Tuesday, 24 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची व्यक्तीच अनुसूचित जाती-जमाती दर्जासाठी पात्र-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      रेल्वेचं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल

·      एसटीच्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

·      जागतिक क्षयरोग दिनी विविध उपक्रमांतून जनजागृती

आणि

·      अमृत मित्र उपक्रमात परभणीच्या महिला बचत गटांची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

****

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमाती दर्जासाठी दावा करू शकेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या तीन धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मांत धर्मांतर केलेली कोणतीही व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं संरक्षण मिळवू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

****

पश्चिम आशिया भागात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी संवाद आणि कूटनीतीच उपयोगी पडेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. या प्रदेशातला तणाव कमी करण्यासंदर्भात संबंधित राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

लोकसभेत आज वित्त विधेयक २०२६ वर पुन्हा चर्चा सुरू झाली. हे विधेयक आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्र सरकारचे आर्थिक प्रस्ताव लागू करण्याची तरतूद करतं. आज या चर्चेत काँग्रेसचे मनीष तिवारी, भाजपचे नवीन जिंदाल यांनी भाग घेतला.

राज्यसभेत आज विनियोग विधेयकावर चर्चा सुरू झाली, चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं जाणार आहे.

****

केंद्र सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाल्याचं, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. २०१४ पासून देशात अन्नधान्याच्या उत्पन्नात चव्वेचाळीस टक्के वाढ झाल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट - कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

****

भारतीय रेल्वेनं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, प्रवासाला ८ तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकिट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही. प्रवास सुरू व्हायच्या अर्धा तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं आता उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

****

राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. विधानभवनाच्या प्रांगणात ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात हा भव्य समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सुमारे तीन हजार बसेस टप्प्याटप्प्यानं राज्यभर धावणार असल्याचं, सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

****

जादा परताव्याचं आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत दिला जावा तसंच याप्रकरणी आरोपींना दोन पेक्षा जास्त वेळा स्थगिती घेता येऊ नये, असा बदल संबंधित कायद्यात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या बदलामुळे सरकारला आरोपींच्या मालमत्तेची विक्री करता येईल आणि ठेवीदारांचे पैसे लवकर देता येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक २०२६ आज विधानसभेत मंजूर झालं.

****

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनानं नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, असं, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य राजेश पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.

****

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९, अर्थात आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक असून, या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा साहित्याच्या नावाखाली पैसे घेण्यास शाळांना परवानगी नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य योगेश सागर यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये रॅम्पची व्यवस्था केली जाईल, असं मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. दिव्यांग बीजभांडवल योजनेंतर्गत अर्थसहाय्यात वाढ केली जाईल आणि स्पर्धा परीक्षेसाठीचे शुल्क कमी करण्याचा विचार केला जाईल असंही सावे यांनी म्हटलं आहे.

****

जागतिक क्षयरोग दिन आज पाळण्यात आला. नागरिकांमध्ये क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचार याबाबत जागरुकता वाढावी, यासाठी ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबवण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चौका इथं मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी जागतिक क्षयरोग दिनाच्या घोषवाक्याचे महत्त्व विशद करत, क्षयरोग उच्चाटनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं.

बीड शहरामध्ये आज क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी क्षयरुग्णांना पोषण आहाराच्या किटस् चं वाटप करण्यात आलं.

हिंगोली जिल्हा परिषदेतही आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एक्स-रे व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शंभर दिवसांच्या क्षयरुग्ण शोध मोहीमेची सुरूवात करण्यात आली. या व्हॅनच्या माध्यमातून १७८ जोखीमयुक्त गावांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पुंगळा इथल्या अर्जुन जगताप या तेरा वर्षांच्या थॅलेसिमियाग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहरातल्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं ही अवघड शस्त्रक्रिया केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेली या शस्त्रक्रियेनं या बालकाला नवजीवन मिळालं. परभणी जिल्ह्यात अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली आहे.

****

नांदेड महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे वीरेंद्रसिंह गाडीवाले यांची तर महिला, शिक्षण आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या सदिच्छा सोनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापतीपदी निरंजना लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठीच्या संघाची घोषणा आज करण्यात आली. हरमनप्रितच्या नेतृत्वाखालच्या या संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काश्वी गौतम, क्रिंता गौड आणि श्री चारणी या तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

****

केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या अमृत मित्र उपक्रमात परभणी महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीत भारत मंडपम इथे झालेल्या विशेष सोहळ्यात परभणी शहरातल्या २९ महिला बचतगटांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या महिलांना विविध राज्यांमधल्या महिला बचत गटांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात झालेल्या सत्कारामुळे या महिलांचा आत्मविश्वास वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...