Tuesday, 31 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते नुकतंच गांधीनगर इथं महावीर जयंती निमित्त सम्राट संप्रती संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान अहमदाबाद जिल्ह्यात साणंद इथं केन्स सेमीकॉन प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर वाव-थराड इथल्या सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या प्रसंगी ते जनतेला संबोधित करणार आहेत.

****

देशात २०२७ च्या जनगणनेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला टप्पा उद्या म्हणजे १ एप्रिलपासून सुरू होणार असून तो येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे. याआधीची जनगणना २०११ मध्ये झाली होती. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा यांची माहिती घेतली जाणार आहे. यावेळी नागरिकांना प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, विशेष मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून माहिती भरता येणार आहे. हे पोर्टल १६ भाषांमध्ये उपलब्ध असेल. माहिती भरल्यानंतर नागरिकांना ११ अंकी 'AC ID' दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. दुस-या टप्प्यात जातीनिहाय गणनाही केली जाणार आहे.

****

पाइपद्वारे नैसर्गिक वायू  म्हणजे पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. असा अर्ज न करणा-यांचा एलपीजी पुरवठा तीन महिन्यांनंतर बंद होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी दिसणाऱ्या रांगा या भीतीपोटी झालेल्या खरेदीमुळे असल्याचे त्यांनी नमूद केलं आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

नक्षलवादाविरोधातल्या लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळवलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद काल झाली,त्यावेळी ते बोलत होते. माओवादाची चळवळ आता राज्यात नगण्य पातळीवर आली असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे, किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासन विशेष 'सी-60 पदक' देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पोलीस तपासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा वापर वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, हळद आणि कांदा बियाणे यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरसह पैठण तसंच सिल्लोड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.

परभणी शहर परिसरातही काल गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. बीड शहरातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकालाही फटका बसत आहे. अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथल्या दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आंबा पिकाचीही पडझड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गहू पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

अकोला जिल्ह्यातही काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून वीज कोसळल्यानं आठ मेंढा दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, राज्यात पुढच्या चार दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात अला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केली आहे.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या असून, भगवान महावीरांच्या आयुष्यातून आणि शिकवणुकीतून सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दिसतो, असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशवासियांना महावीरजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...