Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 March 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या काळातही
भारत जागतिक स्तरावर एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून खंबीरपणे उभा
आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एन एक्स टी
परिषदेत ते बोलत होते. या संघर्षामुळे पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या
अडथळ्यांवर मात करण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत
असून,
या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचंही त्यांनी
सांगितलं.
****
राज्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या
पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत, आणि संभाव्य टंचाईच्या
परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनानं जिल्हास्तरावर
विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी
सुरळीत ठेवण्याविषयी तसंच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगानं आवश्यक त्या
उपाययोजना करण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल
डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत
होत राहील,
अशी ग्वाही विभागानं दिली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या
तुलनेत मार्च महिन्यामध्ये अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असून, युद्धाच्या
पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या
सूचना विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयं, शासकीय
वसतिगृहं, शासकीय शाळा-महाविद्यालयांमधल्या खानावळी, मध्यान्ह भोजन योजना, शासकीय
आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना गॅसचा प्राधान्यानं पुरवठा
करण्यात येणार असून,
अशा संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं राज्य
शासनानं कळवलं आहे.
****
हवामान बदलाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे
देशातल्या सर्वाधिक संवेदनशील पाच राज्यांपैकी एक आहे. २०२५ हे वर्ष दशकभरातलं
सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे,
अशी माहिती राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी
काल विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याविषयी अर्धा तास चर्चा उपस्थित
केली होती. हवामान बदल हा गंभीर, संवेदनशील आणि व्यापक प्रश्न असून त्याला
तोंड देण्यासाठी राज्याचा आराखडा तयार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
सोन्याचे दागिने तसंच सोन्यापासून
बनवलेल्या वस्तुंना हॉलमार्क अनिवार्य करण्याच्या सहाव्या टप्प्यात सरकारने आणखी
सात जिल्ह्यांचा समावेश केला आहे. यामध्ये राज्यातला बीडचा समावेश आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात, पारनेर
तालुक्याल्या सावता वडगाव इथं वन विभागाच्या नर्सरीत तीन महिन्यापासून बंदिस्त
असलेल्या २० बिबट्यांना जुन्नर मधल्या बिबट निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात
आलं असून, एका बिबट्याला निसर्गात मुक्त सोडण्यात आलं आहे. या बिबट्यांच्या
पुनर्वसनासाठी जीवदया फाउंडेशनच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे
पाठपुरावा करण्यात आला होता.
****
नाशिकमध्ये काल कृषी कुंभचं उद्घाटन
राज्य शासनाच्या कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं.
तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे, असं
प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण
जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ‘उमेद’ च्यावतीने नांदेडमध्ये आजपासून १८ मार्च पर्यंत
रेणुका महोत्सव,
‘मिनी सरस’ प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात
आलं आहे. शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल, इथं दररोज सकाळी १० ते
रात्री १० वाजेपर्यंत हा मेळावा सुरु राहील. या मेळाव्याला भेट
देऊन महिला बचत गटांना नागरिकांनी प्रोत्साहन द्यावं, असं
आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक
स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिमने सुवर्ण पदक पटकावलं. त्याने ६९ पूर्णांक २५ मीटर
अंतरावर भाला फेकला. पुष्पेंद्र सिंह याने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या
धावण्याच्या शर्यतीत सुबोधकांतने सुवर्ण, प्रियांशु कौशिकने रौप्य तर
अवनिल कुमारने कांस्य पदक जिंकलं.
****
स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपली दमदार कामगिरी कायम राखत
पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांनी काल जपानच्या जोडीचा
पराभव केला. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्ज याचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला.
****
हैदराबाद इथं सुरु असलेल्या पात्रता
स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर भारताच्या महिला हॉकी संघाने
आगामी एफआयएच महिला हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
भारत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असून, विश्वचषक स्पर्धेत सहभागी
होण्याची ही नववी वेळ आहे.
****
येत्या १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये
प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी
वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही
स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसंच मध्य
महाराष्ट्रातल्या भागांमध्ये दिसून येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही
दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष देण्याचं आवाहन
कृषी विभागानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment