Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी गांधीनगरमधील कोबा इथं ‘सम्राट संप्रती संग्रहालय’चं
उद्घाटन केलं. हे संग्रहालय जैन इतिहास, सम्राट संप्रती यांचं जीवन, त्यांचा राज्यकारभार आणि अहिंसेचा संदेश यांना समर्पित आहे.
या उपक्रमामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला नवी ओळख मिळण्यास
मदत होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते साणंद इथं केनेस सेमिकंडक्टर
प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसंच नव्याने स्थापन झालेल्या वाव-थराड जिल्ह्यात
सुमारे १९ हजार ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात येणार आहे.
****
जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात साजरी
केली जात आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना महावीर जयंतीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध
आवाज उठवला आणि उत्तम जीवनाचा मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनीही देशवासीयांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंतीचा हा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचं जीवन कार्य
तसंच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया या शिकवणीचं स्मरण करून देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महावीर जयंतीच्या
औचित्यानं ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक महत्वाचं यश मिळवत, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स लिमिटेड,-जीआरएसई-या स्वदेशी कंपनीनं निर्मिती केलेल्या तीन युद्धनौका
काल भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आल्या. यातली दुनागिरी ही युद्धनौका निर्धारित लक्ष्यावर
मिसाईलनं अचूक मारा करण्यास सक्षम असून, संशोधक ही युद्धनौका सागरी किनारे आणि अन्य सागरी प्रदेशांचं
सर्वेक्षण करणार आहे. अग्रय ही तिसरी युद्धनौका शत्रूंच्या पाणबुड्या नष्ट करण्याचं
कार्य करेल. जीआरएसई या स्वदेशी कंपनीनं आतापर्यंत एकशे अठरा युद्धनौकांची निर्मिती
केली असून, त्यातल्या ऐंशी युद्धनौका भारतीय
नौदलाकडे सोपवण्यात आल्या आहेत.
****
शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भातल्या आपल्या नव्या
मार्गदर्शक नियमांच्या अंमलबजावणीला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तीन महिन्यांसाठी स्थगिती
दिली आहे. आता हे नियम एक एप्रिल ऐवजी एक जुलैपासून अंमलात येतील. बँका, शेअरबाजारातले मध्यस्थ आणि उद्योग संस्थांच्या विनंतीवरून
हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह
बँकेनं हे निर्णय जारी केले होते.
****
जालना-देऊळगावराजा मार्गावर आज पहाटे ट्रकला झालेल्या
अपघातात ट्रक चालकासह अन्य एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. सुरेश पालवे आणि बबलू लोंढे, अशी या मृतांची नावं आहेत. या रस्त्यावरच्या सेंट मेरी
शाळेजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला ट्रक धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशात एक एप्रिलपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच
ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, अशा चार गटात वर्गीकरण, अनिवार्य केलेलं आहे.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा
उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. तीन एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात देवीची पारंपरिक
छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, उद्या देवीचा जोगवा असेल.
दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेलाही काल प्रारंभ
झाला. या यात्रेत दोन एप्रिल तसंच तीन एप्रिलला पालखी मिरवणूक आणि चुनखडी सोहळा होणार
आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या बारड इथल्या शीतलादेवीच्या ऊर्फ
पोचम्मादेवीच्या यात्रोत्सवालाही उत्साहात सुरवात झाली आहे. यानिमित्तानं ग्रामस्थांच्या
वतीनं हनुमान मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.
****
हवामान
राज्यात बहुतांश जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment