Friday, 27 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लीटर दहा रुपये कपात

·      लॉकडाऊनची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली-अफवा पसरवल्यास कारवाईचा इशारा

·      इंधन खरेदीवर लावलेले तात्पुरते प्रतिबंध जिल्हा प्रशासनांकडून रद्द

·      मुंबईत दोन दिवसीय 'पल्स वैद्यकीय परिषदे'चं उद्घाटन

आणि

·      राज्यात ११ नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्रं उभारण्याचा निर्णय

****

देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लीटर दहा रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, डिझेलच्या निर्यातीवर साडे २१ रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावर साडे २९ रुपये प्रति लीटर दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्या म्हणाल्या

बाईट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम हा तेल कंपन्या तसंच सरकारकडून वहन केला जाणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढवून ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा असून, नागरिकांनी टंचाईच्या भीतीपोटी इंधन खरेदी करू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

दरम्यान, अशा टंचाईच्या भीतीमुळे वाढलेल्या इंधन खरेदीला प्रतिबंध म्हणून, काही जिल्हा प्रशासनांनी इंधन विक्रीवर घातलेली मर्यादा, रद्द केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीच्या जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेले याबाबतचे आदेश रद्द केले आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना याबाबत केलेल्या आवाहनात, जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत होत असल्याचं नमूद केलं, ते म्हणाले

बाईट – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही नागरिकांना पेट्रोल-डिझेलची पॅनिक खरेदी किंवा अतिरिक्त साठा करू नये, असं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप धारकांची कर्डिले यांनी आज बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. पेट्रोलपंपधारकांनी मांडलेल्या अडचणींचंही यावेळी निराकरण करण्यात आलं. पेट्रोलपंपधारकांच्या मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या. तसंच आवश्यकतेनुसार पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना देण्यात आल्या.

****

जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही नागरिकांना आपल्या गरजेपेक्षा अधिक इंधनाची खरेदी करू नये, असं आवाहन केलं आहे. अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन भरत असल्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या -

बाईट - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

****

अहिल्यानगर इथं घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरून देणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार मात्र फरार झाला. त्याच्याजवळून तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नैसर्गिक वायूच्या कथित अपहार प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि उद्योजक मुकेश अंबानी यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील ओएनजीसीच्या विहिरींमधून दीडशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या नैसर्गिक वायूचा अपहार झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.

****

अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरात रामनवमीचा उत्सव आज साजरा झाला. दुपारी बारा वाजता रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला, त्यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्यटिळा पाहायला मिळाला. रामलल्लाचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

****

आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने देशभरात आणखी ६८ ट्रान्समीटर उभारण्यास परवानगी दिली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. यासाठीच्या दोन हजार ५३९ कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती ७० टक्क्यांवरून ८१ टक्के होणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या तीन महानगरांमध्ये आकाशवाणीने मीडियम वेव्ह बॅण्डवर डिजिटल प्रसारण सुरू केल्याची माहितीही मुरुगन यांनी दिली.

****

मुंबई इथं आज दोन दिवसीय पल्स वैद्यकीय परिषदेच उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असून, यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा, रेफरल प्रणाली आणि डिजिटल हेल्थवर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या परिषदेत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या पुढील दशकासाठी महत्त्वाचा रोडमॅप मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या २ ते ३ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरु झाली असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास, या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी बळी पडलेल्या पीडित महिलांचे फोटो समाज माध्यमावर पसरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सातपूर इथल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित चित्रफिती काही लोकांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते, ते सोशल मीडिया साईटवरून हटवण्यात आल्याचं, सांगण्यात आलं आहे.

****

हवामानावर आधारित कृषीविषयक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्रं उभारण्यात येणार आहेत. मिशन मौसम च्या दुसऱ्या टप्प्यांत ही हवामान केंद्र उभारली जातील. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून, २०२६ च्या अखेरीपर्यंत अशा प्रकारची २०० केंद्रं देशात उभारण्याचं उद्दिष्ट आहे. या नव्या केंद्रांमुळे कृषी हवामानविषयक निरीक्षणं अधिक सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना हवामानाधारित अचूक सल्ला देणे शक्य होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...