Saturday, 7 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आजपासून ६० रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर महानगरांमध्ये लागू होईल. या वाढीनंतर, आता मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१२ रुपये ५० पैसे, दिल्लीत ९१३ रुपये, कोलकातामध्ये ९३९ रुपये तर चेन्नईमध्ये ९२८ रुपये ५० पैसे झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत समाज माध्यमावर पसरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. नागरिकांनी या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन इंडियन ऑइलतर्फे करण्यात आलं आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. इंधन पुरवठ्यात कोणताही खंड पडलेला नाही, असं इंडियन ऑइलनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असंही इंडियन ऑईलनं म्हटलं आहे.

****

दरम्यान, इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेला पुढील चार आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांना दिलं जाणारं ‘टीआरपी रेटिंग’ तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. काही वृत्तवाहिन्या इस्त्रायल-इराण संघर्षाबाबत संवेदनशील आणि संदिग्ध माहिती प्रसारित करत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे. अशा वृत्तांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः ज्या लोकांचे नातेवाईक युद्धग्रस्त भागात राहतात, त्यांच्यामध्ये अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण होत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता तात्पुरता उपाय म्हणून ही मानांकन प्रक्रिया चार आठवड्यांसाठी स्थगित ठेवण्यात आली आहे. पुढील निर्देश मिळेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील माणेकशॉ केंद्रात एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. सशस्त्र दल, पोलिस आणि इतर क्षेत्रांसह विविध मंत्रालयं, विभाग आणि संघटनांमधील सुमारे एक हजार महिला या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात दोन गट चर्चा देखील होतील. पहिला कार्यक्रम कामगार संहिता - महिला सक्षमीकरण आणि दुसरा स्वयं सहाय्यता गटांमधील महिला उद्योजकांवर केंद्रित असेल.

****

पत्रकार हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने रामरहीम आणि अन्य तीन जणांना दोषी ठरवले होते. रामरहिम बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी सात वर्षांपासून तुरुंगवासात होता. अन्य तीन जणांची शिक्षा कायम ठेवण्यात आली असून न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना पहिल्या अहिल्यारत्नपुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर आणि नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या भामरागड इथं आदिवासी बांधवांसाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेत डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना सोलापूर इथं आयोजित एका विशेष सोहळ्यात ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी डॉ.आमटे यांनी हेमलकसा इथल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. रस्ते, वीज आणि संवादाची साधनं नसतानाही केवळ सेवाभावातून आदिवासींचा विश्वास जिंकता आला, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात ग्रंथदिंडी, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं होतं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह पाच विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी येत्या १२ मार्चला एक विशेष सभा होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या विशेष सभेचे पिठासन अधिकारी म्हणून काम पाहतील. स्थायी समितीसह शालेय, आरोग्य, समाजकल्याण, शहर सुधार आणि महिला-बालकल्याण या पाच विषय समितींच्या सदस्यांची नियुक्ती गेल्या गुरुवारी पाच मार्चला करण्यात आली. त्यानंतर सभापती निवडीसाठी पालिकेच्या सचिव कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून विशेष सभेचे आयोजन करण्याची विनंती करण्यात आली होती.

****

हवामान – राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात तापमानात वाढ झाली आहे. अमरावती इथं सर्वात जास्त ४० अंश सेल्सियस इतकं तापमान तर अहिल्यानगर इथं १४ पूर्णांक ७ इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात सरासरी ३६ ते ३८ अंश सेल्सियस इतकं तापमान असून परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८ पूर्णांक ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...