Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज श्रीरामनवमी उत्साहात
आणि भक्तिभावाने साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना रामनवमीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान रामाचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सद्गुणाच्या मार्गावर
जाण्यासाठी मार्गदर्शन करतं, त्यांचं जीवन आपल्याला समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचं
पालन करण्याची देखील प्रेरणा देत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
दरम्यान, रामनवमीनिमित्त
देशभरातल्या राम मंदिरांमध्ये राम जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
**
रामनवमीनिमित्त बीड शहरातून
भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यात हजारो राम भक्त सहभागी झाले होते.
****
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.
जयसिंगराव पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे. जयसिंगराव पवार यांनी, इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जिवंत ठेवण्याचं कार्य
केलं, थोर व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी घेतलेला सखोल वेध पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी
ठरणारा असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील
ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे
शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची
शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर मराठेशाहीचा खरा इतिहास
जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी शोक व्यक्त करत जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जयसिंगराव पवार यांचं आज कोल्हापूर
इथं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते.
****
आंध्र प्रदेश च्या मार्कपुरम
जिल्यात एक खाजगी बस आणि टिप्परच्या अपघातात १३ जण ठार झाले, तर २२ जण जखमी
झाले आहेत. रायवरम नजीक आज झालेल्या या अपघातानंतर या वाहनांना भीषण आग लागली आणि त्या
आगीत होरपळून प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. आंध्र प्रदेशचे
मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, संपूर्ण चौकशी
करण्याचे आदेश दिले आहेत.
****
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल तर्फे देण्यात येणारा ‘व्हिजनरी लीडर
अँड ट्रू चेंजमेकर’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत भारत
मंडपम इथं काल आयोजित भव्य समारंभात त्यांना हा सन्मान देऊन गौरवण्यात आलं. बोर्डीकर
यांनी परभणी जिल्ह्यासह ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे
त्यांना पुरस्कार देण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात एलपीजी गॅस
तसंच पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र या अफवांमध्ये
कोणतंही तथ्य नसून, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. काही पेट्रोल पंप चालकांकडून तेल कंपन्यांना
देयके उशिरा अदा झाल्यामुळे काही ठिकाणी इंधन पुरवठ्यात तात्पुरता विलंब झाला होता.
या घटनेचा चुकीचा अर्थ लावून इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात
कर्तव्यावर असताना तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि इतर व्यक्तींविरुद्ध
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १३ जणांकडून
एकूण २६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
अकोला इथं क्षयरोगमुक्त भारत
अभियान-१०० दिवसांची मोहीम, तसंच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा काल जिल्हाधिकारी वर्षा
मीना यांच्या उपस्थितीत पार पडला. अकोला जिल्ह्यातल्या २८२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त
झाल्या असून, आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून प्रयत्न व्हावेत.
त्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग मिळवण्याचीही गरज असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
****
थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू
असलेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत
कंपाऊंड पुरुष आणि रिकर्व्ह महिला प्रकारात भारतीय संघांनी कांस्यपदक जिंकलं. तसंच, कंपाऊंड महिला
आणि रिकर्व्ह पुरुष संघांनी अंतिम फेरीत धडक मारत आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत.
या दोन्ही संघांचे सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने उद्या कझाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
****
मुंबईतल्या जिओ कन्व्हेशन
सेंटर इथं उद्या २७ आणि परवा २८ तारखेला पल्स वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची
माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रातले
देश–विदेशातले सुमारे दोन हजार ९०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. डिजिटल
आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन आणि
नवकल्पना, तसंच ग्रामीण तथा सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांवर या परिषदेत सखोल चर्चा
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment