Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15 March 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून
सुरू होणाऱ्या ‘माय
भारत बजेट क्वेस्ट २०२६’ स्पर्धेच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश
स्तरावरच्या विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना केंद्रीय
अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि ‘विकसित
भारत’ निर्मितीबाबत त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
करून देणं हा आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट युवा प्रतिभांना सहभागी शासन आणि आर्थिक
नियोजनाशी जोडणं हे आहे. तसंच, हा उपक्रम धोरण निर्मितीमध्ये
तरुण पिढीची भूमिका अधिक मजबूत करेल आणि २०४७ पर्यंत ‘आत्मनिर्भर
विकसित भारत’ उभारण्यात मोलाचं योगदान देईल. ‘माय भारत बजेट स्पर्धा २०२६’ मध्ये १२ लाखांहून अधिक
तरुण स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
****
चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या
निवडणुकांची घोषणा आज केली जाणार आहे. निवडणूक आयोग दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेमध्ये
पश्चिम बंगाल, तामिळनाडू,
केरळ, असाम, पुदुचेरी येथील
निवडणुकांच्या तारखांची माहिती देईल.
****
पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं
एअर इंडिया एक्स्प्रेसचं संयुक्त
अरब अमिराती- यू.ए.ई.चं विमान उड्डाण रद्द झालं आहे.
यूएई विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनांनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसनं आजची आपली अबु
धाबी, रास अल खैमाह आणि शारजाह येथून येणारी आणि जाणारी सर्व
उड्डानं रद्द केली आहेत. रद्द झालेल्या उड्डाणांमधले प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय
पुढील तारखेची नोंदणी करू शकतात किंवा पूर्ण परतावा मिळवू शकतात.
दरम्यान, याला अपवाद म्हणून दिल्ली-दुबई मार्गावर
उपलब्धतेनुसार एक ये-जा फेरी चालवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं विमान
कंपनीनं सांगितलं.
एअर इंडिया आणि इंडिगो नंतर अकासा
एअर कंपनीनं आपल्या उड्डाणांवर इंधन अधिभार लागू केल्याची माहितीह दिली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे विमान इंधन - एव्हिएशन
टर्बाइन फ्यूलच्या किंमती वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
भारतीय नौदलानं फारसच्या आखाताजवळ
आपल्या अनेक युद्धनौका तैनात केल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांना
गरज पडल्यास मदत करण्यासाठी त्यांना सज्ज ठेवण्यात आलं आहे. अहवालानुसार, भारतीय व्यापारी जहाजं आणि त्यांच्या चालक दलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच
नौदलाची ही तैनाती करण्यात आली आहे. काल इराणी अधिकाऱ्यांनी भारताकडे येणाऱ्या भारतीय
ध्वजधारक दोन एलपीजी जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून–जलडमरूमध्यातून जाण्याची परवानगी
दिली. बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,
फारसच्या आखातात भारतीय ध्वज असलेल्या २४ जहाजांवर ६६८ भारतीय नाविक
कार्यरत आहेत, तर होर्मुज सामुद्रधुनीच्या पूर्व भागात तीन जहाजांवर
७६ भारतीय नाविक उपस्थित आहेत. परदेशातील भारतीय दूतावासांशी सतत समन्वय आणि २४ तास
संबंधित कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू असून भारतीय नाविकांची सुरक्षितता सुनिश्चित केली
जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज विजांसह वादळ, हलका पाऊस आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने
वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता
आहे.
****
हमीदरानुसार कापसाची खरेदी भारतीय
कापूस महामंडळ-सी.सी.आय.कडून आज बंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर याला ३१ मार्चपर्यंत
मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस अद्याप शिल्लक असल्यानं ही मागणी
करण्यात आल्याचं नमूद करण्यात
आलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या एफएक्यू दर्जाचा कापूस संपल्याचा दावा करत सी.सी.आय.नं
खरेदी बंद करत असल्याचं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विभागीय
आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जनसहयोग या सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या
‘संपूर्ण वन’ जैवविविधता उद्यानाला भेट देऊन तिथल्या विविध वृक्षसंपदेची पाहणी आणि
वृक्ष संवर्धनाची माहिती घेतली. पडेगावच्या अहिल्यादेवी होळकर शेळी आणि मेंढी पालन
केंद्र परिसरात तब्बल २५ एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या या वृक्षराईत सुमारे
चारशे प्रकारच्या देशी, दुर्मिळ
आणि औषधी वनस्पतींच्या प्रजातींचं संवर्धन करण्यात येत आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बी.सी.सी.आय.तर्फे
आज नवी दिल्ली इथं नमन ॲवॉर्डस २०२६ या क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दलच्या विविध
पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. यात रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना सी.के.नायडू
जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर, मिताली राज यांना महिला जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. शुभमन गिल याला सलग दुसऱ्यांदा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर म्हणून पॉली उमरीगर सन्मान तर,
स्मृती मंधाना हिला पाचव्यांदा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय
महिला क्रिकेटर म्हणून सन्मानित केलं जाईल. आयुष म्हात्रे, हर्ष
दुबे, ईरा जाधव, शेफाली वर्मा यांसह मुंबई
क्रिकेट संघटनेलाही यावेळी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment