Tuesday, 10 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव सादर झाला. काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी हा ठराव मांडला. यावेळी अध्यक्ष स्वत: उपस्थित नसल्याबद्दल अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी आक्षेप घेतला.

****

राज्यसभेत आज शून्य प्रहरामध्ये तृणमूल काँग्रेस सदस्य डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगानं विविध राज्यात राबवलेल्या मतदारयादी पुनरीक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली, तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. चर्चा झालेल्या विषयांवर पुन्हा चर्चेची मागणी करून सभात्याग करण्यामुळे विरोधी पक्षाला सदनात खऱ्या चर्चेत रस नसल्याचं दिसून येतं, अशी टीका सभागृह नेते जे.पी.नड्डा यांनी केली.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत चार हजार मेगावॉट वीज निर्मिती झाली असून, याद्वारे आठ लाख शेतकऱ्यांना निरंतर वीज दिली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. या वर्षाच्या शेवटी अतिरिक्त १० हजार मेगावॉट वीज तयार केली जाणार असून, यामुळे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा निरंतर वीज दिली जाईल, असं ते म्हणाले.

सोशल मीडियातील बदनामी रोखण्याच्या उपायांसाठी पोलिस महासंचालकांची समिती स्थापन करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सदनात सांगितलं. या समितीच्या शिफारसींनुसार कायद्यात बदल तसंच तरतुदीची कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

****

सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राज्य सरकारने ४३ कोटीच्या निधीची तरतूद केल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याशिवाय महा सायबर सेफ ॲप हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे, सायबर फसवणूक कोणकोणत्या प्रकारे केली जाते याची माहिती या ॲपवर असेल. दर महिन्याला नागरिकांना जनजागृतीसाठी २१ कोटी मेसेज पाठवले जातील, असं कदम यांनी सांगितलं. प्रशांत ठाकूर, विकास ठाकरे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारले होते.

****

राज्यातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गात एकंदर अकरा हजार नऊशे अठरा जागा रिक्त असून, त्यापैकी सुमारे पाच हजार पाचशे पदं भरायची मान्यता मिळालेली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि इतरांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या शैक्षणिक वर्षात ही भरती पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी या दलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दलाच्या साहस, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यांना देश नमन करतो, असं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या दलाच्या शिस्त, समर्पण आणि देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं रक्षण करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा, २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा ३१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत एकमतानं मंजूर करण्यात आला. ४२ कोटी १८ लाख रुपयांच्या तुटीच्या या अर्थसंकल्पाला काही दुरुस्तीसह अधिसभेनं मंजुरी दिली. कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

****

कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमा अंतर्गत शासकीय आणि खाजगी आस्थापनांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीने प्रभावीपणे कार्य करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. परभणी इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. एक सामाजिक बांधिलकी म्हणून कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची दक्षता सर्व आस्थापनांनी घ्यावी, समितीचं कार्य केवळ कागदापुरतं मर्यादीत न ठेवता तक्रारीवर वेळेवर योग्य ती कार्यवाई करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्हा पूर्णपणे बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही चाकणकर यांनी केलं.

****

अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या वसाली, नागापूर आणि बोडर्डी इथं कार्यरत असलेल्या, निराधार, बेघर आणि अनाथ नागरिकांसाठी निःस्वार्थ सेवा देणाऱ्या जनाई निराधार वृद्धाश्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नुकताच मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...