Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 March 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा
आणि राज्यसभेसारख्या सदनांची मर्यादा पाळणं आपलं कर्तव्य असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम
बिर्ला यांनी म्हटलं आहे. बिर्ला यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव काल फेटाळून लावण्यात
आला, त्या पार्श्वभूमीवर ते आज लोकसभेत बोलत होते. सदनातल्या प्रत्येक सदस्याला नियमाप्रमाणेच
बोलण्याची संधी मिळत असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट – लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
लोकशाहीत
व्यवस्था निर्माण करण्याची आपली जबाबदारी असून, घोषणाबाजी, गोंधळ, पत्रकं
भिरकावणे अशा गोष्टी सदनाच्या प्रतिष्ठेला अनुसरुन नसल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.
या सदनाची मर्यादा,
प्रतिष्ठा राखणं सामूहिक जबाबदारी असून, तसा
सगळ्या सदस्यांनी संकल्प केला पाहिजे, असं ते म्हणाले.
दरम्यान, लोकसभेत
एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यासंदर्भात विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी
फेटाळून लावला. या मुद्यावर संबंधित खात्याचे मंत्री निवेदन देतील असं त्यांनी सांगितलं.
मात्र या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं.
****
मूत्रपिंड
अर्थात किडनीच्या आरोग्याविषयीची जागरुकता आणि त्यासंदर्भातल्या आजारांचं लवकर निदान
तसंच प्रतिबंध करण्याविषयी जागरुकता वाढवण्याची गरज असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्री जे.पी.नड्डा यांनी म्हटलं आहे. आज जागतिक किडनी दिनानिमित्त सामाजिक माध्यमावरील
संदेशात त्यांनी किडनी जागरुकतेविषयीचं महत्व विषद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली सरकारने आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण
पाऊल म्हणून,
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम सुरु केला असून, यामुळे
देशभरातल्या अनेक डायलिसिस केंद्रावरुन लाखो रुग्णांना जीवनदान आणि योग्य ते उपचार
मिळत असल्याचं नड्डा यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
ऐतिहासिक
दांडी यात्रेत सहभागी स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उपराष्ट्र्पती
सी पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे. १९३० मध्ये आजच्या दिवशी महात्मा गांधी
यांच्या नेतृत्वात दांडी यात्रा काढण्यात आली होती. या चळवळीने सत्य आणि अहिंसेच्या
आदर्शांद्वारे देशव्यापी स्वावलंबनाची भावना निर्माण केल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक
माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२
वा हप्ता जारी करतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी
आज सकाळी नवी दिल्लीत ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, १८ हजार ६४० कोटी रुपये जारी
करतील असं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार लाख नऊ हजार कोटींहून अधिक
रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.
देशातलं
एकूण अन्नधान्य उत्पादन २०१४ मध्ये २५२ दशलक्ष टनांवरून २०२५ मध्ये सुमारे ३५७ दशलक्ष
टनांपर्यंत वाढलं असल्याची माहिती चौहान यांनी यावेळी दिली. सरकारने एआय-आधारित डिजिटल
प्लॅटफॉर्म,
भारत विस्तारचा पहिला टप्पा देखील सुरू केला आहे, ज्यामुळे
शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये कृषी प्रश्नांशी संबंधित व्यापक माहिती
मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हवामान
बदल आणि त्याचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम हे सरकार समोरचं मोठं आव्हान असून, समाजातल्या
सर्व घटकांनी यासाठी हातभार लावायला हवा, असं आवाहन राज्यमंत्री आशिष
जैस्वाल यांनी आज विधानपरिषदेत केलं. अमोल मिटकरी यांनी याबद्दलची चर्चा उपस्थित केली
होती. वातावरण बदलामुळे शेतीसह सर्वच क्षेत्रांसमोर निर्माण झालेल्या मोठ्या आव्हानांचा
सामना करण्यात कृषी विद्यापीठांच्या संशोधनाची भूमिका महत्त्वाची असून, या
विद्यापीठांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, तसंच
पदभरतीलही मान्यता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रदूषण, हवामान
बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्याची आणि शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षण सक्तीचं करण्याची
गरज जैस्वाल यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, विधानपरिषदेच्या
कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर अर्धा तास चर्चेला उत्तर देण्यासाठी कोणत्याही संबंधित
खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल सदस्य विक्रम काळे यांनी तीव्र नाराजी
व्यक्त केली.
****
माजी
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची ११३ वी जयंती आज साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांनी आज कराड इथल्या प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन
केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर काम करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
धाराशिव
जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या शेळका धानोरा इथं शबरी आवास योजनेमधून मंजूर झालेल्या
५४ घरकुल लाभधारकास पंडीत दिनदयाळ उपाध्याय अर्थसहाय योजनेअंतर्गत अनुदान वितरीत करण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment