Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· देशाच्या गतीमान विकासासाठी महिलांना सहकार्य मिळावं – राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांचं प्रतिपादन
· पश्चिम आशियातल्या संघर्षामुळं दिल्ली आणि मुंबईतली १०० पेक्षा जास्त
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द
· जलजिवन अभियानात महाराष्ट्र अव्वल- केंद्रीय मंत्री सोमान्ना यांचे
प्रशंसोद्गार
आणि
· भारत - न्यूझीलंड टीट्वेंटी विश्वविजेतेपदाची लढत थोड्याच वेळात रंगणार
****
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज देशभरात विविध
कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला दिनानिमित्त
देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला या समाजाच्या आधारस्तंभ असून जर महिला
सुशिक्षित,
स्वावलंबी आणि सक्षम असतील तर त्या देशाला समृद्ध आणि
प्रगतिशील बनवण्यासाठी मोठं योगदान देऊ शकतात असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी दिल्ली इथं आज एक विशेष कार्यक्रम
झाला. राष्ट्रपतींनी यावेळी राष्ट्राच्या विकासासाठी महिलांना सहकार्य करणं आवश्यक
असल्याचं नमुद केलं. त्या म्हणाल्या...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महिलांच्या आंतरिक शक्तीमुळं आणि धडाडीच्या वृत्तीमुळं
त्यांच्या कुटुंबांचं, समाजाचं आणि देशाचं भवितव्य घडत
असल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं
आहे. देशाच्या नारीशक्तीच्या कामगिरीचा देशाला अभिमान असून देशाच्या प्रगतीत
त्यांच्या परिवर्तनकारी भूमिकेचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनीही आज
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिनाची यावर्षीची
संकल्पना -“सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशा आशयाची आहे.
****
पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीमुळे दिल्ली आणि
मुंबई इथल्या विमानतळांवर आज १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द
करण्यात आली. त्यामुळे पश्चिम आशियातल्या काही देशांमध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय
विमान सेवांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, याची
प्रवाशांनी नोंद घ्यावी असं विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या
तणावामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या निराधार असून केंद्र
सरकार हा विषय समर्थपणे हाताळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. भाईंदर इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एका कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते
वार्ताहरांशी बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं
सुमारे साडेतेहतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण तसंच
पायाभरणी झाली. अठरा हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या दिल्ली मेट्रो योजने अंतर्गत
दोन मेट्रो मार्गिकांचाही यात समावेश आहे. दिल्लीच्या सरोजिनीनगर परिसरात
बांधलेल्या जीपीआरए वसाहतीला भेट देऊन आज प्रधानमंत्री मोदी यांनी महिला
अर्जदारांना त्यांच्या सदनिकेच्या किल्ल्या सुपूर्द केल्या. केंद्र शासनाच्या
विविध कल्याणकारी योजनांच्या महिला लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
****
जलजीवन अभियान
उपक्रमात,
महाराष्ट्र देशात अव्वल असून, राज्यातलं
जल जीवन मिशनच काम चांगलं आहे, अशी प्रशंसा पेयजल आणि स्वच्छता विभाग
जलशक्ती मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. सोमान्ना यांनी
केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यात कर्ली गावात आज जल महोत्सवाचं उदघाटन त्यांच्या हस्ते
झालं,
त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ते २२ मार्च
दरम्यान हा महोत्सव होणार आहे. जल जीवन मिशन उपक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला
मिळणारा ४०६ कोटी रुपयांचा निधी लवकरच पूर्ण स्वरूपात दिला जाईल असंही केंद्रीय
मंत्र्यांनी यानिमित्त सांगितलं.
****
महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलावर खेलो इंडीया अभियानांतर्गत ‘अस्मिता लिग’
क्रिडा स्पर्धांचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. महिलांमध्ये
क्रिडाविषयक जागरुकता, खेळांमध्ये संधी उपलब्ध करुन देणं
यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रक्षा खडसे यांनी याठिकाणी सकाळी महिलांच्या
सायकल तसंच वॉकेथॉन स्पर्धांना हिरवा झेंडा फडकवून प्रारंभ केला. विकसित भारत
घडवतांना तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनीही तंदुरुस्त होण्याची गरज असल्याचं खडसे
यांनी बोलतांना नमूद केलं. त्या म्हणाल्या..
बाईट - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
**
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या
संयुक्त विद्यमानं सकाळी क्रांती चौकातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात आली.
औरंगपुरा भागातल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पुतळ्यांना अभिवादनही करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीचा समारोप झाला.
**
जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी
मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य
तपासणी शिबिर सुरू आहे. गोंदिया, यवतमाळ जळगाव आणि धुळे
इथंही महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून
एका विशेष उपक्रमांतर्गत मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही दोन
महत्त्वपूर्ण मेट्रो स्थानक आज पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जात
आहेत.
**
जागतिक महिला दिनी नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या
मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा प्रारंभ
मुदखेड तालुक्यातल्या मुगट आरोग्य केंद्रात करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
१४ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुलींना लस देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात
आली. नांदेड जिल्ह्यातल्या एकूण २७ हजार मुलींना ही लस देण्याचं उद्दिष्ट आरोग्य
विभागानं ठेवलं आहे.
**
बीड इथं जागतिक महिलादिनी तुलसी शैक्षणिक समूह यांच्या वतीनं ‘महिला मॅरेथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. बीडचे
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील बालविवाह आणि मुलींच्या
शिक्षणातील गळतीच्या प्रश्नावरही प्रकाश टाकत, समाजाने
याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन या वेळी केलं.
****
आयसीसी पुरुष टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी, गतविजेत्या भारताचा सामना आज अहमदाबाद इथं न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना
संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ
चौथ्यावेळी पोहोचला आहे. तर न्यूझीलंडसाठी हा दुसरा अंतिम फेरीतला सामना असेल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मुंबईत झालेल्या रोमांचक उपांत्य
फेरीत इंग्लंडला सात धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडनं कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेचा
नऊ गडी राखून पराभव केला.
****
ऑस्ट्रेलियानं आज भारतावर दहा गडी राखून विजय मिळवत एकमेव महिला
दिवस-रात्र कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय नोंदवला. पर्थ इथं झालेल्या या
सामन्यात भारतानं पहिल्या डावात १९८ आणि दुसऱ्या डावात १४९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३२३ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया संघानं
दुसऱ्या डावात विजयासाठी आवश्यक धावा एकही गडी न गमावता करत विजयाची नोंद केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला
आजपासून सुरुवात झाली. गावातील नाथ मंदिरात अक्षत प्रारंभ करण्यात आला. नाथ
वंशजांची निर्वाण दिंडी समाधी मंदिरात पोचली आहे. उद्या वारकरी सोहळ्याचे कीर्तन, वारकरी वैष्णव पूजन, हरिपाठ बिंद्रावळी, भजन,
अनुग्रह दीक्षा आणि गुरुपूजन सोहळा देखील होणार आहे.
****
लातूरमध्ये परंपरेनुसार होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज 'रंगपंचमी'
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे आणि महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी मातोश्री
वृद्धाश्रमात उपस्थित राहून आजी-आजोबांसोबत संवाद साधत रंगपंचमी साजरी केली.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी
महामार्गावर बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
आजपासून २७ मार्च पर्यंत, महाराष्ट्र राज्य रस्ते
विकास महामंडळामार्फत कॅमेरे, सेन्सर किंवा माहिती फलक
उभारण्याचं काम १५ टप्यात प्रस्तावित करण्यात आलं आहे. यासाठी प्रत्येक संबधित
वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्ण थांबविण्यात येणार आहे.
काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असं
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment