Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०९ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारत प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक
आरोग्यसेवेच्या दृष्टीकोनातून पुढे जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या, सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर
वेबिनारला ते आज संबोधित करत होते. गेल्या काही वर्षांत भारताची आरोग्य पायाभूत सुविधा
अधिक मजबूत झाली असून, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा केवळ चर्चेचा विषय नाही
तर अर्थसंकल्पाचा पाया आणि सरकारची वचनबद्धता असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं
दुसरं सत्र आजपासून सुरु होत आहे. लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वास
प्रस्ताव मांडला जाईल. काँग्रेसचे मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हे
तीन सदस्य हा प्रस्ताव मांडतील. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसनं त्यांच्या लोकसभा
खासदारांना व्हीप जारी करून, उद्या मंगळवारपर्यंत सभागृहात उपस्थित
राहण्याचे निर्देश दिले आहेत.
****
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अंतिम सामन्यातल्या विजयानंतर भारतभर क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला. अनेक ठिकाणी
फटाके फोडण्यात आले, ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा करण्यात आला आणि भारतीय
संघाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
****
पुण्यासारख्या वेगानं विकसित
होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून, शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त
करण्यासाठी शासन बहुआयामी नियोजन करत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरच्या एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचं
लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं
नाव देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
****
विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय
सेवा योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिक स्वतःच्या जीवनमानात सकारात्मक
बदल घडवतील, यातूनच या शिबिराचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती किशोर संत यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं या महामेळाव्याचं
उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते.
बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातल्या
अमडापूर इथंही विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा काल पार पडला. मुंबई
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर
यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं.
****
सातारा जिल्ह्यात वाई इथल्या
बावधनच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत
पार पडली. बगाड पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी
लावली होती.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात श्री
क्षेत्र मढी इथल्या कानिफनाथ यात्रेनिमित्त भाविकांनी काल मोठी गर्दी केली होती. दरवर्षी
या यात्रेसाठी काठेवाड तसंच राजस्थान मधून गाढव विक्रीसाठी आणली जातात, मात्र यंदा या गाढवांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात २७ मार्च पर्यंत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत
कॅमेरे, सेन्सर किंवा माहिती फलक उभारण्याचं काम १५ टप्यात प्रस्तावित करण्यात आलं आहे.
यासाठी प्रत्येक संबधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्ण
थांबवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या
देशवंडी इथं लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झालं. एकूण २१ एकर जागेमध्ये हे स्मारक
बांधण्यात येणार असून, त्यासाठी १३ कोटी रुपये खर्च येणार आहे. अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यावेळी उसप्थित होते.
****
बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तीनही नगरपंचायतींमध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत शहर
आणि वाडी-वस्त्यांवर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि नळजोडणीच्या कामांचा आमदार
सुरेश धस यांनी काल आढावा घेतला. शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध
व्हावं, याकरता सुरू असलेली सर्व कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं आवश्यक असल्याचं धस यांनी
सांगितलं.
****
भारतीय विद्यापीठ महासंघाच्या
वतीनं आयोजित ३९ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ काल चेन्नईकडे रवाना
झाला. १० ते १४ मार्च दरम्यान, होणाऱ्या या महोत्सवात, सहा विविध कलाप्रकारांमध्ये विद्यापीठाचा संघ आपलं कौशल्य सादर करणार आहे.
****
No comments:
Post a Comment