Tuesday, 17 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

·      रबी हंगामासाठी पीक पाहणीसाठी राज्य सरकारकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

·      शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारकडून सुधारणा

·      लोकसभा गदारोळ प्रकरणी प्रशांत पडोळे यांच्यासह आठ जणांचं निलंबन मागे

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेचं आयोजन

****

राज्य शासन अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार असल्याचा निर्धार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानसभेत प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होते. संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्य सरकारनं रबी हंगामासाठी पीक पाहणीसाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. पीक नोंदणीच्या अभावी नैसर्गिक आपत्ती, पीक वीमा, पीक कर्ज यासारख्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, राज्यात आतापर्यंत फक्त ५५ टक्के क्षेत्राची पाहणी पूर्ण झाल्यानं सरकारनं हा निर्णय घेतल्याचं निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत आज दिलं. याबाबत ते म्हणाले -

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात गॅस टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबाबत सरकारने काल विधानसभेत निवेदन करणं अपेक्षित होतं, ते कधी करणार असा प्रश्न पटोले यांनी विचारला. तसंच राज्यातील गॅस पुरवठ्याची स्थिती सभागृहात सविस्तर मांडण्याची परवानगी त्यांनी मागितली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारली मात्र सरकारने सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश दिले. बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे आणि सरकारने सभागृहात निवेदन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

****

महाराष्ट्र निरसन विधेयक २०२६ आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं. मंत्री आशिष शेलार यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. याअंतर्गत राज्यातल्या सर्व कायद्यांचं परीक्षण करून, वापरात नसलेले कायदे निरस्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारने सांगितलं.

****

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच विद्यापीठाचं प्रशासन, संरचना यांचं बळकटीकरण करणं आणि उच्च शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारणं हे याचं उद्दिष्ट आहे.

****

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक २०२६ आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा पाच सदस्यांना नामनिर्देशित करण्याची तसच पंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या वीस टक्के किंवा किंवा एका सदस्याला नामनिर्देशित करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६ आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत मांडलं. विधानसभेनं हे विधेयक काल मंजूर केलं आहे.

****

राज्यातल्या ८६ हजार अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत पुरवलेल्या पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कैलास पाटील यांनी लक्षवेधी द्वारे केला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी सचिव स्तरावर चौकशीचं आश्वासन दिलं.

****

बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची ग्वाही मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती

****

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील पंचायती राज संस्था तसंच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान वितरित केलं आहे. ग्रामीण स्थानिक प्रशासनाला अधिक बळकट करणं हा याचा उद्देश आहे. महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यातील रोखून ठेवलेला हिस्सा म्हणून सुमारे १५१ कोटी रुपये निधी मिळाला असून, याचा फायदा १२५ उप-ग्रामपंचायती आणि ३२४ ग्रामपंचायतींना झाला आहे.

****

होर्मुझ सामुद्रधुनी पार करून नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज आज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल झालं. या जहाजावरचा सुमारे ४६ हजार मेट्रिक टन एलपीजी उतरवण्याचं काम सुरु झालं आहे. दरम्यान, सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण सुमारे ८४ टक्क्यांवरून सुमारे ९० टक्क्यांवर पोहोचलं आहे. घरगुती एलपीजी उत्पादनात सुमारे ३६% वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा सामान्य असून किरकोळ विक्री केंद्रांवर कुठेही इंधनाचा तुटवडा नसन्याचं, पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केलं.

****

शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारने सुधारणा केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. विम्याचे दावे २१ दिवसात निकाली काढणं बंधनकारक असून त्यात उशीर झाला, तर कंपनीला १२ टक्के दराने व्याज द्यावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

लोकसभेत गदारोळ करणाऱ्या ८ विरोधी खासदारांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह ८ जणांना गैरवर्तन केल्याबद्दल अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं. हे निलंबन तात्काळ मागे घेण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला आणि तो एकमताने संमत झाला.

****

शिवसेनेचे मुख्य नेते तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा असून, आपण देशासोबत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

छत्रपती संभाजीनगर इथं उद्या १८ मार्चपासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या सिडको N-8 इथल्या रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. नागरिकांनी आपल्या १४ आणि १५ वर्ष वयोगटातल्या मुलींना ही लस देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

भारतीयत्व’ किंवा ‘हिंदुत्व’ हा फक्त विचार नसून ती एक जीवनशैली असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव यांनी म्हटलं आहे. ते आज संघाच्या प्रतिनिधी सभा बैठक तसंच इतर उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आसावरी काकडे यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. राज्यशासनाच्या साहित्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

****

नांदेड जिल्‍हा परिषदेच्या २३ कोटी २६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज संमत झाला. जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी या अंदाजपत्रकाला मान्यता दिली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...