Sunday, 22 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी २० टक्के एलपीजी देण्याची केंद्र सरकारची तयारी

·      निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं निधन-मुंबईत अंत्यसंस्कार

आणि

·      ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी

****

दीक्षांत समारंभ हा फक्त शैक्षणिक यशाचा उत्सव नसून, कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. मुंबईत काल रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पदवीधर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगारभिमुखता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतांना उपराष्ट्रपती म्हणाले…

बाईट - उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन

 

मुंबईत लोक भवन इथं जैन दीक्षा समारंभालाही उपराष्ट्रपती उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र उभारणीत जैन समाजाच्या योगदानाबद्दल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज पुण्याजवळ उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीकडून युवकांसाठी आयात-निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षण अभ्याक्रमाला कालपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवसेना भवन इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचं उद्घाटन झालं. अशाचप्रकारचे वर्ग राज्यभरात सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. सहा आठवड्यांच्या या प्रशिक्षणात, लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल, तसंच प्रात्यक्षिकाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

****

भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची काल नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने दोन तास कसून चौकशी केली. खरातच्या कार्यालयातला एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी ही चौकशी केली.

दरम्यान, या प्रकरणातल्या पीडीत महिलांची ओळख पटेल, अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या देऊ नये, अशाप्रकारची बातमी दिल्यास संबंधीतांना दंड आणि दोन वर्षे कारावास होऊ शकतो, असं विशेष तपास पथकाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.

****

व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी २० टक्के एलपीजी द्यायची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मासिक सरासरीच्या एकूण ५० टक्के एलपीजी मिळेल. खासगी उपाहारगृह, ढाबे, हॉटेल, कंपन्यांमधली उपाहारगृहं, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी भोजनगृहं, अन्न प्रक्रिया आणि डेअरी उद्योगाला, व्यावसायिक एलपीजी देताना प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय पाच किलोग्रॅम वजनाचं सिलिंडर घेणाऱ्यांनाही प्राधान्य द्यायचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. या सर्वांना या एलपीजी पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडे नोंदणी करावी लागेल. तसंच पाइप गॅसची जोडणी घेण्यासाठी संबंधित कंपनीकडे अर्ज देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तरच त्यांना हा अतिरीक्त पुरवठ्यातला एलपीजी मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय वन दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना वनांचं रक्षण करण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं २०१२ मध्ये २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला आहे.

****

सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथले मुळ रहिवासी असलेले कुर्डूकर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं. पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. न्यायमूर्ती कुर्डूकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत गिरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याभरात उत्साह, आनंद आणि बंधुभावाचं अनोखं चित्र पाहायला मिळालं. शहरातल्या विविध मशिदी आणि ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. नवीन वेशभूषेत आबालवृद्धांनी शिस्तबद्ध पद्धतीने नमाज अदा केली. छावणी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकतेचा संदेश दिला. यावेळी जनकल्यानासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

**

जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या कदीम जालना ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा केली. यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

**

बीड इथं ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष हेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

**

धाराशिव इथंही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली, यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना तसंच उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

**

नांदेड तसंच लातूर इथं ईदगाह मैदानावर नमाज अदा करुन, विश्वशांतीची प्रार्थना करण्यात आली.

****

पुण्यात वाघोली इथं सुरु असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आज किताबी लढत होणार आहे. काल या स्पर्धेत माती विभागात ५७ किलो वजनगटात कोल्हापूर जिल्ह्याचा मृणाल पाटील अव्वल आला, तर पुणे शहराच्या ओंकार निगडे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ७९ किलो आणि ८६ किलो गटात अनुक्रमे सोलापूर जिल्ह्याचे बिरुदेव बनसोडे आणि बच्या मशीद शेख यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गादी विभागात ६१ किलो गटात कोल्हापूरचे वैभव पाटील आणि ८६ किलो गटात अभिषेक कापडे यांनी बाजी मारली.

****

गुणात्मक दर्जेदार हळद पिकविणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या हिंगोली जिल्ह्यात आता हळदीवर प्रक्रिया करून महिला बचत गटांनी विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली आहेत. या मूल्यवर्धित उत्पादनांचं ब्रँडिंग करून त्यांना देशपातळीवर ओळख मिळवून दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट – रमेश कदम, हिंगोली

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना या विषयावरचा २१ दिवसाचा हिवाळी अभ्यासदौरा पूर्ण झाला. अभ्यासक्रम समन्वयक डॉ. चंद्रशेखर अंबडकर यांनी ही माहिती दिली. या अभ्यासदौऱ्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतले एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

****

लातूर इथं बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची दालनं असलेल्या ‘हिरकणी हाट’ विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील यांच्या हस्ते झालं.

****

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं.

****

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे शेती तसंच पशुधनाचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकर्यांना निवेदन दिलं आहे.

****

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विभागात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...