Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 March
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
देशात
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा
तुटवडा नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
·
हॉटेल
व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन शुल्क आकारू नये-केंद्रीय ग्राहक संरक्षण
प्राधिकरणाचे आदेश
·
शेत पाणंद
रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची तरतूद
·
श्रीरामनवमीचा
उत्सव देशभरात साजरा
आणि
·
धाराशिव
जिल्ह्यात पळसप इथं येत्या २९ तारखेला ११ वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन
****
भारताकडे ७४ दिवसांची साठवण क्षमता असून, कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा साठा सुमारे
६० दिवसांचा असल्याची माहिती, केंद्र सरकारने दिली आहे.
देशातलं पेट्रोलियम आणि एलपीजी वितरण सुरळीत तसंच पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पेट्रोलियम
आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितलं. सर्व इंधन विक्री केंद्रांवर पुरेसा साठा
असून पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा देशभरात कुठेही
तुटवडा नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
इराणने भारत, चीन आणि रशियासह इतर
मित्र राष्ट्रांना व्यावसायिक जहाज वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर
करण्याची परवानगी दिल्याचं, इराणचे परराष्ट्र मंत्री
सय्यद अब्बास अराघची यांनी सांगितलं. इराणच्या विरोधकांशी
संबंधित जहाजांना मात्र या जलमार्गातून जाण्याची परवानगी नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, भारताच्या तेल तसंच
वायू वाहक जहाजांची होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरळीत वाहतुक सुरू असल्याचं,
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू
आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत
राज्य सरकारने पर्यायी इंधन म्हणून केरोसीन वितरणाला गती देण्याचा निर्णय घेतला
आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लीटर केरोसीनच्या वाटपाला
मंजुरी दिली आहे. प्रत्येक शिधापत्रिकेमागे तीन लीटर केरोसीनचं वाटप केलं जाणार आहे.
नागरिकांनी विनाकारण इंधनाचा साठा करू नये, आणि पेट्रोल पंपांवर रांगा लावू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंधनाची बेकायदा साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
बाईट-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर
नियंत्रण आणलं आहे. आता जिल्ह्यात दुचाकीसाठी
२०० रुपये, तर चारचाकीसाठी दोन हजार रुपयांपेक्षा जास्त इंधन
देऊ नये, असे आदेश, जिल्हा पुरवठा
अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इंधन वितरकांना दिले आहेत. जिल्ह्यात
पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून,
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं
आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
हिंगोली जिल्हा प्रशासनानेही असेच आदेश जारी केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी एका वेळी जास्तीत जास्त २००
रुपये तर चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचं इंधन देण्याची सूचना
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपावर काल नो स्टॉकचा
बोर्ड दिसून आला. सकाळी शहरात मोजकेच पेट्रोलपंप सुरू होते, त्याठिकाणी ग्राहकांच्या
रांगा दिसून आल्या.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल
डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पेट्रोल डिझेलचा अनाधिकृत साठा केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली
जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
परभणी जिल्ह्यातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, जिल्हा पुरवठा अधिकारी, विलास मुसळे यांनी केलं आहे.
****
हॉटेल तसंच खानपान-गृहांसारख्या आस्थापनांनी एलपीजी गॅस किंवा इंधन
शुल्क या नावाखाली कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश, केंद्रीय
ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. जर संबंधित व्यावसायिकांनी अशा शुल्काची आकारणी
केली, तर ग्राहकांना १९१५ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या मोबाईल ॲपवर त्याची तक्रार करता येईल. संबंधित जिल्हाधिकारी
किंवा थेट प्राधिकरणाकडेही याची तक्रार नोंदवता येणार आहे.
****
शेत पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचं नुकसान
करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून, अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल
पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध
योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. महसूल विभागाने काल
याबाबतचा आदेश जारी केला.
****
पारलिंगी हक्क संरक्षण दुरुस्ती विधेयक, २०२६ मागे घेण्याची सूचना, सर्वोच्च
न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं केंद्र सरकारला केली आहे. हे विधेयक नुकतंच
संसदेत मंजूर झालं. विधेयकातल्या या दुरुस्तीमुळे स्व-ओळख
हक्क आणि गोपनीयतेवर मर्यादा येत असल्याचं निरीक्षण समितीनं नोंदवलं. नवीन
कायद्यात अपहरण आणि शोषण यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा प्रस्तावित आहेत,
परंतु हे गुन्हे आधीच इतर कायद्यांतर्गत समाविष्ट असल्याचं
समितीनं नमूद केलं आहे.
****
श्रीरामनवमी काल देशभरात उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास राम मंदिरांमध्ये पारंपरिक
पद्धतीने राम जन्म सोहळ्याचे विधी पार पडले. भाविकांनी विशेषत:
महिला वर्गाने यावेळी मोठी गर्दी केली होती.
बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या
वतीने श्रीरामनवमी उत्सवात आध्यात्मिक
रामायण स्वहाकार आयोजित केला जातो. शेकडो दिंड्या घेऊन हजारो भाविक या उत्सवासाठी
शेगावनगरीत दाखल झाले आहेत.
शिर्डी इथं अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांचं छायाचित्र, पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली.
मराठवाड्यातही राम नवमीचा उत्साह दिसून आला. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत…
छत्रपती
संभाजीनगर इथल्या विविध राम मंदिरांमध्ये माध्यान्हकाळी राम जन्मोत्सव साजरा झाला.
भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली. बहुतांश मंदिरात महाप्रसादासह रक्तदान
शिबीर आणि सर्व रोगनिदान शिबीरं घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सांगितिक
कार्यक्रम पार पडले. बीड वळण रस्त्यावर असलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ
मेडिकल सायन्सच्या परिसरात राम मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला. अयोध्येतल्या
श्री राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जाणार आहे.
जालना
शहरातल्या जुना जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव
उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातून सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जांब या समर्थ रामदास स्वामींच्या
जन्मगावी,
त्यांच्या घरच्या रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी
केली.
बीड
शहरातून रामभक्तांनी सकाळी दुचाकी फेरी काढली. दुपारच्या वेळी विविध मंदिरांमध्ये
रामजन्म साजरा झाल्यावर महाप्रसादासह विविध कार्यक्रम पार पडले, सायंकाळच्या सुमारास शहरातून शोभायात्रा काढण्यात आली, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते श्रीरामाच्या आरतीने या
शोभायात्रेला प्रारंभ झाला.
परभणी
शहरातील प्राचीन राम मंदिरात प्रभू श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात गुलाल आणि
फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला. पूर्णा तालुक्यातील
कातनेश्वर इथे श्री हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात
आली.
हिंगोली
इथल्या खाकी बाबा मठातून सायंकाळी रथयात्रा काढण्यात आली. महंत कौशल्य दास महाराज
यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा, आरती केल्यानंतर
भाविकांनी रथ ओढून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या.
लातूर
शहरात सकाळपासूनच श्रीराम मंदिरामध्ये भक्तांची गर्दी झाली होती. श्रीराम मंदिर, केशवराज मंदिर,
साई मंदिर इतर मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवासह अभिषेक, पूजन,
आरती आणि भजन-कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. दुपारी १२
वाजता महिलांनी पाळणा गीत गात राम जन्म सोहळ्यात रंग भरला.
नांदेड
इथं गाडीपुरा भागातल्या रेणुकामाता मंदिरातून श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह
शोभायात्रा काढण्यात आली, आमदार बालाजी कल्याणकर आणि
आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
या यात्रेत महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. अशोक नगरातल्या श्रीराम
मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला.
धाराशिव
इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवा ध्वज यात्रा काढण्यात आली. श्री छत्रपती
शिवाजी महाराज चौकातून आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, नगराध्यक्षनेहा
राहुल काकडे यांच्या उपस्थितीत या यात्रेचा प्रारंभ झाला. भगवे फेटे घालून, हाती भगवे ध्वज घेऊन पुरुष तसंच महिला भाविक या भगवा ध्वज यात्रेत सहभागी झाले.
राज्यात
अकोला,
गोंदिया, जळगाव, धुळे यासह सर्वच ठिकाणी रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा झाला
****
धारशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं येत्या २९ तारखेला ११ व्या मराठवाडा
ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि शिक्षणमहर्षी वसंतराव काळे
प्रतिष्ठान, यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे
स्वागताध्यक्ष, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनात
ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन,
परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह
स्त्रीरोग निदान शिबिर असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
****
जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावं आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. तहसीलदार
आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या
उद्घाटन प्रसंगी त्या काल बोलत होत्या.
धाराशिव जिल्ह्यातही जनगणना पूर्वतयारीला गती देण्यात आली असून, घर यादी आणि गृहगणना टप्प्यापासून डिजिटल जनगणनेपर्यंत
सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. सर्व चार्ज जनगणना अधिकारी यांच्या
कार्यालयात जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
****
लातूर शहराजवळील मौजे साई गावात अवैध दारू विक्रीच्या
वाढत्या प्रकारांमुळे ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसांपासून गावातच आमरण उपोषण सुरू
केलं आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली
नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरु केलं.
****
हवामान
मराठवाड्यात रविवारपर्यंत, परभणी, बीड, नांदेड,
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी
पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या ३० तसंच ३१ तारखेलाही राज्यातल्या
अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment