Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· येत्या १
एप्रिलपासून देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला प्रारंभ
· जागतिक
अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत-केंद्रीय
अर्थमंत्र्यांचं
प्रतिपादन
· वाढवण बंदर परिसरात
आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक बाजार समिती उभारण्याचं राज्य सरकारचं नियोजन
· पालघर
जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश
· दिव्यांग
तीरंदाज शीतलदेवीला ‘पॅराआर्चर ऑफ द ईयर’ पुरस्कार
जाहीर
आणि
· मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पाऊस- चार ते पाच दिवस खबरदारीचा
इशारा
****
येत्या १ एप्रिलपासून देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला प्रारंभ होणार
आहे. देशातली ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असणार आहे. देशाचे
महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज दिल्लीत
बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. यंदाच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत
स्वयंगणनेसाठीचं पोर्टल १६ भाषांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. घरांची
यादी करण्याचं काम सुरू होण्यापूर्वीच्या १५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ही
सुविधा वापरता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोन टप्प्यात होणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल ते ३० सप्टेंबर
या कालावधीदरम्यानच्या ३० दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारं आणि केंद्रशासित
प्रदेशांकडून घरांची यादी तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण
जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या
प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच
प्रसिद्ध केले जातील, असं मृत्युंजयकुमार यांनी सांगितलं. जनगणनेच्या दुसऱ्या
टप्प्यात जातिनिहाय गणना केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून
आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तामिळनाडू
विधानसभेच्या सर्व म्हणजेच २३४ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल, तर पश्चिम
बंगालमधल्या १५२ मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला मतदान होईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल असून ९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे
घेता येतील.
****
देशभरातल्या २१ राज्ये आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत उच्च दर्जाच्या केरोसीनचं वितरण
करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सरकारी तेल
कंपन्यांच्या दोन वितरण केंद्रांवर मिळून ५ हजार लिटर केरोसीन उपलब्ध करून दिलं जाईल. त्वरित वितरण
व्हावं यासाठी वितरकांना काही परवान्यामधून सूट दिली जाईल. हा शासननिर्णय पुढील
दोन महिन्यांसाठी लागू असेल
****
दोन भारतीय एलपीजी जहाजांनी ९४ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन होर्मुझची
सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे. यापैकी एक जहाज उद्या मुंबईत तर दुसरे जहाज परवा एक एप्रिल रोजी न्यू मंगलोर इथं
पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी, चार
भारतीय एलपीजी जहाजं या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे दाखल झाली आहेत.
****
भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या
जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या.
जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे, तर आपल्या देशात
महागाई कमी झाली, जीडीपी ७ टक्क्याहून अधिक दराने वाढत आहे, आणि चालू
खात्यातली तूट १ टक्क्याहून कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…
बाईट- केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
****
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर परिसरात
सुमारे १२०० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक बाजार समिती
उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज
मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात शेतकरी उत्पादक संस्था-एफपीओ च्या राज्यस्तरीय
परिषदेचं उद्घाटन रावल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार व्यवस्थेपेक्षा अधिक आधुनिक, सुसज्ज आणि
जागतिक दर्जाची बाजार साखळी उभारण्याची गरज असल्याचं रावल यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उभारली जाणारी ही बाजारपेठ, रस्ते, रेल्वे, बंदर आणि
विमानतळाशी जोडलेली असेल, ज्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील
शेतीमालासाठी महाराष्ट्र हे जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास रावल
यांनी व्यक्त केला.
****
पालघर
जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
राज्यस्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ९१ घरगुती सिलिंडर, ७५ रिकामे गॅस सिलिंडर, १९ किलो आणि पाच किलो वजनाचे व्यावसायिक सिलेंडर, रिफिलिंगसाठी तीन
हाय-प्रेशर
ट्रिपलेक्स पावर पंप,
दोन मोटार पंप, सहा इलेक्ट्रॉनिक वजन काटे अंदाजे तीन लाख ३६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा तसंच एलपीजी वितरण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त
विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात
येणार आहेत. यात कृषी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन आणि
चर्चा होणार आहे. माहिन्यातील
पहिल्या चार बुधवारी ही शेती शाळा होणार असून याचे प्रत्यक्ष प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि
उमेद च्या युट्युब
चॅनेलवर केलं जाणार आहे.
****
भारताची दिव्यांग तीरंदाज शीतलदेवीला
२०२५ या वर्षाचा ‘पॅराआर्चर ऑफ द ईयर’
हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिरंदाजीत २०२५मध्ये अव्वल दर्जाची
कामगिरी करणाऱ्या तिरंदाजांना जागतिक तिरंदाजी कार्यकारी मंडळाने पुरस्कार जाहीर
केले, जन्मापासून दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तीरंदाजी करणाऱ्या
शीतलदेवीने गेल्यावर्षीच्या ग्वांगजू इथल्या पॅरातिरंदाजी चषक स्पर्धेत वैयक्तिक
सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याचबरोबर महिलांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य तर मिश्र
सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं
होतं.
****
धाराशिव इथल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीनं राज्यस्तरीय ‘गंगाधर करंडक’ एकांकिका नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा घेण्यात आला. नाट्यस्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचं प्रतिपादन सिने अभिनेत्री
तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत यांनी यावेळी बोलताना केलं.
नीलिमा शिर्के-सामंत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगरात रिक्षा
चालकांनी आज लाक्षणिक संप केला. इंधन दरवाढ, आणि भाडेवाढीच्या मुद्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात
आला. या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केलं. या संपामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय
समिती सभापती
पदाची निवडणूक येत्या
दोन एप्रिल रोजी घेण्यात येणार
आहे, अशी माहिती पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात
नवनिर्वाचित ६३ जिल्हा परिषद सदस्य आणि नऊ पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत ही
निवडणूक प्रक्रिया होणार
आहे.
****
धाराशिव शहरात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीनं आज
शोभायात्रा काढण्यात आली. एकात्मता जोपासण्याचा संदेश
देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरात विविध ठिकाणी पालखीचे पादप्रच्छालन आणि पूजन करत नागरिकांनी शोभायात्रेचं स्वागत केलं.
****
राज्यात येत्या पाच दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांचे संरक्षण करण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारपासून
ढगाळ वातावरण असून सिल्लोड तालुक्यातल्या अंभई परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
परभणी शहर परिसरातही आज गारपिटीसह पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
बीड शहरातही आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हवामान विभागानं जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी पुढचे चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला
आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक
ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment