारी रात्री वादळी वारा आणि विजांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे एक हजार ३६४ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली, यामध्ये बागायती ६१८ हेक्टर, जिरायती ३१० हेक्टर तर ४३६ हेक्टरवरील फळपिकांचं नुकसान झालं असून, चार जनावरांचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात जोगवाडा इथं वीज कोसळून एक बैल दगावला.

बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

 

छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यातही गहू, मका तसंच कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पंढरपूर वाडी इथं खदानीतल्या पाण्यात बुडून आईसह बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत मोबदला देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधीत कारखान्यांना दिले आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...