Friday, 20 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      खरीप नियोजनासाठी देशात पाच प्रादेशिक विभागानुसार आखणी-केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती

·      एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन स्थिर-घरगुती ग्राहकांना पीएनजीकडे वळण्याचं सरकारचं आवाहन

·      उपराष्ट्रपती उद्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

·      शासकीय महिला अधिकारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड

आणि

·      चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ

****

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी देशात पाच प्रादेशिक विभागानुसार आखणी केली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. खरीपाच्या आखणीसंदर्भात प्रादेशिक परिषदा होतील, त्यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक संघ आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश असेल, असंही चौहान यांनी सांगितलं. यंदाच्या रबी हंगामात गहू तसंच धानाचं उत्पादन समाधानकारक झालं आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कडधान्याचीही पूर्ण खरेदी केली जाईल, अशी ग्वाही चौहान यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून विविध भागात गारपिटीसह पावसाने कापणीला आलेल्या तसंच कापणी झालेल्या पिकांचं तसंच फळबागांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचा तत्काळ अंदाज घेण्याचे निर्देश पीक विमा विभाग पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्याचं, चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या नियोजन केलं आहे. त्यामुळे युरिया खताच्या उत्पादनासाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे देशांतर्गत युरिया उत्पादन वाढणार आहे.

****

एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन स्थिर असून, पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं, पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. त्या दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. गॅसच्या पॅनिक बुकिंगमध्ये घट झाली असून, किरकोळ विक्री केंद्रांवर गॅसची टंचाई नसल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभरात व्यावसायिक एलपीजीचा ११ हजार ३०० टन साठा उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती ग्राहकांना एलपीजीवरून पीएनजी अर्थात पाईप गॅस जोडणीकडे वळण्याचं शर्मा यांनी पुन्हा आवाहन केलं. त्या म्हणाल्या -

बाईट - सुजाता शर्मा

****

केंद्र सरकारच्या मत्स्योत्पादन प्रोत्साहन योजनेत एकात्मिक जलाशय विकासासाठी राज्य सरकारने कोकणासह राज्यभरातल्या ३४ जलाशयांची  निवड केली आहे. राज्यातल्या जलाशय आणि सरोवरांमध्ये जलचर आणि माशांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि साठवणीसाठी शीतगृहांची साखळी तयार करणे यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मिळून १९८ शीतगृहांना मंजुरी मिळाली  आहे.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उद्या दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात उद्या आयोजित भारतीय युवा संसदेच्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला, तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर मुंबईत लोक भवन इथे जैन दीक्षा समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. परवा २२ मार्चला पुण्यात उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****

नवी दिल्ली इथं आयोजित शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसंच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुण्यातली सरहद संस्था आणि दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ तसंच १२ एप्रिलला हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. 

****

रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाला आज ९९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. चवदार तळे जल शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. चवदार तळ्याचा हा सत्याग्रह भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून, मुंबईत इंदू मिल इथलं बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समाजामध्ये विषमता दूर करण्याची तसंच एक समतायुक्त समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. गोरगरीबांना न्याय देणं, हा बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे सुरु ठेवणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

****

मौखिक आरोग्य दिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी यानिमित्त समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात, लोकांना मौखिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगिकारण्याचं आवाहन केलं.

****

जागतिक चिमणी दिवस आज साजरा होत आहे. निवाऱ्याच्या जागांअभावी, चिमण्यांच्या घटत चाललेल्या संख्येबद्दल जागरुकता निर्माण करणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. बीजप्रसारासोबतच किटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांचा मोठा वाटा असतो.

****

राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. जालना जिल्ह्यात काल रात्री वादळी वारा आणि विजांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांसह आंबा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं. सुमारे एक हजार ३६४ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली, यामध्ये बागायती ६१८ हेक्टर, जिरायती ३१० हेक्टर तर ४३६ हेक्टरवरील फळपिकांचं नुकसान झालं असून, चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात वीज कोसळून एक बैल ठार झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं काल रात्रीच्या पावसानंतर शहरात सखल भागात पाणी साचलं तर अनेक भागातला विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. जिल्ह्यात गहू, मका तसंच कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या भादा आणि औसा परिसरात आज दुपारी भूगर्भातून आलेले आवाज, हे भूगर्भातील हालचालींमुळे होणाऱ्या आवाजाचा प्रकार असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या भागात पडताळणीनंतर भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याचं कळवण्यात आलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरू नये आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे

****

बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत मोबदला देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधीत कारखान्यांना दिले आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...