Tuesday, 17 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

"किमान शासन, कमाल प्रशासन" या सूत्राला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आज लोकसभेत जनविश्वास विधेयक मांडणार आहेत. प्रवर समितीच्या शिफारशींनंतर आलेल्या या विधेयकामुळे १००० हून अधिक तांत्रिक गुन्हे फौजदारी कक्षेतून बाहेर पडणार आहेत. त्याचबरोबर लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरची चर्चा पुढे सुरु राहील. तर राज्यसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन विनियोग विधेयक सादर करणार आहेत.

****

महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असलेलं राज्य असून, ब्रिटनमधल्या गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रालयात काल ब्रिटनमधल्या बर्मिंगहॅमचे खासदार लियाम बर्न यांच्या नेतृत्वात खासदारांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या व्यापक आर्थिक कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्येही व्यापार वृद्धिंगत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यातली मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि औपचारिक शिक्षण प्रणालीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका असून, या सहकार्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या भागीदारी अंतर्गत महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळाला सहाय्य करण्यासाठी टेक्निकल असिस्टन्स यूनिटस्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवणं, वंचित समुदायांपर्यंत पोहोचणं, संच दहावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणात सामावून घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास मदत केली जाणार आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ – एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देशही देण्यात आले. तसंच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

****

एलपीजीच्या काळाबाजार प्रकरणी विविध जिल्ह्यात नेमलेल्या समित्यांनी आत्तापर्यंत एक हजार २०८ सिलेंडर जप्त केले असून, २३ गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधानपरिषदेत दिली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ३३ लाख ६६ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता एलपीजीला पर्याय म्हणून रॉकेल उपलब्ध करायचा विचार सरकार करत असून, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्राद्वारे कळवलं आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या दरात साधारण वाढ झाली आहे, असंही ते म्हणाले.

****

धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काल "महिलांसाठी एक दिवस मोफत रिक्षा" हा उपक्रम राबवण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी काल महिलांना मोफत रिक्षा सेवा देण्यात आली.

****

ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण – साईच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र- एनसीओईला काल भेट दिली. या भेटीदरम्यान, मर्फी यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिम्नॅस्टिक्स, मुष्टियुद्ध, भारोत्तोलन, धनुर्विद्या, तलवारबाजी आणि हॉकी यासह विविध विषयांमधील प्रशिक्षण सत्रांचंही मर्फी यांनी निरीक्षण केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं मुद्रांक विक्रीसाठी लाच मागणाऱ्या विक्रेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल अटक केली. श्रीकांत बनसोड असं संबंधिताचं नाव आहे. पाच हजार रुपयांच्या मुद्रांकाच्या मूल्याव्यतिरिक्त त्याने खरेदीदाराकडे पाचशे रुपये लाच घेतली होती.

****

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा ५९ टक्क्यांवर आला आहे. सध्या सिन्नर तालुक्यात तीन टॅंकर सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत मोठी वाढ होऊ शकते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या घाटपुरी परिसरात शेतामध्ये आणि गाव परिसरात बिबट्यांनी मुक्तपणे संचार वावरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या उन्हामुळे या वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी तसंच आवश्यक अन्नसाठा मिळत नसल्याने हे प्राणी गावात येत आहेत. नागरीकांनी याबाबत सावध राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे.

****

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...