Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात
प्रत्येकी दहा रुपये प्रति लिटरने कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या
किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, डिझेलच्या
निर्यातीवर साडे २१ रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावर साडे २९ रुपये प्रति लिटर
दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची
पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
****
महिला आणि बाल विकास विभाग आणि सी आय एफ एफ अर्थात
चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार
झाला. या करारात कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात पालघर, जालना, नंदुरबार,
गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार
आहे. गर्भधारणेपासून बालकाच्या आयुष्यातल्या पहिल्या एक हजार दिवसांदरम्यान योग्य
पोषण आणि आरोग्य सवयी रुजवण्यासाठी ही मोहीम आहे. या भागीदारीमुळे मातृ आणि बाल
पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
****
भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडील शस्त्र परवाना पोलिसांनी
निलंबित केला आहे. त्याच्या सिन्नर तालुक्यातल्या फार्महाऊसच्या झडतीत एक
राजमुद्रा असलेलं पिस्तूल तसंच २१ काडतुसं सापडली होती. यातील पाच काडतुसांचा वापर
झाला असून,
तो कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत आहेत. खरात याचं बँक
खातंही सील करण्यात आलं आहे. दरम्यान, खरातने शोषण
केलेल्या काही पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने नाशिक
शहरातल्या सातपूर इथल्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
****
रिलायन्स टेलिकॉम प्रकरणी सीबीआयनं काल मुंबईत छापे टाकले. या छाप्यांत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रं जप्त केली असून, अधिक तपास सुरू आहे. स्टेट बँकेच्या तक्रारीवरून कंपनी, तत्कालीन संचालक सतीश सेठ आणि गौतम दोशी यांच्यावर कटकारस्थान, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. बँकेला तब्बल ११४ कोटी
रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप आहे.
****
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड लाख
रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः नि:शुल्क उपलब्ध करून देणाऱ्या “पीएम-राहत” योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास राज्यात अपघाती मृत्यूचं
प्रमाण कमी होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री
प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. जनआरोग्य योजनेच्या बैठकीत काल ते बोलत
होते. या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा
ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातल्या कोणत्याही
रुग्णालयात उपचार पूर्णतः निशुल्क देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव शहरातल्या प्रत्येक वार्डातल्या पाच प्रभागातून दहा
महिलांना स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची ग्वाही, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. नारीशक्ती सन्मान
सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. शहरातला कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्याची
आणि हातलाई तलावावर संगीत कारंजे करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि
संवर्धनासाठी राज्य शासनाने नळदुर्ग किल्ला संवर्धन आणि स्थळ व्यवस्थापन
आराखड्यानंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या कामांसाठी सात कोटी १८ लाख रुपयांच्या
निधीला मंजुरी दिली आहे. कामाची निविदा प्रक्रियाही नुकतीच सुरू झाली. यामुळे
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचं रुप आता पालटणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी व्यक्त केला.
****
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५१ व्या वर्धापन
दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत
धाराशिव इथं आजपासून “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार
आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या
विविध वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री तसेच महिला मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे.
****
मालदीवमध्ये माले इथं सुरू असलेल्या सॅफ अर्थात दक्षिण
आशिया फुटबॉल महासंघातर्फे आयोजित वीस वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत काल भारतानं
पाकिस्तानवर ३-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. या पराभवामुळे
पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
बीसीसीआय, अर्थात भारतीय क्रिकेट
नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर
केलं. या टप्प्यात बंगळूर, मुंबई, चेन्नई,
कोलकाता आणि दिल्लीसह १२ शहरांमध्ये १३ एप्रिल ते २४ मे
दरम्यान ५० सामने खेळवले जातील. सलामीचा सामना हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद
आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. या टप्प्यात आठ डबल-हेडर सामने खेळवले जातील.
पहिल्या टप्प्यातले सामने येत्या २८ तारखेपासून सुरू होतील.
****
No comments:
Post a Comment