Wednesday, 18 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      औद्योगिक क्षेत्र विकासासाठी भव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      व्यावसायिक ग्राहकांना आणखी १० टक्के एलपीजी पुरवठ्याला सरकारची मंजुरी

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीत फूट- भाजपला बिनविरोध अध्यक्षपद;परभणीतही अध्यक्षपद भाजपकडेच

आणि

·      मराठवाड्यातल्या पहिल्या ए आय अंगणवाडीला जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ

****

देशात शंभर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने आज भव्या- अर्थात भारत औद्योगिक विकास योजनेला मान्यता दिली. या योजनेसाठी ३३ हजार ६६० कोटी रुपये तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. २०२३-२४ च्या कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला एक हजार ७१८ कोटी रुपये अनुदानासही मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेवरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढची पाच वर्षं ही योजना कार्यरत राहील. देशभरात पंधराशे मेगावॅट निर्मिती क्षमतेच्या सुमारे दोनशे प्रकल्पांसाठी ही योजना काम करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

राज्यसभेने आज ५९ सदस्यांना निरोप दिला. निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये उपसभापती हरिवंश, एच डी देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे, तसंच शरद पवार यांचा समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राजकारणात कधीच पूर्णविरामनसतो, भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात, आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि योगदान हे सदैव मोलाचं ठरेल, असं नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

एक देश एक निवडणूक धोरणाशी संबंधित कायदेशीर बाबींची तपासणी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ यंदाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत ही मुदतवाढ असेल.

****

व्यावसायिक ग्राहकांना आणखी १० टक्के एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळं या ग्राहकांना आता मासिक सरासरीच्या ३० टक्के एलपीजी मिळेल. अधिकाधिक व्यावसायिक ग्राहकांनी एलपीजी ऐवजी पाइप गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पेट्रोलियम सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केलं आहे.

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी पार करून जग लाडकीहे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहचलं आहे. यामुळं देशातील इंधनाच्या समस्येत मोठा दिलासा मिळणार आहे. या जहाजावरचा ८० हजार ८८६ मेट्रिक टन कच्चं तेल उतरवण्याचं काम सुरु झालं आहे.

****

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयकाला विधान परिषदेनं आज मंजुरी दिली. नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापन करण्यासह विद्यमान शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी तरतुदी करणं, शिक्षण आयुक्तपदाचा या व्यवस्थेत समावेश करणं, आदी तरतुदींचा या विधेयकात समावेश आहे. शाळा बंद करण्याबाबत आगाऊ सूचनेचा काळ १८ महिन्यांवरून दुप्पट करणं आणि ५ ते १० लाख रुपयांचा दंडही दुपटीनं वाढवणं इत्यादी तरतुदी या विधेयकात आहेत.

****

राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढवणं आणि त्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मंत्री भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता १५ हजार वरून ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. याबाबत सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनीही सहभाग घेतला.

****

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील साडे तीनशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. बँकेत एकूण ४०० कंत्राटी कर्मचारी होते. त्यापैकी ५० कर्मचारी नोकरी सोडून गेले. यातील ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा सर्व ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अत्यंत नाट्यमय वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात महायुतीतली फाटाफूट यावेळी उघडपणे दिसून आली. शिवसेनेच्या २१ सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ सदस्य यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आलेले भाजपचे गलांडे आणि जयस्वाल यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. यात अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातल्या सावंगी म्हाळसा गटातील भारतीय जनता पार्टीच्या लता विजय वाकळे यांची अध्यक्षपदी तर सोनपेठ तालुक्यात विटा गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे.

****

मराठवाड्यातल्या पहिल्या ए आय अंगणवाडीला आज जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ झाला. परभणीत झालेल्या आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते या अंगणवाडीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ यांच्यासह अधिकारी मोठ्या संखेनं उपस्थित होते.

****

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळील नवीन बोगद्यानजीक आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ४ जण जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून पाच गाड्या एकावर एक आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

****

नवनाथांपैकी एक असणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ इथं आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा तीन दिवस चालणार आहे अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाल चिमणापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामातील, मक्का, गहु, हरभरा, कांदा आदी पिकांची नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी गारपीट आणि वीजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या सुमारे अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

****

संगमनेर तालुक्यात १२ वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत दिलं. ॲसिड सहज उपलब्ध होऊ नये, यासाठी समिती स्थापन करून उपाययोजना करण्यात येतील, असं आश्वासन भोयर यांनी दिलं.

****

अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर तालुक्यामध्ये मुरंबा गावातल्या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रातल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सुमारे ६५ हजार रुपये किमतीची बायोगॅस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...