Tuesday, 10 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ-परराष्ट्रमंत्र्यांचं पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात निवेदन

·      प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यसभा निवडणुकीत राज्यातल्या सातही जागेवरील उमेदवारांची बिनविरोध निवड

·      रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

आणि

·      पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा कालपासून सुरु झाला. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर घोषणाबाजी सुरूवात केली. यामुळे सदनाचं कामकाज प्रथम तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

****

पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी राजनय आणि संवाद हेच प्रभावी माध्यम असल्याचं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत भारताच्या भूमिकेबाबत निवेदन देत होते. भारत शांततेच्या बाजूने असून, निर्माण झालेला हा तणाव कमी करण्याचं आवाहन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

 

राज्यसभेतही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातल्या देशांमधल्या परिस्थितीवर निवेदन केलं. कोची इथं सध्या आश्रयाला आलेल्या इराणी जहाजाबाबतही त्यांनी सभागृहाला माहिती दिली. तर पश्चिम आशियातल्या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली.

****

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्र सरकार सर्व आवश्यक गोष्टींची काळजी घेत असल्याचं सांगितलं.

****

प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या, सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता, या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते काल संबोधित करत होते. गेल्या काही वर्षांत शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं सुरू झाली आहेत, तसंच गावागावत आरोग्य सेवा पोहोचल्या आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले…

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातल्या सात जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा समावेश आहे.

****

राज्यातल्या पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करत असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. काल विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, सरनाईक यांनी सांगितलं. याआधी १९९७ मध्ये घातलेली रिक्षा परवाने वाटपावरची स्थगिती सरकारने जून २०१७ मध्ये उठवली होती. एक जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात १२ लाख ९६ हजार रिक्षा धावत असून, अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि वायूप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे रिक्षा परवाने वाटपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

याशिवाय राज्य शासनानं ओला, उबेर आणि रॅपिडोच्या इलेक्ट्रिक बाईकचे परवानेही रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. भविष्यात सुरक्षेचे निकष पूर्ण केले तर या कंपन्यांना पुन्हा परवानगी मिळू शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांचा शपथग्रहण सोहळा आज होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना पदाची शपथ देतील. दरम्यान, राज्यपालांचं काल सायंकाळी मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य तसंच अधिकारी वर्गाने त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. लोकभवनाच्या प्रांगणात पोलिस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

****

महिलांच्या विकासाशिवाय कोणत्याही समाजाचा सर्वांगिक विकास शक्य नसल्याचं प्रतिपादन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं, सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांना आपल्या कामाचं श्रेय तसंच योग्य मोबदला आतापर्यंत मिळाला नसल्याचं खंत मान्य करावी लागेल, असं त्यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या…

बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात कार्यरत दहा तरुणींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या सध्या रोहा इथं नियुक्त वनरक्षक ज्योती मिरगणे यांचा समावेश आहे.

****

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर काल विधानसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठीचा वेळ वाढवून देण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली. आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुंडे यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला. मंत्री जयकुमार गोरे यांनी, या सदस्यांना चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असं सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा भक्तिभावाने साजरा होत आहे. काल सकाळी नाथवंशजांच्या निर्याण दिंडीने नाथांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान ठेवलं. त्यानंतर समाधी सोहळ्याचं कीर्तन तसंच वारकरी वैष्णव पाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. हरिपाठ आणि भजनाने कालच्या कार्यक्रमांचा समारोप झाला. आज सकाळी विविध पुरस्कार वितरण, गुरूपूजन तसंच रात्री नाथ महाराजांचा छबिना पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातून वारकऱ्यांच्या सातशे दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, काल पैठण इथं सामुहिक पसादायन गायन उपक्रम पार पडला. संत एकनाथ महाराज संस्थान आणि सहयोगी संस्थांच्या या उपक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा इथल्या नाथ मंदिरातून पालखी काढण्यात आली. टाळ - मृदंगाच्या गजरात, आणि वारकरी मंडळाच्या अभंगगायनात निघालेल्या या पालखीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

****

लातूर जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया काल पार पडली. रेणापूर पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सभापतीपद पटकावलं आहे. इतर समित्यांपैकी भाजपकडे निलंगा, औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहमदपूर, उदगीर, चाकुर, काँग्रेसकडे लातूर आणि जळकोट पंचायत समिती गेली आहे.

रेणापूरमध्ये भाजपने मनसेशी युती केली. एकूण आठ जागांपैकी भाजप तीन, काँग्रेस तीन आणि मनसेच्या दोन जागा अशी स्थिती असताना, मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी यांना सभापतीपदी, तर भाजपचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

****

केंद्र सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीनं काल हिंगोली इथं पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी इथून सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेतून आदिवासी तसंच वंचित घटकांच्या विविध समस्यांबाबत आवाज उचलण्यात आला.

****

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव खासदार अशोक चव्हाण यांनी काल राज्यसभेत मांडला. हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना जवळच्या अंतराने जोडणारा आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचा प्रस्ताव, रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्याचं मान्य केलेलं आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...