Monday, 16 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १० राज्यांपैकी अनेक राज्यांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे. उर्वरित बिहार, ओडिशा आणि हरियाणातल्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.

****

लोकसभेची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे. खासदारांच्या वर्तनावर बोट ठेवत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. सभागृह हे चर्चेसाठी आहे, गोंधळासाठी नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी खासदरांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

****

ओडिशातल्या कटक इथल्या एससीबी रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचवताना जवळपास ११ कर्मचारी जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि आरोग्य मंत्री मुकेश महालिंग यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये मदत घोषित केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

९८व्या अकादमी पुरस्कार सोहळा आज लॉस एंजलिस इथं पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लियोनार्डो दि केप्रिको यांच्या वन बॅटल आफ्टर अनादर ने पटकावला. याच चित्रपटासाठी पॉल थॉमस एंडरसनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मायकल बी जॉर्डनला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर जेसी बकले हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

****

पद्म पुरस्कार २०२७ साठी सरकारने पात्र उमेदवारांकडून आवेदन आणि जनतेकडून नामांकनं मागवली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही नामांकनं आणि आवेदन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील. यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली असून, पुरस्कारांची घोषणा पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला केली जाईल.

****

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत, राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, आज या पुनर्विकास प्रकल्पातल्या पहिल्या टप्प्यातल्या ८६४ पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

पुण्यात मेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकात उभारण्यात आलेल्या मेट्रो भवन प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. देशात सर्वाधिक गतिशीलतीने झालेल्या मेट्रो प्रकल्पात, पुणे मेट्रोचा उल्लेख करावा लागेल, असं ते म्हणाले. येत्या काळात २०० किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असून, त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश महामेट्रोला देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार, लेखक-नाटककार योगेश सोमण यांनी विजय मिळवला. प्रमुख कार्यवाहपदी पत्रकार स्वाती महाळंक यांनी तर कोषाध्यक्षपदी गझलकार प्रदीप निफाडकर यांचा विजय झाला. मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल झाली; त्यानंतर रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आले.

****

नांदेड महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली होआहे. या सभेत विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.

****

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या लोकअदालतीत एकूण ५९ हजार ४८ प्रकरणं निकाली काढण्यात आली असून, ५७ कोटी ७२ लाख ३९ हजार इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.

नाशिकमध्ये काल झालेल्या लोकन्यायालयात १६ हजार ८२६ प्रकरणं निकाली काढण्यात आली. सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ८६ कोटींहून अधिक रूपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आलं.

****

समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे, असं प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केलं. कोल्हापूरमध्ये काल विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधित गरजूंना देण्यात आला.

****

जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त नेत्रतज्ञ संघटनेतर्फे परभणी इथं काल जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातले नेत्रतज्ञ आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.

****

बँकॉक मध्ये झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध करंडक स्पर्धेत भारतानं पाच पदकांची कमाई केली. यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. काल या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या ५१ किलो वजनी गटात चंद्रिका पुजारीने उझबेकिस्तानच्या खेळाडुचा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...