Tuesday, 24 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास, कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं- पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं आज विधानसभेत निवेदन, या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाईचा इशारा

·      एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या तीन हजार बसचं आज लोकार्पण

·      देशभरात आजपासून ‘टीबी मुक्त भारत अभियान’ ही १०० दिवसांची विशेष मोहीम

आणि

·      एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात संयुक्त मोर्चा

****

सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास, कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते काल लोकसभेत निवेदन देत होते. या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. ते म्हणाले

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातला इंधन साठा, खत साठा, तसंच ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला. या काळात इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसंच साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारांना केली.

युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान करणाऱ्या हल्ल्यांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. भारताचा युद्धाला नेहमीच विरोध असून, पश्चिम आशियातला हा तणाव कमी करण्यासाठी भारताने संबंधित सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून शांततेचं आवाहन केल्याचं, ते म्हणाले…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत. काल सदनात याबाबत बोलतांना फडणवीस यांनी, या प्रकरणात ज्यांचा दुरान्वयेही संबंध असेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. महिलांच्या प्रतिष्ठेशी निगडित असलेल्या या विषयावर राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

दरम्यान, खरात याच्याविरोधातल्या तक्रारींचं प्रमाण वाढत असून, आतापर्यंत सहा फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. याविषयी कोणाला माहिती असल्यास अथवा तक्रार करायची असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन नाशिक पोलिसांनी केलं आहे.

****

राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालयं, मोफत उपचार देत नसतील तर अश्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.

**

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत सांगितलं.

**

दरम्यान, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक, तसंच कालबाह्य कायदे रद्द करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र निरसन विधेयक २०२६, विधान परिषदेत काल मंजूर करण्यात आलं.

**

राज्यातली दुकानं आणि खासगी आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा कालावधी १० तास करण्याबाबतचं सुधारित विधेयक राज्यशासनाने काल मागे घेतलं. या विधेयकातल्या तरतुदींविषयी पुरेशी स्पष्टता नसल्याने आणि विविध स्तरांवरून उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे कामगार विभागाने हा निर्णय घेतला असून, सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास करून हे विधेयक पुन्हा मांडलं जाणार आहे.

****

एसटी महामंडळच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या तीन हजार बसचं आज लोकार्पण होणार आहे. दोन बाय तीन आसन रचनेची ही ५६ आसनी बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतुक सेवा देईल, असं परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

****

जागतिक क्षयरोग दिन आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सामुहिक संकल्प करून एकत्र काम करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. क्षयरोगाचं जलद निदान, मोफत उपचार, सक्षम पोषण आणि रुग्णांची सुश्रुषा या सर्व बाबतीत टी बी मुक्त भारत अभियानाने साधलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचं, राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम’ आजपासून देशभरात राबवण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ११ हजार ९१ जोखीमग्रस्त गावं आणि शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी करण्यात येणार येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी, नागरिकांना क्षयरोगासंबंधी घेण्याच्या दक्षतेबाबत माहिती दिली, ते म्हणाले,

बाईट - अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे

****

एपस्टिन फाईल’ प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट भूमिका घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल नागपुरात संयुक्त मोर्चा काढण्यात आला. संघ मुख्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी झिरो माईल टी-पॉईंट इथं अडवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त काल त्यांच्या स्मृतींना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात पैठण गेट परिसरात हुतात्म्यांना फासावर चढवण्याचा सजीव देखावा सादर करून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं.

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं हुतात्मा दिनानिमित्त केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने भव्य पदयात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

****

धाराशिव इथं संपूर्णत: अभियान टप्पा दोन अंतर्गत जागतिक जलदिन समारंभ आणि कार्यशाळा काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत पार पडली. पाण्याचं योग्य नियोजन आणि लोकसहभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असं ते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनीही यावेळी बोलताना, पाणी बचतीचं महत्व विषद केलं.

****

मराठवाड्यातली मानाची समजली जाणारी शिवशंभो कावड यात्रा काल लातूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. रेणापूर तालुक्यातल्या माकेगाव इथून निघालेली ही यात्रा लातूरहून तुळजापूर मार्गे सोलापूरच्या दिशेने पुढे रवाना झाली. पाच दिवसांचा प्रवास पूर्ण करून ही यात्रा शिखर शिंगणापूर इथं पोहोचेल.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

****

हवामान

मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...